1925 ते 2025 हा 100 वर्षांचा प्रवास, भारताच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण कालखंडाचा साक्षीदार आहे. नागपूरच्या मोहितेवाड्यात सुरू झालेला एक छोटासा वैचारिक प्रवाह, आज देशाच्या धमन्यांमध्ये वाहणाऱ्या एका सशक्त शक्तीमध्ये रूपांतरित झाला आहे. संघाची शताब्दी ही त्याच्या कार्याची समाप्ती नसून, एका नव्या आणि अधिक व्यापक पर्वाची सुरुवात आहे.
सन 2025 हे वर्ष केवळ एक कॅलेंडर वर्ष नाही, तर ते भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या एका विराट संघटनेच्या 100 वर्षांच्या तपस्येचे प्रतीक आहे. नागपूरच्या एका छोट्याशा कोपऱ्यात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर 1925 साली लावलेले ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाचे रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्याच्या पारंब्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत. संघाची शताब्दी केवळ एक उत्सव किंवा सोहळा नाही, तर ते एका प्रदीर्घ प्रवासाचे सिंहावलोकन, वर्तमान कार्याचे दृढीकरण आणि भविष्यातील भारतासाठी एका विराट संकल्पाची पायाभरणी आहे. ‘परम वैभव आणि संपन्न राष्ट्र’निर्मितीचे ध्येय उराशी बाळगून अविरत कार्य करणाऱ्या या संघटनेचा शताब्दी दृष्टिकोन समजून घेणे, म्हणजेच पर्यायाने भारताच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेणे होय.
डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, तेव्हा त्यांच्या समोर भारताच्या राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही अधिक गंभीर प्रश्न होता तो म्हणजे, या राष्ट्राच्या आत्मशक्तीचा ऱ्हास. शेकडो वर्षांच्या परकीय आक्रमणांनी आणि अंतर्गत विघटनाने खचलेल्या, आत्मविस्मृत झालेल्या हिंदू समाजाला त्याच्या मूळ ओळखीची जाणीव करून दिल्याशिवाय आणि त्याला शिस्तबद्ध, संघटित आणि सामर्थ्यवान बनवल्याशिवाय देशाचे खरे पुनरुत्थान शक्य नाही, ही त्यांची दूरदृष्टी होती. याच दूरदृष्टीचा पाया रचणारी ‘शाखा’ ही संघाची अनोखी कार्यपद्धती ठरली. या विचारधारेतूनच संघाचा प्रवास सुरू झाला आणि आज 100 वर्षांनंतर तो एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
संघाच्या शताब्दी दृष्टिकोनाचे मर्म समजून घेण्यासाठी, त्याची मूळ वैचारिक बैठक समजून घेणे आवश्यक आहे. संघाच्या विचारधारेचा केंद्रबिंदू हा ‘हिंदू’ आहे. परंतु, हा ‘हिंदू’ कोणत्याही पूजेपुरता किंवा पंथापुरता मर्यादित नाही. संघाच्या दृष्टीत ‘हिंदू’ ही एक जीवनपद्धती आहे, एक राष्ट्रीय ओळख आहे, ज्यात या भूमीत जन्मलेल्या सर्व मत-पंथांचा समावेश होतो. ‘हिंदुत्व’ हे राष्ट्रीयत्व आहे, या विचारावर संघाची उभारणी झाली. ही विचारधारा भारताला एक ‘राष्ट्र’ म्हणून अनादि काळापासून पाहते, एक भूभाग म्हणून नाही.
या विचाराला जमिनीवर आणण्याचे काम ‘शाखा’ करते. शाखा हे संघाच्या कार्याचे हृदय आहे. तास-दीड तासांच्या शाखेत खेळ, सूर्यनमस्कार, योगासने यांसारख्या शारीरिक कार्यक्रमातून शिस्त आणि आरोग्य, देशभक्तीपर गीते आणि अमृतवचनांतून प्रेरणा आणि बौद्धिक चर्चांमधून वैचारिक स्पष्टता देण्याचे काम केले जाते. हा व्यक्तिनिर्माणाचा प्रयोग आहे. एक असा स्वयंसेवक घडवणे, जो ‘मी’च्या पलीकडे जाऊन आपण आणि राष्ट्राचा विचार करेल; ज्याच्या मनात समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आत्मीयता असेल आणि जो राष्ट्रहितासाठी निःस्वार्थपणे आपले योगदान देईल. ‘राष्ट्राय स्वाहा, इदं न मम’ (हे राष्ट्रासाठी आहे, माझ्यासाठी नाही) ही भावना प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात रुजवणे, हे शाखेचे अंतिम ध्येय आहे.
हीच वैचारिक शिदोरी घेऊन संघाने गेली 100 वर्षे विविध आव्हानांना तोंड देत, आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. आपल्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत असताना संघाने केवळ संघटनात्मक विस्तारावरच नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी वेळोवेळी या भविष्यवेधी आराखड्याची मांडणी केली. हा आराखडा पाच प्रमुख स्तंभांवर आधारित आहे, ज्यांना ‘पंचपरिवर्तन’ असेही म्हटले जाऊ शकते.
कुटुंब हे भारतीय समाजव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, आधुनिक जीवनशैली आणि पाश्चात्य प्रभावामुळे कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे, अशी संघाची धारणा आहे. विभक्त कुटुंबपद्धती आणि संस्कारांचा अभाव यांमुळे नवी पिढी दिशाहीन होत आहे. यावर उपाय म्हणून संघाने ‘कुटुंब प्रबोधन’ या कार्याला गती दिली. आठवड्यातून एकदा कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करणे, देशाच्या आणि समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करणे, एकत्र प्रार्थना करणे आणि मुलांवर सुसंस्कार करणे यांसारख्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून, कुटुंब व्यवस्था पुन्हा मजबूत करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. सशक्त कुटुंबच सशक्त समाजाचा आणि पर्यायाने सशक्त राष्ट्राचा पाया रचू शकतो, हा यामागील विचार आहे.
संघाच्या मते, हिंदू समाजातील सर्वांत मोठी कमजोरी म्हणजे जाती-पातींमधील भेद आणि अस्पृश्यतेसारखी कुप्रथा. या भेदांमुळेच समाज विभागला गेला आणि परकीय आक्रमकांपुढे निष्प्रभ ठरला. म्हणूनच, शताब्दी वर्षातील संघाचे सर्वांत महत्त्वाचे लक्ष्य हे ‘सामाजिक समरसता’ निर्माण करणे आहे. ‘एक गाव, एक मंदिर, एक पाणवठा आणि एक स्मशानभूमी’ या संकल्पनेतून सर्व भेद मिटवून एकसंध हिंदू समाजाची निर्मिती करणे, हे संघाचे स्वप्न आहे. यासाठी संघ केवळ बौद्धिक पातळीवरच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून प्रयत्न करत आहे. स्वयंसेवक विविध जाती समूहांमध्ये जाऊन संवाद साधत आहेत, सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित करत आहेत आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी झटत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सामाजिक विषमतेवर प्रहार केला, ती विषमता मुळापासून नष्ट केल्याशिवाय खऱ्या अर्थाने सशक्त राष्ट्र उभारले जाऊ शकत नाही, याची संघाला पूर्ण जाणीव आहे.
भारतीय संस्कृतीने नेहमीच निसर्गाला देव मानले आहे. नद्या, पर्वत, वृक्ष आणि प्राणी या सर्वांमध्ये ईश्वर पाहणारी आपली परंपरा आहे. मात्र, विकासाच्या आंधळ्या शर्यतीत पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास झाला आहे. यावर उपाय म्हणून संघाने पर्यावरण संरक्षणाचे कार्य हाती घेतले आहे. जल, जंगल, जमीन आणि पशू यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ही शिकवण संघ देत आहे. वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्ती आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन यांसारख्या कार्यक्रमांतून, स्वयंसेवक देशभर कार्यरत आहेत. हा केवळ एक उपक्रम नसून ती जीवनशैली बनली पाहिजे, यासाठी संघ प्रयत्नशील आहे.
जेव्हा कोणतेही राष्ट्र स्वतःच्या आत्मज्ञानाबद्दल विस्मृतीचे बळी पडू लागते, जेव्हा सुसंस्कृत समाज त्यांच्या शाश्वत परंपरांचा अभिमान बाळगण्याऐवजी त्यांचा द्वेष करू लागतो, ते जगात टिकू शकले नाहीत. आपले पूर्वज, परंपरा, वारसा विसरलेली महान शक्तिशाली राष्ट्रे, त्या देशांना इतिहासाने जगाच्या नकाशावरून पुसून टाकले. समाजात टिकून राहण्याचा मूळ आधार ‘स्व’ आहे. ‘स्व’शिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. स्वदेशीपासून ते स्वाभिमानापर्यंत सर्व काही प्रबोधन आणि आचरणात आणले पाहिजे, यासाठी संघ प्रयत्नशील आहे.
आर्थिक स्वावलंबनाशिवाय कोणतेही राष्ट्र खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि सामर्थ्यवान होऊ शकत नाही. ‘स्वदेशी’ हा संघाच्या मूळ विचारांचा भाग आहे. याचा अर्थ केवळ परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे इतका मर्यादित नाही, तर देशाच्या गरजांनुसार देशातील साधनसंपत्ती आणि मनुष्यबळाचा वापर करून विकासाचे एक स्वयंपूर्ण मॉडेल तयार करणे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी भारतच जगात ताठ मानेने उभा राहू शकतो, हा संघाचा विश्वास आहे.
देशभक्ती केवळ विशिष्ट दिवशी ध्वज फडकवण्यापुरती किंवा घोषणा देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन आचरणात दिसली पाहिजे, ही संघाची शिकवण आहे. वाहतुकीचे नियम पाळणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, प्रामाणिकपणे कर भरणे, मतदानाचा हक्क बजावणे आणि राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे, यांसारखी छोटी-छोटी नागरिक कर्तव्ये पार पाडणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. प्रत्येक नागरिकाने जेव्हा आपली जबाबदारी ओळखून वागायला सुरुवात केली, तेव्हाच देशात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडेल. या पाच सूत्रांच्या माध्यमातून संघ केवळ एका संघटनेची नव्हे, तर संपूर्ण समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
शताब्दीच्या उंबरठ्यावर असताना संघासमोर केवळ संधीच नाहीत, तर मोठी आव्हानेही आहेत. संघाचे कार्य देशातील प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक वस्तीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान आहे. जागतिक पातळीवर आणि देशांतर्गतही ‘भारत’ आणि ‘हिंदुत्व’ या संकल्पनांबद्दल, अनेक गैरसमज पसरवले जातात. या ‘नॅरेटिव्ह वॉर’ला सामोरे जाण्यासाठी संघ वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर अधिक सक्रिय होत आहे. इतिहास, समाजशास्त्र आणि संस्कृती यांबद्दल एक भारतीय दृष्टिकोन स्थापित करणे, हे एक मोठे आव्हान आहे.
सामाजिक समरसतेवर आधारित, कौटुंबिक मूल्यांनी युक्त, पर्यावरणस्नेही, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि कर्तव्यदक्ष नागरिकांनी बनलेला एक परम वैभव संपन्न भारत, हे संघाचे शताब्दी स्वप्न आहे. हे स्वप्न केवळ संघाचे नाही, तर ते या राष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांचे आहे. या स्वप्नपूतसाठी व्यक्तिनिर्माणाचा यज्ञ अविरतपणे सुरू ठेवण्याचा संघाचा संकल्प आहे. आव्हाने अनेक आहेत, मार्गही खडतर आहे; पण 100 वर्षांच्या तपस्येतून निर्माण झालेली ऊर्जा आणि निःस्वार्थ कार्यकर्त्यांची अफाट शक्ती यांच्या बळावर संघ आपली भविष्यातील वाटचाल अधिक आत्मविश्वासाने करेल, यात शंका नाही. ही शताब्दी केवळ एका संघटनेच्या प्रवासाचा टप्पा नाही, तर ती भारताच्या आत्मशोधाच्या आणि राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे.
- प्रा. संजय साळवे