संस्कृतीला साजेसे

04 Oct 2025 12:19:15

राज्यात झालेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी तन-मन-धनाने मदतीसाठी धावून जाण्याचा आणि त्यांना जगण्याची उमेद देण्याचा सध्याचा काळ आहे. मात्र, काही लोक याचेही राजकारण करून या लोकांना धीर देण्याऐवजी, राज्याची बदनामी करण्यात धन्यता मानतात. हे अतिशय क्लेशकारक तर आहेच; मात्र संतापजनकदेखील आहे. परिस्थितीचे भान नसणे आणि केवळ आपल्या राजकीय पोळ्या शेकायची चिंता सतावत असल्याने, राज्यातील एका वाघाच्या घराण्यातील पोर कसे बेताल बोलत सुटले आहे, हे काल दसऱ्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिसून आले. स्वतः काही करायचे नाही आणि इतरांना मात्र दूषणे देत, ते ठासून खोटे बोलत राहायचे, ही सवय असलेला हा नेता कसा तोंडावर आपटला, हे जनतेने वारंवार बघितले आहे.

विशेष म्हणजे, राज्यातील शाळकरी मुलांपासून ते समाजातील बहुतांश संवेदनशील संस्था, संघटना आणि व्यक्तींनी राज्यातील या आपत्तीकाळात सरकारच्या ‌‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी‌’त भरघोस दान करून आपल्या उदारतेचा परिचय दिला आहे. शिवाय, कितीतरी संघटना आणि लोकांनी पूरग्रस्तांच्या परिसरात धाव घेऊन, त्यांना हवी ती आवश्यक मदत थेट पोहोचवली देखील आहे. तर काही लोक विनाकारण आंदोलन करण्याची धमकी देत, आपल्या असंवेदनशीलतेचा परिचय देत आहेत. पुणे महानगर आणि लगतच्या परिसरातून अनेक व्यक्ती, संस्थांनी ही मदत पूरग्रस्तांसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, पुण्यातील विदेशात स्थायिक असलेल्या नागरिकांनीदेखील, या पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी पूरग्रस्त साहाय्यता निधीत योगदान दिले आहे. विशेषतः राज्यातील मराठवाडा भागातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. शासनाने याचे भान ठेवत आणि आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन, या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूव रक्कम कशी जमा होण्याची तयारी केली आहे. संकटकाळात महाराष्ट्र कसा एकमेकांसाठी धावून जातो आणि एक असतो, हे यावरून पुन्हा सिद्ध झाले असून, महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे हे वर्तन नक्कीच कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या वसुलीपेक्षा उजवे आहे, हे मान्य करायला हवे. कदाचित या वसुलीकारांना आता तीच चिंता सतावत असेल, म्हणून नुसता जळजळाट सुरू आहे.

विकृतीला साजेसे

दसऱ्याला यंदा बाजारपेठांमध्ये तेजीचे वातावरण होते. प्रचंड दरवाढ असतानादेखील, सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी गद केल्याचे बाजारपेठांमध्ये बघायला मिळाले. त्यात ‌‘जीएसटी‌’ कपातीनंतर काही वस्तूंच्या किमती कमी झाल्याने, ग्राहकांचा खरेदीकडे कल दिसला. वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी विशेष गद यावेळी दिसली. दोन आठवड्यांवर दिवाळी आली आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण कायम आहे. ‌‘विकसित भारता‌’च्या स्वप्नपूतची ही झलकच समजायला हरकत नाही. असे असले, तरी आताचा काळ हा एकूणच संमिश्र भावनांचा आहे; तरीही आपण अनेक समस्या आणि संकटांवर मात करून, विकासाकडे मार्गक्रमण करीत आहोत. कारण, काही शक्ती भारतातच या समस्या आणि संकटांचे भांडवल आणि राजकारण करून, विनाकारण लोकांना संभ्रमित करण्यासाठी एकत्र येत आहेत. ‌‘खोटे नॅरेटिव्ह‌’ पसरविण्याची जुनी खोड अजूनही कायम आहे. याचा परकीय शत्रू लाभ घेताना दिसतात. भारतातील आपल्या काही चिल्ल्या-पिल्ल्यांना रसद पुरवून, भारतविरोधी कारवायांसाठी सक्रिय झाल्याचेदेखील उत्तर प्रदेशातील काही घटना आणि अहिल्यानगरच्या घटनेवरून मानता येईल.

मात्र, आपल्या शासनाने यासाठी चोख कारवाई करीत, अशा देशविरोधांतर्गत शक्तींचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईची धडकी इतरांनादेखील भरेल, याबाबत दुमत नाही. त्यामुळे उगा राष्ट्राच्या प्रगतीत अडथळा निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे, अन्यथा आगामी काळात कुणी अशा तऱ्हेने देशाच्या सार्वभौमत्वाशी खेळण्याचा प्रयास केला, तर त्याचा समाचार प्रशासन घेईलच. लोक सण-उत्सवांच्या काळात तर गुण्या-गोविंदाने राहू इच्छितातच मात्र, संकटकाळी एकत्र येऊन एकमेकांची सुख-दुःखेदेखील वाटून घेतात, हे अलीकडील आपल्या देशातील चित्र आश्वासक म्हणायला हवे. त्यामुळे विदेशात जाऊन भारताची बदनामी करणाऱ्याचा आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांचा जळजळाट होत असल्यास नवल ते कसले? शेजारी राष्ट्र पाकिस्तानची आगळीक अधूनमधून डोके वर काढीत असते. तथापि, अलीकडील ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्च्या माध्यमातोन शिकवलेल्या धड्यातून बोध घेण्याऐवजी, ते बदला घेण्याची आपली जुनी खोड काढीत असल्याने त्यांनाही धडा शिकविण्याची वेळ आली आहे. त्यांचे हे वर्तन विकृतीला साजेसे असेच आहे.

- अतुल तांदळीकर
Powered By Sangraha 9.0