
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासासंदर्भात एक मुद्दा दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा, असे आवाहन मी केले होते. पण काल ते त्यांच्या अख्ख्या भाषणात विकासावर बोलले नाहीत. त्यामुळे माझे १ हजार रुपये वाचवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला.
माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी माझे १ हजार रुपये वाचवले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासासंदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा, असे आवाहन मी केले होते. पण काल उद्धव ठाकरे त्यांच्या अख्ख्या भाषणात विकासावर एक मुद्दाही बोलले नाहीत. ते विकासावर बोलूच शकत नसल्याने अदवातदवा बोलतात. त्यांचे बोलणे हे स्वगत असते. कारण यावेळी त्यांच्यापुढे माणसेही नव्हती. पण तरीही त्यांनी नेहमीप्रमाणे विकासासंदर्भात अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवले आणि माझे हजार रुपये वाचवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले की, "एखादा व्यक्ती निराश झाला की, तो अदवातदवा बोलत असतो. पण सुज्ञ लोकांनी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचे नसते. त्याची मानसिकता समजून सोडून द्यायचे असते," असे ते म्हणाले.
सुप्रिया सुळे यांनी आरशात पाहावे
खा. सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जर त्यांनी राजकारण बाजूला ठेवले तर आम्ही बाजूलाच ठेवले आहे. त्यांनी आता अतिवृष्टीनंतर जे राजकारण सुरु केले त्यात त्यांनी एकदा मागे वळून बघितले पाहिजे. तेसुद्धा अनेक वर्षे सत्तेत होते. प्रत्येक वेळी संकट आले त्यावेळी त्यांनी काय केले हे त्यांनी आरशात बघितल्यानंतर त्यांच्या राजकीय मागण्या बंद होतील."
राहुल गांधी यांचा मेंदू कमजोर
"राहुल गांधी यांना भारतीय संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाही. त्यांना भारताच्या इतिहासाबद्दल माहिती नाही. त्यांची आजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावून भारताचे संविधान बदलून भारतात एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने त्यांना उलटवून लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली लोकशाही कमजोर करण्याची कुणाचीही हिंमत नाही. राहुल गांधी यांचा मेंदू कमजोर आहे. त्यांची संविधानविरोधी मानसिकता आहे. त्यामुळे ते सिरियल लायर आहेत हे मी वारंवार सांगतो," अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.