रत्नागिरी : मी कोकणच्या भूमितून येतो. कोकणातही सहकाराच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी घडाव्यात ही मानसिकता आहे. निश्चितच आगामी काळात कोकणात सहकार वाढलेला दिसेल, असा दृढ विश्वास भाजपा गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. ते रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार प्रविण दरेकर आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरी जिल्हा बँक, स्वामी स्वरूपानंद पतपेढीला सदिच्छा भेट दिली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाशी संलग्न असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सहकारी बोर्डाची बैठकही यावेळी पार पडली.
या बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, राज्य सहकारी संघ महाराष्ट्राचा शिखर संघ आहे. या संघाची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १०६ वर्षांपूर्वी केली. त्या संघाचे नेतृत्व करताना कोकणात सहकार वाढला पाहिजे, वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक विकासाला बळकटी मिळाली पाहिजे या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी बोर्ड आहेत त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कोकणात सहकाराच्या माध्यमातून संस्था नावीन्यपूर्ण करता येतील का? असणाऱ्या संस्थांच्या अडचणी काय आहेत? आणि भविष्यात कोकणात सहकार वाढावा यासाठी आराखडा बनवता येतो का? यावर बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून कोकणच्या सहकाराला दिशा मिळेल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले कि, कधीकाळी ग्रामीण भागाचा विकास सहकाराच्या माध्यमातून झाला. पश्चिम महाराष्ट्र विकसित झाला. तिकडे साखर कारखानदारी, सूत गिरण्या उभ्या राहिल्या आणि तेथील अर्थव्यवस्था बळकट, शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती झाली. आज कोकणात फलोत्पादन, मासेमारीवर प्रक्रिया करणारा उद्योग सहकारी तत्वावर होऊ शकतो. पर्यटनाच्या माध्यमातून सहकाराचे जाळे उभे करता येईल. कोकणात मोठ्या प्रमाणावर काजू, नारळ, कोकमचे उत्पादन होते. पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर संधी आहे. या सर्व गोष्टींत सरकारच्या मदतीने, बँकेकडून अर्थपूरवठा करून आणि येथे सहकारी संस्था उभी करून लोकं पुढे आली तर अशा प्रकारचे प्रकल्प, योजना करण्याचा मानस असल्याचेही दरेकरांनी स्पष्ट केले.