भारताच्या एकतेला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहावे; आपण सर्व हिंदूच!: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

06 Oct 2025 19:04:51

मुंबई : भारताच्या एकतेला भाषा, धर्म किंवा प्रादेशिक ओळखीवर नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहावे लागेल. आपण सर्व हिंदू आहोत. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. धर्म किंवा भाषा काहीही असो, आपण सर्व एकच आहोत." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. मध्य प्रदेशच्या सतना येथील बाबा सिंधी कॅम्प परिसरातील मेहेर शाह दरबाराच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, भारताची विविधता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. आपण सगळे सनातनी आहोत, आपण सगळे हिंदू आहोत. पण एक चलाख इंग्रज आला, त्याने आपल्याला तुटलेला आरसा दाखवला आणि आपल्याला वेगळे करून गेला. त्याने आपली आध्यात्मिक चेतना हिरावून घेतली, आपल्याला भौतिक वस्तू दिल्या आणि त्या दिवसापासून आपण एकमेकांना वेगळे समजू लागलो. भारताची एकता भाषा, धर्म किंवा प्रादेशिक ओळखीतून नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीने पाहावी लागेल. जेव्हा आपण आध्यात्मिक परंपरेच्या आरशात पाहू, तेव्हा लक्षात येईल की सर्व एकच आहेत. हाच आरसा आपले गुरु दाखवतात आणि आपण त्याच मार्गाने चालले पाहिजे.

सरसंघचालक पुढे म्हणाले की काही लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत, पण संपूर्ण जग त्यांना त्याच स्वरूपात पाहते. जे लोक स्वतःला हिंदू म्हणत नाहीत, ते परदेशी जातात, तरीही तिथे त्यांना हिंदूच म्हटले जाते. कारण आपली ओळख ही लेबलवरून नाही, तर आपल्या जन्मभूमी, संस्कृती आणि जीवनदृष्टीशी जोडलेली आहे. धर्म हा फक्त पूजापद्धती नसून जीवन जगण्याची एक संपूर्ण दृष्टी आहे. जेव्हा आपण धर्माला व्यवहारात उतरवतो, तेव्हाच समाजात सामंजस्य आणि प्रगती दोन्ही साध्य होतात.

या प्रसंगी दरबार प्रमुख पुरुषोत्तम दास महाराज, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, राज्यमंत्री प्रतिमा बागरी, खासदार गणेश सिंह, इंदौरचे खासदार शंकर लालवानी, प्रदेश भाजप महामंत्री, भोपाळ दक्षिण-पश्चिम विधानसभा आमदार, भारतीय सिंधु सभेचे माजी राष्ट्रीय महासचिव भगवानदास साबनानी, जबलपूर कॅंट आमदार अशोक रोहाणी, साधुसंत आणि मान्यवर उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0