झाला उशीर म्हणून...

06 Oct 2025 10:59:06

वसाहतवादाच्या विळख्यातून अनेक राष्ट्रांना मुक्त व्हायला एक शतकाहून अधिक काळ लागला. त्यासाठी कित्येकांनी प्राणांची आहुती दिली. मात्र, २१व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, आज शतखंडित दिसत असलेली राष्ट्रे एकेकाळी वैभवाच्या शिखरावर होती. आपले अस्तित्व टिकवून त्या राष्ट्रांनी संस्कृतीचा नवीन विचार जगाला दिला होता. मात्र, वसाहतवादी शक्तींनी आर्थिकदृष्ट्या या देशांना कमकुवत केले. समाजामध्ये भेदरेषा आखल्या, सांस्कृतिकदृष्ट्या गुलाम केले, ज्यामुळे ही राष्ट्र स्वतःची वेगळी ओळखच विसरले.


प्रत्येक राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समुदाय निवास करतात. हे समुदाय या राष्ट्रांची जीवनवाहिनीच असतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वसाहतवादाचे पाश राष्ट्रांवर घट्ट होत गेले आणि वसाहतकारी राष्ट्रांमधले विचारविश्व, अंकित झालेल्या देशांना खुणावू लागले. ‘औद्योगिक क्रांतीचा केंद्रबिंदू’ म्हणून जितका इंग्लंडचा गवगवा होता, तितकीच कीर्ती होती इंग्लंडच्या ‘ऑक्सफर्ड विद्यापीठा’ची. ऑक्सफर्डमध्ये सातासमुद्रापार एक दिवस मकेरेती पापाकुरा नावाची मुलगी आली, जिच्या प्रबंधामुळे मूलनिवासी लोकांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला.

न्यूझीलंडच्या माओरी या मूळनिवासी समुदायातील मकेरेती पापाकुरा, आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिची पदवी. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तब्बल १०० वर्षांनी,तिला मरणोत्तर पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला. मूलनिवासी जनसमूहाच्या जीवनावर प्रकाश टाकत, त्यांचे जीवन उजेडात आणणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. पापाकुरा यांच्या वंशज जून नॉर्थक्रॉफ्ट ग्रांट यांनी हा सन्मान ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून स्वीकारला. हा पदवीदान सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ बघण्यासाठी, इवी या मूलनिवासी जन तसेच, पापाकुरा यांच्या वंशावळीतील १०० जण उपस्थित होते. याप्रसंगी जून नॉर्थक्रॉफ्ट ग्रांट अत्यंत भावूक झाल्या.

मकेरेती पापाकुरा यांच्या कार्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी, आपल्याला एक शतकाहून अधिक काळ भूतकाळात जावं लागेल. १८७३ साली न्यूझीलंडमध्ये मकेरेती पापाकुरा यांचा जन्म झाला. हा काळ माओरी या मूलनिवासी समुदायाच्या स्थित्यंतराचा काळ होता. न्यूझीलंडच्या भोवती वसाहतवादी शक्तींचा फास आवळत होता. एका बाजूला या समुदायाच्या जमिनी त्यांच्यापासून हिरावल्या गेल्या होत्या, तर दुसर्‍या बाजूला सांस्कृतिक र्‍हासालासुद्धा सुरुवात झाली होती. व्हेकरेवरेवा या गावामध्ये पापाकुरा लहानाच्या मोठ्या झाल्या. कालांतराने उपजीविकेसाठी रोटुरा येथे काम करताना, १९०१ सालानंतर त्यांनी मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावले.

एका दशकभराच्या कालावधीनंतर सांस्कृतिक कार्यक्रम करणार्‍या एका गटासोबत त्यांनी इंग्लंडचा दौरा केला. दुर्दैवाने इंग्लंडच्या दौर्‍यावर असताना या गटाचे दिवाळं निघाले आणि अनेकजण पोटापाण्यासाठी इंग्लंडमध्येच स्थिरावले. याचदरम्यान रिचर्ड स्टेपल्स-ब्राऊन या श्रीमंत व्यक्तीसोबत त्यांनी लगीनगाठ बांधली. नंतर ऑक्सफर्डशायरला आल्यावर त्यांनी, ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. दरम्यान मानववंशशास्त्रज्ञ टी. के. पेनिमन यांच्यासोबत त्यांची मैत्री झाली. यानंतर पापाकुरा यांनी आपलं, आपल्या समुदायाचं भावविश्व जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला.

टे अरावा या उपसमुदायातील माणसांचे जीवन, प्रथा-परंपरा, लोकसंस्कृती, भाषा हे ज्ञानसंचित त्यांनी कागदांवर लिहिले. मूलनिवासी समुदायातील लोकांचे भावविश्व पहिल्यांदाच यानिमित्ताने जगासमोर प्रगट झाले. हा प्रबंध सादर करण्याच्या तीन आठवड्यांपूर्वीच, वयाच्या ५६व्या वर्षी पापाकुरा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात पेनिमन यांनी त्यांचे काम प्रकाशझोतात आणले. पापाकुरा यांच्या लिखाणामुळे, माओरी समुदायातील अनेकांना आपल्या वारशाची ओळख पटते आहे. पापाकुरा हयात नसल्यामुळे त्यांच्या कार्याची महती अनेक दिग्गजांना कळली नाही. वसाहतवादी विचारांचा प्रभाव विद्याशाखांवरदेखील असल्यामुळे, पापाकुरा यांचे कार्य लोकांसमोर यायला इतका कालावधी लोटला.

पाश्चिमात्य विद्यापीठांकडे बघताना, ही विद्यावाचस्पतींची मांदियाळी असा विचार करूनच अनेकांना त्या वास्तुमध्ये आयुष्यात एकदा तरी पाऊल ठेवावेसे वाटते. मात्र, पापाकुरा यांच्या कार्याच्या ‘उशिरा’ झालेल्या गौरवामुळे, ज्ञानाचे सत्ताकेंद्र असलेल्यांचे मातीचे पाय उजेडत आले आहेत.
Powered By Sangraha 9.0