मुंबई : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ सिरपमुळे १९ बालकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी एक कठोर निर्णय घेत, लहान मुलांच्या आरोग्यासाठी तातडीने या सिरपवर राज्यात बंदी घालण्याचे आदेश दिले. आता राज्यभर या सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.
मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि आता महाराष्ट्र सरकारने देखील कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी घातली असून, ज्यांच्याकडे ही औषधे शिल्लक आहे त्यांनी ती औषध नियंत्रण अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान कोणत्याही मेडिकलमध्ये हे सिरप आढळल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री नंबरवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माध्यमांद्वारा मिळालेल्या माहितीनुसार, या कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये १६ बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी पोलिसांनी या घटनेशी संबंधित डॉ. प्रवीण सोनी आणि कोल्ड्रिफचे उत्पादक स्रेसुन फार्मास्युटिकल्सच्या संचालकांविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या अनेक कलमांखाली दाखल केलेला हा एफआयआर, परसिया कम्युनिटी हेल्थ सेंटरचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर अंकित सहलम यांच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला आहे.
कोल्ड्रिफ सिरप म्हणजेच, फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड, क्लोरफेनिरामाइन मॅलेट, बॅच क्रमांक SR-13, ही सिरप बॅच मे २०२५ मध्ये तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील सुंगुवरचाथिराम येथील स्रेसन फार्मा द्वारे उत्पादित करण्यात आली होती. त्याची मुदत एप्रिल २०२७ मध्ये संपणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेनंतर प्रयोगशाळेत या सिरपचे विश्लेषण केले असता त्यात डायथिलीन ग्लायकोल (DEG) ची उपस्थिती आढळून आली, जी सामान्यतः अँटीफ्रीझ सारख्या औद्योगिक उत्पादनांमध्ये आढळणारे एक विषारी रसायन आहे. DEG च्या सेवनाने मूत्रपिंड निकामी होऊ शकते, शिवाय अनेक शारीरिक समस्या निर्माण करू शकते.