महाराष्ट्रात मासेमारी करणार्या समाजातील अनेक समुदायांचे समुद्रातील जीवांशी निरनिराळ्या प्रकारचे नाते आहे. प्रत्येक समाज समुद्रात अधिवास करणार्या मत्स्य प्रजाती आणि सागरी सस्तन प्राण्यांशी वेगवेगळ्या पद्धतीने सहजीवन करतो. याच सहजीवनाचे नाते उलगडणारा हा लेख...
जीवनशैली (way of life), विचारशैली (way of thinking) आणि उपासनाशैली (way of workship) या त्रयीतून संस्कृती उभी राहते. यातील प्रत्येक पैलू हा त्या संस्कृती अनुरूप जीवन जगणार्या मानवी समाजाला प्रभावित करत असतो. महाराष्ट्राच्या सागरकिनारी राहणार्या व मासेमारी करून आपली उपजीविका करणारा मच्छिमार समाज याला अपवाद नाही. म्हणूनच पालघरमधील वैती, मांगेला, मांची मच्छिमार समाज, ठाणे-मुंबई-रायगड येथील कोळी, आगरी मच्छिमार समाज, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील कोळी, गाबीत मच्छिमार समाज यांच्या संस्कृतीमध्ये आपल्याला तुलनात्मक फरक दिसून येतो. या विचारधारेतील फरक अनुरूप या मच्छिमार समाजातील मंडळी मासेमारी करताना त्यांच्या मासेमारी जाळ्यात काय अडकत आहे आणि समुद्रात कोणते जीव दिसतात, याबाबत त्यांच्या परस्पर नात्यात कधी संघर्ष दिसून येतो, तर कधी सहजता.
संपूर्ण महाराष्ट्राचा सागरकिनारी जवळपास २५ मासेमारी क्षेत्र आणि प्रमुख १७३ मासे उतरवणी केंद्रे आहेत. ज्यावर जवळपास ४५६ मच्छिमार समाजाची गावे आहेत. ज्यात ८१ हजारांपेक्षा अधिक मच्छिमार कुटुंब आपले जीवन जगत आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर आपल्या इकडे मासे म्हणून जे काही आहे, अशा ४१५ मत्स्यप्रजाती, २७ जातीच्या कोळंबी, ५४ जातीचे खेकडे, चार जातीचे शेवंड आणि माकूळ व ज्याबद्दल आपल्याला माहीत नसेल अशा बर्याच जातीचे शंख, शिंपले आणि इतर सागरी जीव आहेत, जे मासेमारी करताना जाणीवपूर्वक किंवा चुकून पकडले जातात.
बहुसंख्य मच्छिमार समाजातील मंडळी ही ‘समुद्री कासव’ जर कधी आपल्या जाळ्यात अडकले, तर बर्याच वेळा त्याला जाळ्यातून मुक्त करतात. कारण, यात कासव भगवान विष्णुचे रूप समजले जाते. बर्याच वेळा असे कासव जेव्हा जखमी अवस्थेत सापडते, तेव्हा त्याला बोटीवर असलेल्या हळद किंवा चंदन लावून समुद्रात सोडले जाते. नारळ आणि अगरबत्ती वाहून त्याची सुटका केली जाते. रत्नागिरीमध्ये मला व्यक्तिगतरित्या जेव्हा काही गाबीत समाजातील मंडळीची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, तेव्हा ही मंडळी समुद्री कासव यांना अपशकुन मानतात, अशी माहिती मिळाली. म्हणूनच ही मंडळी कासव समुद्रात दिसले की, त्यापासून आपली बोट दूर करतात किंवा जर ते जाळ्यात अडकले, तर त्याला लगेच समुद्रात सोडून देतात. या मागे विचार असतो की, हे कासव सोबत असणे किंवा आपल्यामुळे ते मृत होणे हे अशुभ आहे. यात विशेष गोम म्हणजे ‘लेदर बॅक’ समुद्री कासव प्रजातीबद्दल विशेष अंतर राखून असतात.
गादा, गादा रेडा, मामा म्हणून ही मच्छिमार मंडळी आपल्या सागरी क्षेत्रात राहणार्या ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन’बद्दल विशेष उत्सुक असतात. बर्याच वेळा हे डॉल्फिन मासेमारी करताना मासेमारी करणार्या बोटीच्या अवतीभवती विचरण करत असतात. कधी ते ट्रॉलरमधील मासे खातात, तर कधी शोर साईन पद्धतीने मासे पकडण्याच्या जाळी ओढताना बाहेर पडणारे मासे हळूच मटकवतात. पण, सुदैवाने महाराष्ट्रात आज देखत डॉल्फिनची शिकार मच्छिमार मंडळीने केली, अशी नोंद नाही आहे. याउलट दुर्दैवाने कधी हे डॉल्फिन जाळ्यात अडकले, तर ही मंडळी त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न आवर्जून करतात.
गुजरातमधील वलसाड येथील व्हेलचे मंदिर आहे. जेथे व्हेल ही देव म्हणून पुजली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्रातदेखील व्हेल वा सोप्या शब्दांत ‘देवमासा’ मत्स्य अवतार म्हणून पुजला जातो. मच्छिमार मंडळी जेव्हा कधी असे देवमासे समुद्रात दिसतात, तेव्हा आवर्जून नारळ आणि अगरबत्ती दाखवून आपली समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जेव्हा मासेमारी केवळ नफा आणि उपभोग या तत्त्वांवर आधारित असते, तेव्हा जाळ्यांमध्ये अडकलेले दृश्य अत्यंत भयावह ठरते.
विशेषतः समुद्री सस्तन प्राण्यांसाठी. ’सिटेशियन’ म्हणजेच डॉल्फिन आणि व्हेलसारख्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जगभरात ट्यूनाच्या गिलनेट मासेमारीमुळे दरवर्षी सुमारे एक लाख ’सिटेशियन’ मृत्युमुखी पडतात, तर १९५० ते २०१८ या काळात एकूण ४.१ दशलक्ष ’सिटेशियन’ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतामधून दरवर्षी दहा हजारांहून अधिक सिटेशियन मृत्युमुखी पडत असल्याचा अंदाज आहे. पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक भागातील पर्ससीन मासेमारीमुळे हजारो डॉल्फिन्स मारले गेले होते. ही समस्या हाताळण्यासाठी प्रजातींची असुरक्षितता ओळखून माहिती संकलनात सुधारणा करणे आणि प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणणे अत्यावश्यक आहे.
याउलट मासेमारी जेव्हा उपासना आणि पूजाभाव धरून केली जाते, तेव्हा मासेमारी बोट हे देवाचे तरंगणार मंदिर ठरते. ‘टेम्पल्टन’ आणि ‘रॅमॉन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते भारतीय तत्त्वज्ञानी पांडुरंगशास्त्री आठवले यांनी मच्छिमार समाजाला याच तत्त्वावर ‘मत्स्यगन्धा’ हा प्रयोग दिला आहे. ज्या माध्यमातून ही मच्छिमार मंडळी मासेमारी करताना मासेमारी, सागरपूजन आणि समुद्र संवर्धन ही त्रयी संतुलित केली जाते.
मासेमारी समाजातील समुद्रासोबतच असलेले सकारत्मक नाते समजून घ्यायचे असेल, तर या मंडळी काही सामाजिक पैलू समजून घ्यावे लागतील. यात रायगड जिल्हात काही भागांत गौरी-गणपतीला चिंबोरी/खेकडे यांचे प्रसाद स्वरूप देवाला अर्पण करणे हे विशेष आहे! त्याचबरोबर मुंबईलगत असलेल्या खांदेरी बेटावर असलेले वेताळ देवाचे मंदिर आणि तिकडे मच्छिमार मंडळी देवाला जाळ्यात कधी चुकून मृत अवस्थेत अडकलेल्या ‘सॉ फिश’ची सोंड देवाला अर्पण करतात. या लेखाच्या शेवटी नक्की असे सांगू शकतो की, भारतातील इतर राज्याशी तुलना करता महाराष्ट्रातील मच्छिमार, मासेमारी आणि सागरी जीव यांतील संबध हा सहज किंवा सहकारात्मक संघर्षाचा आहे.
प्रदीप चोगले
(लेखक सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
९०२९१४५१७७