गुणवंतांच्या वाढत्या संख्येमुळे गुणगौरव समारंभ शाखांवर होणार: विद्यासेवक पतपेढी अध्यक्ष सुधीर घागस

05 Oct 2025 18:36:10

कल्याण : विद्यासेवक पतपेढीतील सभासदांच्या गुणवंत पाल्याचा उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येतो. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. वाढती संख्या पाहता एकत्रित कार्यक्रमासाठी वेळ अपुरा पडत आहे. यासाठी पुढील वर्षापासून गुणगौरव कार्यक्रम पतपेढीच्या ८ शाखांत विभागून करण्यात येईल ,असे पतपेढीचे अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विद्यासेवक पतपेढी ही ठाणे व पालघर जिल्ह्यातील नामवंत पगारदार पतसंस्था आहे. या पतपेढीचे सुमारे ७ हजार सभासद असून ३८ वर्षापासून गुणवंत सभासद व पाल्यांचा उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येतो आहे. संस्थेचे संस्थापक वसंत बापट, जयंत ओक व माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सुरू केलेला हा उपक्रम अखंड सुरू ठेवला आहे. हा कार्यक्रम कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता . या गुणगौरव कार्यक्रमासाठी पदवीधर आमदार ॲड.निरंजन डावखरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे उपस्थित होते. पाहुण्यांच्या व संचालकांच्या हस्ते शिक्षणोपयोगी व गृहोपयोगी भेटवस्तू देऊन सुमारे ९०० सभासद व पाल्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच दि.२८ सप्टेंबर रोजी पतपेढीच्या सुमारे ३०० सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता समारंभ पार पडला. हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संचालक मंडळ व पतपेढी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह सायली बुटेरे तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष दिगंबर बेंडाळे यांनी केले.


Powered By Sangraha 9.0