नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटलांचेच नाव !: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

    04-Oct-2025
Total Views |

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही असे स्पष्टपणे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'केंद्र सरकारने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती, त्यामध्ये नामविस्तार होऊन आता 'लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे होईल. राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल असा प्रतिसाद प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होईल तेव्हा 'लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशीच अधिकृत उद्घोषणा निश्चितपणे होईल, अशी खात्रीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वागत करून प्रास्तविक केले. तसेच आमदार रवींद्र चव्हाण, लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार कपिल पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर व लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली. यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. नामकरणासाठी सर्वपक्षीय एकमेव प्रस्ताव असून त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी देण्यात आले.

विमानतळ नामकरण आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. या आंदोलनातील गुन्ह्यांमुळे विमानतळावर नोकरी मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी हे गुन्हे रद्द करण्याचे निर्देश देण्यात येतील. काही आंदोलने कोविड काळात देखील झाले असल्याने काही आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.