नेपाळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस!; पूर आणि भूस्खलनामुळे ४० जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

05 Oct 2025 18:58:49

काठमांडू : नेपाळला अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी सकाळपर्यंत पूर्व नेपाळच्या वेगवेगळ्या ठिकाणी किमान ४० जणांचा मृत्यू झाला आहे. काल शनिवार दि. ४ ऑक्टोबर रात्रीपासून, सुरू झालेल्या पावसामुळे नेपाळमध्ये महापूर आला आहे. सोबतच अनेक भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमिटी आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए) एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, 'शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नेपाळच्या कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलनामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.'

नेपाळ पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण नेपाळमध्ये वीज कोसळून तीन जणांनी जिव गमावला आहे. उदयपूर जिल्ह्यामध्ये पूरामध्ये वाहून जाऊन एकाचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता आहेत. सर्व भागांमध्ये शोध मोहिम आणि बचावकार्य सुरू आहेत, मात्र खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.

हायवेवर झालेल्या भूस्खलनामुळे, हायवे आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी अडकले आहेत. बऱ्याच ठिकाणी पूल पूरात वाहून गेल्याच्या घटना, विमानसेवेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहेत.

मात्र भारताला देखील सावध राहण्याची आवश्यकता, दक्षिण- पूर्व नेपाळमधील कोसी नदी दरवर्षी बिहारमध्ये येणाऱ्या पूराला कारणीभूत ठरते. या नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या शहरांना आणि गावांना इशारा देण्यात आला आहे.


Powered By Sangraha 9.0