मंत्री नितेश राणे यांनी केली मच्छीमारांच्या नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी

04 Oct 2025 16:08:50

छत्रपती संभाजीनगर : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री धरण परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे सुरु असून लवकरच योग्य ती मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी मत्स्य तळांचे १०० टक्के नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी जवळपास २८ कोटींचे नुकसान झाले असून हा आकडा आणखी वाढू शकतो. या सगळ्याची पाहणी करून माझ्या विभागाची बैठक घेण्यासाठी मी इथे आलो आहे. मच्छिमारांसाठी कुठलेही निकष न ठेवता भरघोस मदत देण्याची आमची मानसिकता आहे. आम्हाला मराठवाड्यातील आमच्या मच्छिमारांना निश्चित मदत करायची आहे. आमच्या मच्छिमारांनी स्वत:च्या पायावर उभे राहून पुन्हा एकदा मत्स्य तळ्यातून भरभरून उत्पन्न घ्यावे, अशी आमची ईच्छा आहे," असे ते म्हणाले.

"नारायण राणे साहेबांनी नेहमीच सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचा असा कुठलाही कोपरा नाही जिथे त्यांनी स्वत:च्या खिशातून मदत केली नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा ते कधीही शासकीय पैशांसाठी थांबले नाहीत. आमचे कुटुंब मदत करणारे आहे. त्यासाठी आम्हाला कुणीही सांगण्याची गरज नाही," असे प्रत्युत्तर त्यांनी मनोज जरांगे यांना दिले.

राजकीय धर्मांतर झालेल्यांनी हिंदूत्व सांगू नये

"ज्यांचे स्वत:चे राजकीय धर्मांतर झाले, जे उद्धव खान झाले त्यांनी आम्हाला हिंदूत्वाचे विषय सांगू नये. ज्यांचा दिवस आणि रात्र मुल्ला मौलवींशिवाय होत नाही त्यांनी आम्हाला हिरव्या रंगाबद्दल सांगू नये. रामदास कदम यांचा बाण योग्य दिशेने चालला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वित्झर्लंडला कुणाला पाठवले आणि कुणाची वाट बघत बाळासाहेंबाच्या अंत्यविधीची प्रक्रिया करण्यास उशीर केला याचे उत्तर द्यावे. त्यांनी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला याचेही उत्तर द्यावे. उद्धव ठाकरे यांना मोर्चा काढायचाच असल्यास त्यांनी पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही," अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

इथे आय लव्ह महादेवच चालणार

"आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार आहे. ही पाकिस्तानची भूमी नाही. प्रत्येकाच्या घराघरात आय लव्ह महादेवचे बॅनर लागलेच पाहिजे. आय लव्ह मोहम्मद वाल्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्या," असेही मंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.


Powered By Sangraha 9.0