नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये शुक्रवार, दि.४ ऑक्टोबर रोजी रात्री लोकल रेल्वे बेलापूर रेल्वे स्थानकात पोहोचत असतानाच मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मात्र, परिस्थिती गंभीर असतानाही त्यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, हार्बर मार्गावरून प्रवास करत असताना रात्री सुमारे ११ वाजता ही घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून (सीएसएमटी) पनवेलच्या दिशेने जाणारी १०.५० ची लोकल रेल्वे स्थानकावर पोहोचताच मोटरमन सी. मोडक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. मात्र, अशा अवस्थेत गाडीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी त्वरित ब्रेक लावले.
गाडी थांबल्यानंतर मोटरमन मोडक यांना बेलापूर रेल्वे स्थानकातच प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.