
नवी दिल्ली : पोलिसांनी शनिवारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा प्रमुख हँडलर शेख सज्जाद, अहमद शेख उर्फ सज्जाद गुल याची जवळपास दोन कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.
ही मालमत्ता एचएमटी परिसरातील रोज अव्हेन्यू येथे असून, यात १५ मरला जमीन आणि त्यावर उभारलेली तीन मजली इमारत आहे. महसूल नोंदवही व तहसीलदार (सेंट्रल, शाल्टेंग, श्रीनगर) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मालमत्ता सज्जाद गुलच्या वडिलांच्या – गुलाम मोहम्मद शेख पुत्र ख्वाजा अन्वर शेख – नावावर नोंदवलेली आहे. मात्र चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की या मालमत्तेत सज्जाद गुल स्वतः थेट भागीदार आहे.
१० लाख रुपयांचा इनामी दहशतवादी सज्जाद गुल गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये लपून बसलेला आहे. काश्मीरमधील अल्पसंख्याक तसेच इतर राज्यांतील नागरिकांच्या लक्षित हत्यांच्या ३० पेक्षा अधिक प्रकरणांत त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यातदेखील त्याचे नाव समोर आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सज्जाद गुलने आपले प्राथमिक शिक्षण श्रीनगरमध्ये घेतले होते. त्यानंतर तो बंगळुरूमध्ये एका अभ्यासक्रमासाठी गेला होता. काही काळानंतर तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला. सुरुवातीला तो दहशतवाद्यांसाठी ओव्हरग्राऊंड वर्कर म्हणून काम करत होता व त्यांना ठिकाणे व आर्थिक मदत उपलब्ध करून देत होता.