मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या गोल्ड मार्केटमध्ये सुरू असलेल्या झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवलचा आकर्षणबिंदू म्हणजे झवेरी बाजारच्या मध्यवर्ती भागात तयार करण्यात आलेली अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती. मुंबादेवी मंदिरापासून थोड्याच अंतरावर तयार केलेल्या या प्रतिकृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एका बाजूला या महोत्सवामध्ये असणारी रोषणाई आणि झगमगाट डोळे दीपावणारा आहे तर दुसऱ्या बाजूला, मध्यवर्ती भागात असलेल्या राम मंदिराच्या प्रतिकृतीने सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. थोड्याच दिवसांनी दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरू होईल या पार्श्वभूमीवर, जवेरी बाजारच्या व्यापारविश्वामध्ये सुरू असलेली तयारी, ग्राहकांच्या मागणीनुसार तर कधी कारागिरांच्या कौशल्यानुसार दागिने घडवण्याचे, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत ते दागिने पोहोचवण्याचे काम आता जोमाने सुरू झाले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या अर्थकारणाला आणि ग्राहकांच्या खरेदीला चालना मिळेल असे दिसून येत आहे.