कोकणातील निर्जीव वाटणार्या सड्यांनादेखील जैवविविधतेचा आधार आहे. त्या आधाराला बळकटी देत केवळ ‘सडे वाचवा’ अशी बोंब न ठोकता, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपली आहे, असे मानून देवरुखची ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ ही संस्था काम करत आहे. त्यांना ‘महाराष्ट्र जैवविविधता मंडळा’च्या महाराष्ट्र जीन बँकेचे पाठबळ मिळाले आहे. सडे संवर्धनाच्या प्रयोगाविषयी माहिती देणारा हा लेख...
कोकणातील परिसरात अनेक परिसंस्था आढळतात. कोकणातील कातळ सडे (Rocky Laterite Plateaus) ही अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण पण दुर्लक्षित परिसंस्था आहे. एरव्ही ओसाड वाटणारे सडे पावसाळ्यात जेव्हा जागृत होतात, तेव्हा त्यावर रंगीबेरंगी फुलांची उधळण होते. सड्यावरील अनेक वनस्पती या जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. मात्र, फक्त या परिसंस्थेतच आढळतात, त्यामुळे ओसाड वाटणारे हे सडे अनेक दुर्मीळ, संकटग्रस्त वनस्पतींचे आश्रयस्थान आहे. मागील काही वर्षांपासून सड्यांवर होणार्या खाणी, बांधकामे, शेती विस्तार यांमुळे अनेक दुर्मीळ आणि स्थानिक वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच या वनस्पती आणि सड्यांचे संवर्धन करणे अत्यावश्यक ठरते.
या सर्व पार्श्वभूमीवर देवरुखच्या ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ने ‘महाराष्ट्र जैवविविधता मंडळा’च्या ‘महाराष्ट्र जीन बँके’च्या सहकार्याने ‘रत्नागिरीतील कातळ सड्यांवरील संकटग्रस्त वनस्पती संपदेचे शाश्वत संवर्धन आणि लोक सहभागातून व्यवस्थापन’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश सड्यांवरील जैविक संसाधनांचे, वनस्पतींचे संवर्धन आणि त्यातून स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळवून देणे हे आहे. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे प्रतीक मोरे हे या प्रकल्पाचे अन्वेषक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक कातळसडे असून या प्रकल्पांतर्गत त्यातील महत्त्वाचे २१ सडे विविध निकष लावून निवडण्यात आले आहेत. ज्यामध्ये चंपक सडा, साडवली, आंबवली, देवाचे गोठणे, बारसु, तवसाळ, आंजर्ले, बुरोंडी, देवी हसोळ, केरे अशा सड्यांचा समावेश आहे.
याठिकाणी संशोधन पथकाने २०० पेक्षा जास्त सर्वेक्षणे पूर्ण करून, स्थानिक लोकांचे सडे आणि सड्यांवरील वनस्पतीविषयक पारंपरिक ज्ञान, त्यांचा सांस्कृतिक वापर याविषयी माहिती गोळा करत आहे. तसेच, संकटग्रस्त आणि इतर वनस्पती प्रजातींची आणि त्यांच्या पर्यावरणीय स्थितीची नोंद केली आहे.
संशोधनादरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रजातींची नोंद झाली. त्यात विशेष उल्लेखनीय आहेत, कोकण दिपकाडी (Dipcadi Concanense) रत्नागिरीतील स्थानिक व अत्यंत संकटग्रस्त प्रजाती, देवरुख भुईचक्र (Iphigenia Devrukhensis) फक्त देवरुख परिसरात आढळणारी स्थानिक प्रजाती. तसेच, अग्निशिखा (Gloriosa Superba), कापरी कमळ (Cleome angulata), सफेद मुसळी (Chlorophytum) यांसारख्या औषधी आणि सजावटी मूल्य असलेल्या प्रजाती.
या प्रकल्पांतर्गत संकटग्रस्त प्रजातींसाठी ‘बीज बँक’ स्थापन करून त्यात विविध प्रजातींच्या बियांची साठवणूक केली जात आहे. हा बीज संग्रह भविष्यातील संवर्धनासाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे. या प्रजातींचे बीज आणि कंद गोळा करून त्यांचे अंकुरण व संवर्धन प्रयोग सुरू आहेत. सड्यांचे महत्त्व सर्वसामान्यांना समजण्यासाठी या प्रकल्पांतर्गत ‘चला सडे जाणून घेऊया’ या संकल्पनेंतर्गत सड्यांवरील विविध वनस्पती, फुले, ऑर्किड यांसारख्या प्रजातींचे छायाचित्र प्रदर्शन, सादरीकरण तसेच व्हिडिओ दाखवले जातात. तसेच, क्षेत्रभेटीदेखील आयोजित केल्या जातात.
संवर्धन प्रक्रियेत स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, शाळा आणि वनविभाग यांचा सक्रिय सहभाग मिळावा म्हणून ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ने आतापर्यंत सहा जनजागृती कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यातून स्थानिकांनी बीजसंकलन, नर्सरी देखभाल आणि सड्यांचे रक्षण या उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. या प्रकल्पांर्गत करत असलेल्या विविध प्रयोगांपैकी एका प्रयोगाला यशदेखील मिळाले आहे. हा प्रयोग म्हणजे दिपकाडी लागवडीचा. दिपकाडी या वनस्पतीच्या संवर्धनातील प्रगतीचा. दिपकाडी कोकनेन्स ही काही काळापूर्वी ती वन्यस्थितीत नामशेष झाली असावी, असे मानले जात होते. तिला पांढर्या रंगाची सुंदर नाजूक फुले येतात. ही वनस्पती विशिष्ट प्रकारच्या मातीत आणि हवामानात येत असल्याने तिचा नैसर्गिक अधिवास हा मर्यादित आहे. त्यामुळे तिची संख्या कमी होत असल्याने ‘आययूसीएन’ या जागतिक संस्थेने तिची नोंद संकटग्रस्त (Endangered) अशी केली आहे. वेळीच तिच्या संवर्धंनासाठी प्रयत्न केले नाहीत, तर ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या कंदवर्गीय वनस्पतीचे संवर्धन करणे, आव्हानात्मक समजले जात आहे. कारण, या वनस्पतीच्या बिया रुजवणे आणि त्यापासून नवीन रोपे तयार करणे आव्हानात्मक समजले जाते. या प्रकल्पांतर्गत केलेल्या प्रयोगांना यश मिळाले असून संशोधकांनी नियंत्रित तापमान-आर्द्रतेच्या परिस्थितीत दिपकाडीच्या बियांची यशस्वी उगवण साध्य केली आहे. या हंगामात त्यांनी दिपकाडीची शेकडो नवीन रोपे तयार केली असून ती पुन्हा जवळच्या खडकाळ पठारावर पुनर्रोपित केली आहेत. त्यामुळे ही प्रजाती नैसर्गिक अधिवासात परत स्थिरावण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक लोक तिचा वापर गजरे, हार करण्यासाठी तसेच, शोभेसाठी करतात. भविष्यात अधिक प्रमाणात बीजअंकुरण, रोपवाटिका उभारणी तसेच, नैसर्गिक अधिवासात तिचे रोपण केले जाणार आहे.
या प्रकल्पाद्वारे स्थानिक लोकांच्या सहकार्याने दुर्मीळ वनस्पतींचे संरक्षण तसेच, शोभेच्या आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन, पर्यावरणपूरक पर्यटन आणि नर्सरीच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि पर्यायाने सडे परिसंस्थेचे पुनर्स्थापन शक्य होणार आहे. या माध्यमातून कोकणातील सडे संवर्धन आणि स्थानिक जैवविविधतेचे जतन करण्यासाठी एक व्यवहार्य आणि अनुकरणीय मॉडेल विकसित होत आहे. विज्ञान, समाज आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम या तत्त्वावर आधारित हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील सड्यांच्या वनसंपदेचे पुनरुज्जीवन करणारा ठरत आहे.
सडे ही दुर्लक्षित परंतु महत्त्वपूर्ण परिसंस्था वाचविण्यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटी अनेक वर्षांपासून काम करत असून महाराष्ट्र जीन बँकेच्या अनुदानामुळे या कामास बळ मिळाले आहे. इथे कोकण दिपकाडीसारख्या अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पती असून त्यांचा नैसर्गिक अधिवास संकटात आहे. दिपकाडीसारख्या प्रजाती जपणे म्हणजे कोकणचा नैसर्गिक वारसा जपणे होय. या दुर्मीळ प्रजातीचे अस्तित्व टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. या प्रकल्पामुळे अशा वनस्पतींच्या संवर्धनासाठी मदत होणार आहे.
- प्रतीक मोरे, कार्यकारी संचालक, सह्याद्री संकल्प सोसायटी
डॉ. प्रताप नाईकवाडे
(लेखक देवरुखच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आहेत.)
९५९५८२१८९१