मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “लग्न आणि बरंच काही” हा नवा मराठी चित्रपट पूर्णपणे महिला शक्तीच्या बळावर साकार होणार आहे. या चित्रपटाचे सर्व टप्पे स्त्रियांच्या कुशल हातांनी पार पाडले जाणार आहेत. आणि हेच या सिनेमाचं वेगळेपण आहे. याशिवाय बरेच चेहरेसुद्धा यात पाहायला मिळणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी करणार असून, निर्मिती डॉ संजना सुरेश पै आणि अंजली नान्नजकर यांनी केली आहे. कथा लेखिका यशश्री मसुरकर ह्या लिहिणार आहेत. ह्या चित्रपटाचे छायाचित्रण स्मिता निर्मल करणार आहेत, तर संगीत दिग्दर्शन वैशाली सामंत करणार आहेत. लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत आणि शर्मिला राजाराम शिंदे या चित्रपटात दिसणार आहेत.
प्रत्येक पायरीवर महिलांचाच ठसा असलेला हा आगळावेगळा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक अभिमानास्पद पाऊल ठरेल. महिलांच्या जीवनातील सूक्ष्म भावना, अनुभव, स्वप्नं आणि संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच लग्नानंतरचं आयुष्य मुलीसाठी केवळ नव्या जबाबदाऱ्यांचं दार उघडत नाही, तर ते तिच्या जीवनप्रवासातील एक नवा अध्याय, नवी वाटचाल आणि नातेसंबंधांच्या नव्या ओळखींचा आरंभ ठरतो, हे सर्व “लग्न आणि बरंच काही” या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
या चित्रपटाची घोषणा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात येत आहे तर हा चित्रपट २०२६ च्या महिला दिनाच्या महिन्यात प्रदर्शित होईल.