मुंबई : या सणासुदीच्या हंगामात तेलंगणात दारू विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दसऱ्याच्या तीन दिवस आधी म्हणजेच २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत तेलंगणात तब्बल ७०० कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. यंदा दसरा आणि गांधी जयंती एकाच दिवशी आल्यामुळे, २ ऑक्टोबर, गांधी जयंतीनिमित्त असलेल्या 'ड्राय डे'ची तजवीज मद्यप्रेमींनी तीन दिवस आधीच केली. त्याचा फायदा राज्याच्या तिजोरीला असा झाला की, ३० सप्टेंबर रोजी रेकॉर्ड ब्रेक ३३३ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. त्यामुळे केवळ मद्यातून तेलंगणा राज्याला ६९७.२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
२०१४ मध्ये तेलंगणा राज्याची स्थापना झाल्यापासून, दारू विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये, विक्री ₹१०,००० कोटी होती आणि २०२४-२५ मध्ये ₹३४,६०० कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
सीआयएबीसीने (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज) दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय विक्रीत ५८ टक्के वाटा असलेल्या दक्षिण भारतीय राज्ये भारतीय बनावटीच्या परदेशी दारू (आयएमएफएल) साठी आघाडीची बाजारपेठ राहिली आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच दक्षिणेकडील राज्यांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २३१.८ दशलक्ष आयएमएफएल दारूची विक्री केली आहे.
या रेकॉर्डब्रेक विक्रीने तेलंगणा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला असला, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्याचे सेवन चिंता वाढवणारे आहे. मद्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असल्याने, आरोग्य तज्ज्ञ यापासून लांबच राहण्याचा सल्ला देत आहेत.