तुम एक मारोगे, तो हम चार मारेंगे!

    04-Oct-2025
Total Views |

मनामध्ये विश्वास असेल तर मोठ्यातील मोठ्या संकटांचा पराभव करताना, कोणतीही गोष्ट आडवी येत नाही. मनामधील आत्मविश्वासच विजयाचा राजमार्गच प्रशस्त करत असतो. इतिहासातील अनेक लढायांमध्ये याची उत्तम उदाहरणे आपल्याला सापडतील. इस्रायलचा आजवरचा प्रवास म्हणजे या आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण ठरावे...

1936 सालची गोष्ट. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेला होता. गनी ॲलन हा जलदगती गोलंदाज इंग्लंडचा कर्णधार होता. तो भयंकर शिवराळ होता. त्याच्या गोलंदाजीवर चौकार किंवा षट्कार मारणाऱ्या फलंदाजाला, तो बेधडक अत्यंत गलिच्छ शिव्या देत असे. यात दुहेरी उद्देश असायचा एक म्हणजे, ‌‘माझ्या चेंडूवर चौकार मारतोस काय?‌’ म्हणून सरळच शिवी घालणे. दुसरा वाकडा उद्देश म्हणजे, अशा शिव्या ऐकून फलंदाजाने भडकावे, त्याची एकाग्रता ढळावी, त्याने रागाने आडव्या बॅटने चेंडूला झोडपावे आणि त्यात त्याची विकेट पडावी.

हा प्रयोग त्याने भारतीय फलंदाजांवरही सुरू केला. महान भारतीय फलंदाज कर्नल सी. के. नायडू हे अत्यंत अनुभवी होते. ते अत्यंत शांत राहिले पण, दुसऱ्या बाजूला होता लाला अमरनाथ. सळसळत्या, उसळत्या रक्ताचा दणकेबाज फलंदाज. लालाने गबीच्या चेंडूवर खाडकन चौकार मारावा आणि गबीने शिव्यांची लाखोली व्हावी, असे लागोपाठ दोनदा झाले. तिसऱ्यांदा लालाने एक जबरदस्त षट्कार ठोकला. लगेच गबी ॲलनच्या तोंडाची गटारगंगा वाहू लागली. लालाने आपल्या जागेवरूनच गबीच्या दुप्पट आवाज चढवून, चौपट शिव्या घातल्या. मात्रा अचूक लागू पडली गबी गप्प बसला, परत त्याने तोंड उघडले नाही. नॉन-स्ट्रायकर एण्डला उभे असलेल्या सी. के. नायडूंना हसू आवरता-आवरता पुरेवाट झाली. लक्षात घ्या, ते 1936 साल होते. एका गुलाम भारतीयाने इंग्लंडच्याच भूमीवर इंग्लंडच्या खुद्द कप्तानाला भर मैदानावर शिव्या घालणे, हे सोपे साहस नव्हते. पण, खरी मजा तर पुढेच आहे. तंबूत परतल्यावर भारतीय संघातल्या सरकारी खेळाडूंनी लालाला विचारले, “पण तू काय बोललास लाला?” त्यावर लाला उत्तरला, “हे बघा मित्रांनो, मला काही तुमच्या इतके फाडफाड इंग्लिश येत नाही. तो समोरून घाणेरड्या शिव्या देतोय, एवढेच मला कळले. मला काही इंग्लिश शिव्या येत नाहीत. मी त्याला माझ्या मातृभाषेत, पंजाबीत, चांगल्या अस्सल आणि कचकचीत शिव्या हासडल्या, तो गप्प बसला.” सी. के. नायडू सर्वांना म्हणाले, “बॉईज, यावरून महत्त्वाचा धडा घ्या. तुमची भाषा, तुमचे शब्द, यापेक्षा तुमचा आवेश समोरच्याला बरोबर समजतो.” दॅट इज द स्पिरीट! 1975 सालचा अत्यंत गाजलेला चित्रपट ‌‘शोले.‌’ नुकतीच त्याची पन्नाशी साजरी झाली. ‌‘मॅग्निफिसंट सेव्हन‌’ आणि ‌‘वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट‌’ या दोन वेस्टर्न चित्रपटांवरून मुख्यतः शोले उचललेला आहे. पण, इतरही अनेक वेस्टर्न चित्रपटांमधली छोटी-छोटी दृष्ये त्यात फार खुबीने बसवलेली आहेत. तसाच एक प्रसंग, रामगढ गावचा एक तरुण पोरगा (अभिनेता सचिन) गब्बर सिंगच्या हातात सापडतो. गब्बर त्याला ठार मारतो. घोड्यावरून त्याचे प्रेत रामगढला पाठवतो आणि बरोबर चिठी पाठवतो की, वीरू आणि जय (अनुक्रमे धमेंद्र आणि अमिताभ) यांना माझ्या ताब्यात द्या, नाहीतर मी संपूर्ण रामगढ गाव बेचिराख करून टाकेन. त्यावर वीरू आणि जय मोठ्या युक्तीने आणि बहादुरीने गब्बरच्या चार गुंडांना ठार मारतात आणि पाचव्या जखमी गुंडाबरोबर गब्बरला चिठ्ठी पाठवतात, ‌‘तुम एक मारोगे, तो हम चार मारेंगे.‌’ दॅट इज द स्पिरीट!

1921 सालानंतरचा काळ. पॅलेस्टाईन हा प्रदेश तुर्कस्तानच्या साम्राज्यातून काढून इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. राजकीय भाषेत त्याला म्हणायचे ‌‘ब्रिटिश प्रोटेक्टोरेट.‌’ या भागातले स्थानिक लोक होते पॅलेस्टिनी अरब. प्रख्यात ज्यू नेते डेव्हिड बेन गुरियान यांनी, ही संधी झडप मारून उचलली. ते स्वतः जेरुसलेमला आले आणि देशोदेशींच्या ज्यू धमयांना त्यांनी आवाहन केले, “या आणि आपल्या पूर्वजांच्या या पवित्र भूमीत स्थायिक व्हा. 1800 वर्षांनंतर ज्यू लोकांना त्यांच्या पवित्र मायभूमीत परतण्याची संधी मिळाली आहे, ती सोडू नका.”

त्यांच्या या आवाहनामध्ये फार मोठे भवितव्य दडलेले होते. जेव्हा केव्हा इंग्रज हा प्रदेश सोडतील, त्यावेळी या भूमीत ज्या समुदायाची लोकसंख्या जास्त असेल, तोच समुदाय या भूमीचा सत्ताधारी होईल. आज या भूमीत अरब जास्त आहेत. त्यांच्यापेक्षा ज्यूंची संख्या जास्त झाली, तरच 1800 वर्षांनंतर ज्यूंना त्यांच्या मूळ भूमीत राज्य करता येईल. देशोदेशींचे मुख्यतः युरोपीय देशांमधले ज्यू समूह, मोठ्या संख्येने पॅलेस्टाईनमध्ये येऊन धडकू लागले. अरबांना हे इंगित कळल्यावर, त्यांनी सरळ-सरळ सशस्त्र दंगे सुरू केले. बेन गुरियान यांना हे अपेक्षितच होते. त्यांनी अरबांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली.

त्या काळात घडलेली एक घटना. मुसलमानांना स्त्री ही उपभोगाची वस्तू वाटते. ते स्त्रीला ‌‘माणूस‌’ नव्हे, तर ‌‘वस्तू‌’ समजतात. जेरुसलेममध्ये रोज नवीन येऊन थडकणाऱ्या युरोपीय गोऱ्या ज्यू महिला पाहून, अरबांच्या तोंडाला पाणी सुटले. अगदी लाळ गळून वाळवंटात झिरपू लागली. जेरुसलेमच्या रस्त्यांवर ज्यू महिलांची छेडछाड झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. विषय बेन गुरियान यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी नवागत ज्यू महिलांपैकी काही निवडक बायका उचलल्या. त्यांना हत्यारे चालवण्याचे प्राथमिक शिक्षण दिले आणि सांगितले, “छेडछाड झाली, तर बेधडक ही हत्यारे चालवा. ब्रिटिश पोलिसांचे काय ते आम्ही पाहू.” आणि मग जेरुसलेमच्या रस्त्यांवर अरबांचे 12-15 मुडदे पडले. फार नाही, 12-15च! ताबडतोब लंपटपणा आटोक्यात आला. गोरी चामडी बघून तोंडातून गळणारी लाळ, तोंडातच जिरली. दॅट इज द स्पिरीट!

इथे लगेचच स्पष्ट करतो की, ही घटना मला कोणत्याही पुस्तकात, चरित्रात, इंटरनेटवर मिळालेली नाही. ज्याचे नातेवाईक आता इस्रायलमध्ये स्थायिक झालेत, अशा एक मराठी ज्यू माणसाकडून मी ती तोंडी ऐकलेली आहे. म्हणजेच ऐतिहासिक शास्त्रीयदृष्ट्या ती विश्वसनीय नाही, असे म्हणता येईल. नसेलसुद्धा विश्वसनीय कदाचित! पण, तिच्यातला आवेश, ते स्पिरीट महत्त्वाचे आहे. दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजीचा दिवस. संपूर्ण इस्रायल देश, दुसऱ्या दिवशी असणाऱ्या ‌‘सिम्हथ तोराह‌’ या ज्यू धमय सणाच्या तयारीत मग्न होता. गाझापट्टीजवळच्या रीम या परिसरात ‌‘सुपरनोव्हा सुक्कोथ गॅदरिंग‌’ या नावाचा, भव्य संगीत जलसा सुरू होता. किमान तीन हजार ज्यू नागरिक तिथे संगीताचा आस्वाद घेत होते. अचानक ‌‘हमास‌’ या अरब दहशतवादी संघटनेचे 2 हजार, 500 कडवे दहशतवादी, रीमवर तुटून पडले. बेछूट, अंदाधुंद गोळीबार करत त्यांनी किमान 1 हजार, 400 लोकांना ठार मारले. गाझा पट्टी आणि इस्रायल यांच्या सरहद्दीवरच्या नेटिव्ह-हा-असरा, बीरी, होलित, कफ्र आझा आणि वीर भोस या ज्यू गावांवर पाच हजार अग्निबाणांचा वर्षाव करण्यात आला. पाठोपाठ दहशतवाद्यांनी तिथे प्रत्यक्ष आक्रमण करून, असंख्य लोकांना ओलिस धरले. स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात आले. लहान मुलांचे शिरच्छेद करण्यात आले. गर्भवती स्त्रियांचे पोट फाडून त्यांचे गर्भ बाहेर ओढून काढून, त्या स्त्रिया आणि गर्भ यांच्या माना चिरण्यात आल्या.

ही बातमी येताक्षणी इस्रायली संरक्षणमंत्र्याने संपूर्ण गाझापट्टीला वेढा घातला आणि जाहीर केले, “गाझापट्टीत जाणारी वीज, पाणी, अन्नधान्य, औषधे माणसे सर्व काही बंद. आम्ही माणसांचे देह असणाऱ्या जनावरांशी लढत आहोत.” येत्या दि. 7 ऑक्टोबर रोजी या घटनेला दोन वर्षे पूर्ण होतील. गाझापट्टीत घनघोर युद्ध सुरूच आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कुणाच्याही दबावाला जराही भीक न घालता, गाझापट्टीतला ‘हमास‌’च्या लोकांना रगडून काढणे जारीने चालू ठेवले आहे. गेल्या दोन वर्षांच्या या संघर्षात इस्रायलचे नागरिक आणि सैनिक मिळून सुमारे दोन हजार लोक ठार झालेत. शिवाय 251 लोक अजूनही ‌‘हमास‌’च्या ताब्यात ओलिस आहेत. तर गाझापट्टीतल्या अरबांचे नागरिक आणि सैनिक मिळून, 88 हजार लोक ठार झालेत. म्हणजे हे प्रमाण एकास चार नव्हे, तर एकास 44 पडते. दि. 30 सप्टेंबर 2025 या दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्या यांनी, ‌‘हमास‌’समोर 20 कलमांचा एक शांतता प्रस्ताव ठेवला आहे. आता निर्णय ‌‘हमास‌’ने घ्यायचा आहे.

हैफा आणि भारत आजच्या इस्रायल देशाच्या राजधानीपासून, तेल अवीव शहरापासून उत्तरेला 90 किमी अंतरावर हैफा हे बंदर आहे. किशोन नावाची नदी भूमध्य समुद्राला मिळते, त्या नाक्यावरच हे बंदर बसलेले आहे. भूमध्य समुद्रमार्गे पॅलेस्टाईन प्रदेशातल्या व्यापारी मार्गावरचे महत्त्वाचे ठाणे म्हणून शतकानुशतके हैफा तुर्कांच्या ऑटोमन साम्राज्यात होते. दि. 23 सप्टेंबर 1918 या दिवशी भारतीय सैनिकांनी अपूर्व युद्धकौशल्याचे प्रदर्शन करीत ते तुर्कांकडून हिसकावून घेतले.

परवा दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी हैफा शहराच्या इस्रायली प्रशासनाने, या घटनेचा 107वा स्मरण दिवस साजरा केला. तसा ते दरवषच करतात. इस्रायली शिक्षण खात्याने मुळी या घटनेचा अंतर्भाव पाठ्यपुस्तकातच करून टाकला आहे. हैफावासी लोक म्हणतात, “आमचे शहर तुर्कांच्या तावडीतून सोडवले ते ब्रिटिशांनी नव्हे, तर भारतीय सैनिकांनी.” युद्ध इतिहासकार म्हणतात, “आधुनिक काळातली ही शेवटची लढाई की, जिच्यामध्ये घोडेस्वार शत्रूवर तलवारी आणि भाले घेऊन तुटून पडले आणि त्यांनी चक्क विजय मिळवला.

1914 ते 1918 या कालखंडात झालेल्या पहिल्या महायुद्धात ब्रिटिश जनरल एडमंड ॲलनबी याच्याकडे, मध्य-पूर्वेतील तुर्कीचा पाडाव करण्याची कामगिरी होती. त्या काळात पॅलेस्टाईन सकट संपूर्ण अरेबियन द्वीपकल्प हे तुर्कांच्या साम्राज्यात मोडत होते. जनरल ॲलनबीच्या सैन्यात ‌‘15वी इम्पिरियल सर्व्हिस कॅव्हलरी ब्रिगेड‌’ हे पथक होते. त्यात भारताच्या जोधपूर, म्हैसूर आणि हैद्राबाद या संस्थानांच्या सैन्याची पथके होती. दि. 23 सप्टेंबर 1918 रोजी याच पथकांनी, हैफा शहरावर जबरदस्त हल्ला केला होता. तुर्कांच्या तोफा आणि मशीनगन्सचा मारा युक्तीने चकवत, हे सैनिक अगदी शहराला भिडले आणि मग त्यांनी कमालच केली. त्यांनी बंदुका बाजूला ठेवल्या आणि तलवारी आणि भाले सरसावत 400 भारतीय घोडेस्वार 1 हजार, 500 तुर्कांवर तुटून पडले. जबरदस्त कचाकची होऊन अखेर हैफा शहर ताब्यात आले.

त्यावेळी इस्रायल देशच नव्हता आणि भारतही स्वतंत्र नव्हता. भारतीय सैनिकांचा हा भीम पराक्रम इंग्रज मालकांसाठी होता पण, तरीही आजचा इस्रायल देश अभिमानाने सांगतोय की, “आमचे हैफा शहर तुर्कांपासून मुक्त केले, ते भारतीयांनी.” दॅट इज द स्पिरीट!

- मल्हार कृष्ण गोखले