इंदूरमध्ये दीड लाख स्वयंसेवकांचे ऐतिहासिक पथसंचलन

06 Oct 2025 19:07:43

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मध्यप्रदेशातील इंदूर विभागातील चार जिल्ह्यांतील ३४ नगरांत एकाच वेळी पथसंचलन काढण्यात आले. या भव्य संचलनाने संपूर्ण शहर राष्ट्रभक्ती आणि संघटनभावनेने भारावून गेले होते. इंदौर महानगरातील सर्व नगरांचे संचलन स्थानिक मुख्य मार्गांवरून निघाले. प्रत्येक नगरातील संचलनाचा मार्ग साधारण ३ ते ४ किमी होता. या प्रकारे पथसंचलन महानगरातील विविध ठिकाणी एकूण १७० किमी मार्गावरून गेले. या विराट आयोजनात सुमारे दीड लाख स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभाग घेतला. यावेळी घोष पथक आणि स्वयंसेवकांची शिस्तबद्धता संपूर्ण वातावरण राष्ट्रभावनेने भारून टाकत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांनी फुले उधळून स्वयंसेवकांचे स्वागत केले.

हे आयोजन फक्त संघटनेच्या सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हते, तर समाजात शिस्त, समरसता आणि देशभक्तीचे मूल्य पुन्हा जागृत करण्याचा एक प्रभावी प्रयत्न होता. ज्येष्ठ स्वयंसेवकांसाठी विशेष मंच व व्यवस्था करण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणाला संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने विशेष शोभा प्राप्त झाली. सहसरकार्यवाह अरुण कुमार, मध्य क्षेत्र कार्यवाह हेमंत मुक्तिबोध, प्रांत प्रचारक राजमोहन आणि प्रांत संघचालक डॉ. प्रकाश शास्त्री मुख्यत्वे उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0