कल्याणमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी विजयादशमी पथसंचलन उत्साहात संपन्न

05 Oct 2025 18:39:08

कल्याण : देशाच्या जडण घडणीत अतिशय महत्त्वाचा वाटा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्याण जिल्ह्यातील विवेकानंद नगरातर्फे रविवारी सकाळी आयोजित शताब्दी विजयादशमी पथसंचलन दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पावलांतून पथ संचलनाद्वारे विविध भागांमध्ये राष्ट्रभक्तीची लहर पसरवल्याचे दिसून आले.

कल्याण पश्चिमेतील सुभाष नगर - वाडेघर मार्गावर असलेल्या विवेकानंद नगरातील शशांक शाळेपासून या पथ संचलनाला सुरुवात झाली. तिथून पुढे लालचौकी येथील शिंदे मळा, एम के हायस्कूल मार्ग, संत गजानन महाराज नगर, बेतुरकर पाडा, सहजानंद चौक, जैन सोसायटीमार्गे संतोषी माता रोड परिसरातील नवजीवन शाळेच्या मैदानात या संचलनाचा समारोप करण्यात आला. नेहमीप्रमाणेच अतिशय नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे पथ संचलन करण्यात आले. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या पथसंचलनाच्या माध्यमातून संघाच्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. तर हे पथसंचलन जाणाऱ्या मार्गावरील शिंदे मळा बैठक, गजानन महाराज मंदिर, इस्कॉन कल्याण, सुंदर नगरसह विविध संस्था आणि सोसायटींकडून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

संघाचा भाग होणे हे केवळ सन्मानाचे नव्हे तर राष्ट्रचेतना जागवणारे अनुभव आहे. “आपल्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे. संघटन, राष्ट्रभक्ती आणि शिस्त ही संघाची खरी ताकद आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी सहभागी झालेल्या संघस्वयंसेवकांकडून व्यक्त करण्यात आली. व्यक्तिमत्व विकास, समाजाशी घट्ट नातं जोडण्याची प्रेरणा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देण्याची शिकवण हीच संघाची खरी ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच “संघाचे पथसंचलन हे केवळ शिस्तबद्ध रांगेतून चालणे नाही, तर तो राष्ट्रशक्तीचा साक्षात्कार आहे. यामुळे स्वयंसेवकांमध्ये दृढविश्वास, आत्मबल आणि देशासाठी सेवा करण्याची प्रेरणा निर्माण होत असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान विजयादशमीनिमित्त येथील महावीर जैन शाळेमध्ये आयोजित शतकपूर्ती सोहळ्यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये स्वामी मंदारनाथाचे मंदार भालचंद्र लेले हे प्रमुख अतिथी तर कल्याण जिल्हा बौद्धिक प्रमूख वैभव विजयकुमार जवळेकर हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट, कार्य, संघटनशक्ती, राष्ट्रकार्य आदी मुद्द्यांवर ऊहापोह करण्यात आला. या कार्यक्रमाला कल्याण शहर परिसरातील अनेक नामांकित सामाजिक संस्था, संघटना आणि मान्यवर व्यक्ती सहभागी झाले होते.


Powered By Sangraha 9.0