रा. स्व. संघ शताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

05 Oct 2025 12:26:53

‌‘डॉ. बाबासाहेबांनी संघ नाकारला, रा. स्व. संघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे‌’ वगैरे वगैरे म्हणत, काही ठराविक लोक समाजात सातत्याने अफवा पसरवतात. पण, पुराव्यासहित वास्तव काय आहे तर, आजच्या युगात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारे कुणी असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिकार्याचा जागर करणारे कुणी असेल, तर रा. स्व. संघ! या लेखात रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त, रा. स्व. संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्याचे जुळलेले ऋणानुबंध यांचा घेतलेला मागोवा...

रा. स्व. संघ शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर‌’ या विषयाचा मागोवा घेताना प्रकर्षाने आठवला तो एक परिसंवाद. परिसंवाद होता ‌‘रा. स्व. संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर‌’ या विषयावर मुंबईमध्ये. त्या परिसंवादामध्ये असलेले वक्त म्हणाले , “बाबासाहेबांना रा. स्व. संघाने छळले. बाबासाहेब कसे मुस्लीम किंवा मार्क्सविरोधी नव्हते वगैरे वगैरे.” त्यावेळी परिसंवादाचे प्रमुख वक्ते आनंद तेलतुंबडे यांना मी विचारले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतके हिंमतवान होते की त्यांना एखाद्याचे विचार पटले नाही, कृती पटली नाही, तर त्यासंदर्भात बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात त्यासंदर्भात स्पष्ट लिहिले आहे. मग रा. स्व. संघ त्यांना छळत असताना, त्रास देत असताना, त्यांनी कुठेच का काही लिहिले नाही.” त्यावर तेलतुंबडे म्हणाले, “ते जिवंत असताना त्यांना छळत होते, असे कुठे म्हणालो?” मी म्हणाले, “माझ्याकडे पूर्ण भाषणाची रेकॉर्डिंग आहे.” पण, अर्थातच यावर त्यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. तर हे सारे आठवण्याचे कारण की, रा. स्व. संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा शब्द जरी ऐकला, तरी लगेच काही ठराविक लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाला कसे नाकारले किंवा संघाने बाबासाहेबांच्या विचारांना कसा विरोध केला, हेच सांगतात. बरं यांना विचारले की, बाबासाहेबांनी कधी संघ नाकारला ते सांगा? तर उत्तर असते, 1951 साली ‌‘फेडरेशन ऑफ शेड्युल कास्ट‌’च्या जाहिरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिले की, ”फेडरेशन हे हिंदू महासभा किंवा रा. स्व. संघासारख्या प्रतिक्रियावादीसोबत जाणार नाही.” पण, याच जाहिरनाम्यात बाबासाहेबांनी ठामपणे स्पष्ट शब्दांत लिहिले की, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि संसदीय लोकशाही नष्ट करून, हुकूमशाही स्थापित करणाऱ्या आणि हुकूमशाहीवर विश्वास असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षासोबतही फेडरेशन कधीच गठबंधन करणार नाही. याचाच अर्थ डॉ. बाबासाहेबांच्या मते कम्युनिस्ट पक्ष हा वैयक्तिक स्वातंत्र्याविरोधात आणि संविधानात्मक लोकशाहीविरोधात म्हणजेच, संविधानाविरोधी असणारा पक्ष आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “काँग्रेस हे जळके घर आहे.” याच पार्श्वभूमीवर ‌‘थॉट्स ऑन पाकिस्तान‌’ पुस्तकातही त्यांनी मुस्लीम समुदायाबाबत जे विचार मांडले, त्या विचारांबाबत बाबासाहेब संघविरोधी होते अशी लोणकढी थाप मारणारे लोक चकार शब्दही काढत नाहीत. कारण, डॉ. बाबासाहेब हे रा. स्व. संघाचे विरोधी होते असे समाजात खोटेच सांगून त्यांना, रा. स्व. संघाची प्रतिमा डॉ. बाबासाहेब आंबेडकरविरोधी करायची आहे. का? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, हे बाबासाहेबांच्या केवळ नावासाठीही काहीही करू शकतात. संघशक्तीला घाबरलेल्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे आहे. त्यामुळे बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या निष्ठावान ऊर्जावान समाजाचा त्यांना वापर करायचा आहे.

असो! खरे तर ‌‘माझा रा. स्व. संघाला विरोध आहे,‌’ असे डॉ. बाबासाहेबांनी कुठेही म्हटलेेले आढळत नाही. पण, या महामानवाच्या नावाचा खोटा आधार घेत, काही लोक बाबासाहेबांना संघविरोधी ठरवतात. रा. स्व. संघाच्या किंवा विचारसंबंधित संस्थेच्या व्यासपीठावर सन्मानाने निमंत्रण आले, तर काही लोक म्हणतात की संघाची विचारधारा वेगळी आहे. काय म्हणावे? रा. स्व. संघाची अशी कोणती वेगळी विचारधारा आहे? बरं असे जर असते, तर डॉ. बाबासाहेबांनी तसे नमूद केलेच असते. पण, तसे कुठे दिसत नाही. इतकेच काय? बाबासाहेबांनी रा. स्व. संघाच्या शाखेला भेट दिल्याचेही पुरावे आहेत. एका क्लिपिंगनुसार दि. 9 जानेवारी 1940 रोजी पुण्याच्या मराठी दै. ‌‘केसरी‌’मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रा. स्व. संघाच्या शाखेत आले होते, अशी बातमी होती. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक दत्तोपंत ठेंगडी यांनी याबाबत अनेक आठवणी लिहल्या आहेत. इथे विशेष बाब ही की, दत्तोपंत हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते पण, तरीही ते डॉ. बाबासाहेबांचे स्वीय सचिवही होते. याचाच अर्थ दत्तोपंत हे रा. स्व. संघाची विचारधारा मानणारे आहेत, म्हणून ते विरोधक आहेत, असे डॉ. बाबासाहेब कधी मानत नसत. उलट रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांवर त्यांचा विश्वास होता. आता काही लोक म्हणतील की, डॉ. बाबासाहेब यांनी संघाच्या शाखेला भेट दिली हे संघवालेच म्हणतात. पण, तसे नाही तर बाळासाहेब साळुंके हे डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी होते. त्यांचे पुत्र कश्यप साळुंके आणि भानुदास गायकवाड यांनी त्यांच्या ‌‘आमचे साहेब‌’ या पुस्तकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसदर्भात विविध आठवणी संकलित केल्या आहेत. ते लिहतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवारांची भेट पुण्यामध्ये भाऊसाहेब गडकरी यांच्या घरी झाली. भाऊसाहेब अभ्यंकर आम्हा सगळ्यांना संघाच्या ग्रीष्मकालीन शिबिरामध्ये घेऊन गेले. तिथे बाबासाहेबांनी ‌‘सैन्य अनुशासन आणि संगठन‌’ यांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. हा संदर्भ ‌‘आमचे बाबासाहेब‌’ पुस्तकामध्ये पान क्रमांक 25 आणि 53 वर आहे. तसेच स्पष्ट उल्लेख पान क्र 25च्या शेवटच्या परिच्छेदामध्ये आहे.”

बाबासाहेब संघाच्या शाखेला भेट दिली की नाही, याबद्दल बोलताना एका विद्रोही विचाराच्या माणसाने म्हटले की, “गेलेही असतील बाबासाहेब संघ शाखेच्या भेटीला; पण ते काही मुद्दाम तिथे स्वतःहून गेले नव्हते. तर ते ज्यांच्या घरी गेले होते, त्या यजमानांनी त्यांना तिथे नेले.” असे म्हणणाऱ्यांना बाबासाहेब कधी कळलेच नाहीत. कारण, बाबासाहेब त्यांच्या विचारांवर ठाम होते. त्यांना एखादा विषय समाजविरोधी वाटला, तर त्यांनी त्या विचाराला कायम विरोध केला. अशा विचारांच्या व्यासपीठावर ते कधीही गेले नाहीत आणि गेलेच प्रखर समाजभान असलेले विचार मांडूनच आले. पण, रा. स्व. संघाच्या शाखेत ते आले आणि आपलेपणाने मार्गदर्शनही केले. तरीही बाबासाहेबांचा संघाला विरोध होता, असे म्हणणारे लोक कोणत्या जगात वावरतात देव जाणे!

असो! ‌‘स्वतः अनुभूती घ्या, त्याशिवाय विश्वास ठेऊ नका,‌’ असा तथागत बुद्धांचा संदेश आहे. त्यानुसार संघ स्वयंसेवक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रणालीच्या सूत्रांनुसार समाजहित साधत असतात, हे मी अनुभवले आहे. त्यामुळेच ठामपणे म्हणू शकते की, आजच्या युगात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी म्ाानून विचारकार्य करणाऱ्यांमध्ये, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक प्रथम क्रमांकावर आहेत. बुद्धांची करूणा-शांती-मैत्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‌‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय‌’ या सूत्रानुसारच, संघ स्वयंसेवक मार्गक्रमण करीत आहेत. एक उदाहरण द्यायलाच हवे. ‌‘समाज अस्तित्व भविष्य आणि प्रगती‌’ या विषयावर चिंतन आणि मार्ग शोधण्यासाठी, पुण्यात भटके-विमुक्त समाज एकत्रित येणार होता. त्याचे नियोजन मी केले होते. त्यांची इच्छा होती की, रा. स्व. संघाने यामध्ये सहकार्य करावे, संवाद साधावा. सध्याचे सरकार्यवाह अतुल लिमये, संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह सुमंत आमशेकर आणि सध्याचे कोकणप्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, पुण्याचे हेमंत हरहरे यांच्याशी यापूवच या समाजसंवाद कार्यक्रमाबद्दल बोलणे झाले होते. कार्यक्रमाला समाजातले कर्तृत्ववान उच्चशिक्षित आणि त्याचबरोबर समाजातल्या रीतिभाती जाणाऱ्या ज्येष्ठ महिला असे निवडक लोक येणार होते. कार्यक्रम 2020 साली होणार होता पण, याच काळात कोरोनाने हाहाकार उडाला. कार्यक्रम रद्द करावा का? असा विचारही मनात आला. पण, समाजाचे मान्यवर तयार नव्हते. त्यांनी विनंती केली की, “आम्ही तयार आहोत. सर्व प्रकारची काळजी, नियम आम्ही पाळू. त्यामुळे रा. स्व. संघाच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला यावे. यानिमित्ताने समाजातील सुशिक्षित आणि संपन्न लोक एकवटले आहेत.” खरे तर त्यावेळी पुण्यात ‌‘कोरोना‌’मुळे परिस्थिती भीषणच होती. पण, समाजाने विश्वास ठेवत समाजसंवादामध्ये सहभागी व्हायला सांगितले, म्हणून प्रमुख मार्गदर्शक असलेले सह सरकार्यवाह अतुल लिमये आणि त्यांच्यासोबत मान्यवर स्वयंसेवक आले. हे सगळे स्वयंसेवक पूर्ण दिवस थांबले. समाजाच्या विकासासाठी काय करता येईल, याबद्दल त्यांनी एक नियोजनही केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित सगळ्यांनाच समाधान वाटले. भटक्या-विमुक्त समाजाची परिस्थिती तशी भीषणच होती पण, या परिस्थितीमध्येही समाजाला जगण्याचा, प्रगतीचा आशेचा मार्ग दाखवण्यासाठी संघ स्वयंसेवक पुढे आले होते. हो, या कार्यक्रमाचे फोटो किंवा बातमी करून प्रसिद्ध करायची नाही, ही सक्त सूचना संघ स्वयंसेवकांची होती. शोषित-वंचितांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणलेच पाहिजे, हा ध्यास या स्वयंसेवकांचा होता. आजवर भेटलेल्या प्रत्येक स्वयंसेवकामध्ये हा ध्यास मी पाहिला आहे. त्यांची नामावली केली, तर त्यावर एक पुस्तकच होईल.

दुसरीकडे डॉ. बाबासाहेब संघविरोधी नाहीत; पण रा. स्व. संघ बाबासाहेबांचा विरोधक आहे असे गैरसमज पसरवले जातात. पण, हे तर धादांत खोटेच आहे. कारण, डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे अनेक सेवा प्रकल्प रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी उभे केले आहेत. तळागाळातील समाजाने समाजाच्या मूळ प्रवाहात यावे म्हणून, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक उत्थान करण्यासाठी हे प्रकल्प काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. त्या संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला जगता यावे, यासाठी संघ स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या स्तरावर योगदान देत आहे. ‌‘एक गाव, एक पाणवठा, एक स्मशान‌’ यासाठी देशभर रा. स्व. संघाचे अभियान सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, संघशताब्दीनिमित्त ‌‘सामाजिक समरसता‌’ हे संघ स्वयंसेवकांचे ध्येय आहे. संघाच्या एकात्मता स्त्रोतामध्ये, स्वयंसेवक महापुरुषांचे पुण्यस्मरण करतात. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण केले जाते, त्यांच्या कार्याला वंदन केले जाते. कालपरवाच संघाच्या कार्यक्रमात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, “संघ मनुस्मृतीने नाही, तर भीमस्मृतीने चालतो.” रा. स्व. संघाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली ही मानवंदनाच आहे. रा. स्व. संघाची शताब्दी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्याचीही शताब्दीच आहे, असेच म्हणायला हवे.

Powered By Sangraha 9.0