मुंबई : मालेगाव महानगरपालिकेने ३ हजार २७३ अपात्र लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द केले असून त्यांची नावे मतदार यादीतून वळण्यात यावी, या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आहे.
मालेगाव महानगरपालिकेने गेल्या आठवड्यात ३ हजार २७३ विलंबित जन्म नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केले असून अर्जदारांनी ही प्रमाणपत्रे बनावट पद्धतीने मिळवली होती. ही ३ हजार २७३ नावे जन्म नोंदणीच्या सीएसआर पोर्टलवरून देखील वगळण्यात आली आहेत. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसआयटीही नियुक्त केली होती. तसेच ५ एफआयआर नोंदवण्यात आले असून ५३९ आरोपींची नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. यासंदर्भातील पुढील चौकशी सुरू आहे.
अलीकडेच यूआयडीएआयने महाराष्ट्रातील ४७ हजार आधार कार्ड रद्द केले आहेत. या ४७ हजार व्यक्तींनी २०२४ मध्ये बनावट कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्रे मिळवली होती. त्यानंतर आता त्यांचे आधार कार्ड रद्द आणि बनावट पद्धतीने मिळवलेले जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. अशा ३ हजार २७३ व्यक्तींना कोणताही अधिकृत अधिकार नसून त्यांच्याकडे भारतात जन्म झाल्याबद्दल कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा पुरावे नाहीत. शेकडो अर्जदारांनी विलंबित जन्म नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्जासोबत त्यांचे मतदार ओळखपत्र देखील जोडले आहे. त्यामुळे मतदार यादीतील या ३ हजार २७३ व्यक्तींची नावे वगळण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केली आहे.