बाप गेला! पोटच्या मुलीला आईनेच ५० हजारांसाठी विकले!

04 Oct 2025 16:10:58

women sells her girl
 
 
मुंबई : पालघरच्या वाडा तालुक्यातील एका महिलेने पोटच्या मुलीला ५० हजार रुपयांसाठी विकून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील १४ वर्षाच्या पीडितेच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर तिच्या आईने दुसरा विवाह केला. काही दिवसांनी पीडित मुलीच्या आज्जीचेही निधन झाले. घरात कुणाचा धाक नसल्याचा फायदा घेत पीडितेच्या आईने एका दलालामार्फत तिला ५० हजारांना विकले.
 
पीडितेला दलालाने अहिल्या नगरात नेत तिचे जबरदस्ती लग्न लावून दिले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला पुन्हा वाडा येथे आणण्यात आले. तिची बनावट कागदपत्रे बनवून तिला इस्पितळात भरती करण्यात आले. पीडितेला मुलगी झाली. रुग्णालयातील खर्च वसूल करण्यासाठी पीडितेच्या आईकडे पुन्हा ५० हजारांची मागणी तिच्या सासरच्यांनी केली.
 
 
 
यानंतर हे प्रकरण पोलीसांत गेले. तपासाअंती पोलीसांनी पीडितेचा पती, काका-काकी आणि विक्री करणाऱ्या दलालावर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. स्थानिकांनी नाव न सांगण्याच्या अटीनुसार, दिलेल्या माहितीत आईचाही या प्रकरणात हात आहे. या संपूर्ण कटात आईनेच मदत केली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ५० हजारांत मुलीला विकणे आणि परक्या शहरात पाठवणे हे कसे शक्य आहे?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Powered By Sangraha 9.0