
नवी दिल्ली : मागील दोन वर्ष सुरू असलेल्या इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दि. २९ सप्टेंबर रोजी २० मुद्द्यांचा समावेश असलेला शांततेचा प्रस्ताव जाहिर केला. इस्त्रायलने या प्रस्तावाला त्वरित मान्यता दिली होती, तर हमासने देखील आता या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. हमासच्या या निर्णयनंतर भारतासह जगातील अनेक देशांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हमास या संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले की " बंदिवासात असलेल्या इस्त्रायली नागरिकांना तसेच पॅलेस्टिनींना सत्ता सोपविण्यास तयार आहेत, परंतु अमेरिकेच्या शांतता योजनेच्या इतर मुद्द्यांवर अधिक वाटाघाटी करण्याची आवश्यक आहे'.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला, शांतता योजना स्वीकारावी अथवा विनाशाला सामोरं जाण्यासाठी रविवारपर्यंत अंतिम मुदतीचा इशारा दिल्यानंतर काही तासांतच हमासद्वारे ही घोषणा करण्यात आली."
हमासच्या निर्णयनंतर इतर देशांनी दिलेल्या प्रतिक्रिया
भारत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझामधील शांतता प्रयत्नांसाठी ट्रम्प यांच्या "नेतृत्वाचे" कौतुक केले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अकाउंटला टॅग करत म्हटले आहे की, "बंधकांच्या सुटकेचे संकेत हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत टिकाऊ आणि न्याय्य शांततेच्या दिशेने सर्व प्रयत्नांना जोरदार पाठिंबा देत राहील."
कतार
कतार,"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या योजनेशी सहमत असून, हमासच्या घोषणेचे आणि योजनेत नमूद केलेल्या देवाणघेवाणीच्या चौकटीचा भाग म्हणून सर्व बंधकांना सोडण्याची तयारी दर्शविण्याच्या त्यांच्या तयारीचे स्वागत करतो. बंधकांची सुरक्षित आणि जलद सुटका करण्यासाठी आणि गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींच्या रक्तपाताला आळा घालण्यासाठी, राष्ट्रपतींनी तात्काळ युद्धबंदीची मागणी करणाऱ्या विधानांना आम्ही आमचा पाठिंबा देतो".असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले आहे.
इजिप्तने देखील या प्रस्तावाचे स्वागत केले आहे आणि म्हटले आहे कि, "सकारात्मक विकासाची" आशा आहे आणि ते गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी करण्यासाठी अरब राज्ये, अमेरिका आणि युरोपीय देशांसोबत काम करत राहतील.
तुर्की
तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पॅलेस्टिनी गटाचा प्रतिसाद हा "गाझामध्ये त्वरित युद्धबंदीची स्थापना करण्याची संधी देतो".
पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद
पीआयजे टेलिग्रामवरील एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे की, "हमासचे विधान इतर पॅलेस्टिनी गटांची भूमिका व्यक्त करते आणि पीआयजेने या निर्णयासाठी जबाबदारपणे भाग घेत आहे" .
मलेशिया
पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी अधिक सावधगिरीचा सूर दिला: "अमेरिकेने सादर केलेली शांतता योजना परिपूर्ण नाही आणि आम्ही त्यातील बऱ्याच गोष्टींशी असहमत देखील आहोत. तथापि, आमची सध्याची प्राथमिकता पॅलेस्टिनी लोकांचे जीव वाचवणे आहे," असे ते म्हणाले.
फ्रान्स
हमासच्या प्रतिसादावर आशावादी युरोपियन प्रतिक्रियांच्या गटात सामील होत राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एक्स वर लिहिले. "गाझामध्ये सर्व बंधकांची सुटका आणि युद्धबंदीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे! हमासच्या वचनबद्धतेचे विलंब न करता पालन केले पाहिजे. आता आपल्याकडे शांततेच्या दिशेने निर्णायक प्रगती करण्याची संधी आहे. फ्रान्स संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्या प्रयत्नांनुसार, अमेरिका, इस्रायली आणि पॅलेस्टिनी आणि त्यांच्या सर्व आंतरराष्ट्रीय भागीदारांसह आपली पूर्ण भूमिका बजावेल. शांततेसाठी वचनबद्धतेबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमचे आभार मानू इच्छितो."