२०२६ मार्चपर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

04 Oct 2025 17:08:48

नवी दिल्ली : केंद्रीय गृह व सहकारत मंत्री अमित शाह यांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी बस्तर येथे पारंपरिक दशहरा महोत्सव व स्वदेशी मेळ्यात सहभाग घेतला. या प्रसंगी आयोजित विराट जनसभेला संबोधित करताना त्यांनी भारतमाता व माता दंतेश्वरीच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात केली आणि बस्तरला लाल दहशतीतून मुक्त करण्याची प्रार्थना केली.

शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, बस्तरच्या विकासामध्ये सर्वात मोठा अडथळा नक्षलवाद राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रत्येक खेड्यापर्यंत वीज, रस्ता, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा पोहोचत असताना बस्तर या सोयींपासून वंचित राहिला आहे. त्यांनी आश्वासन दिले की केंद्र व राज्य सरकार मिळून बस्तरला विकासाच्या नव्या उंचीवर नेतील.

गृहमंत्र्यांनी घोषणा केली की ३१ मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल. नक्षलवाद्यांना व त्यांच्या समर्थकांना इशारा देताना त्यांनी म्हटले की, “काही लोक चर्चा करण्याची भाषा करतात, पण नक्षलवादी हिंसा सोडून आत्मसमर्पण करेपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुरक्षा दल मिळून कठोर प्रत्युत्तर देतील.”

शाह यांनी पुढे सांगितले की छत्तीसगडमध्ये सर्वात प्रभावी शरणागती धोरण लागू करण्यात आले असून, शेकडो नक्षलवादी संघटनांमधून बाहेर पडून मुख्य प्रवाहात परतले आहेत. तसेच जे खेडेगाव नक्षलमुक्त होतील, त्यांना विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची विशेष मदत देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

यावेळी शाह यांनी मुरिया दरबार या बस्तरच्या पारंपरिक आयोजनात सहभागी झाल्याचा अनुभवही व्यक्त केला. “हे आयोजन बस्तरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. दिल्लीला परतल्यावर मी सर्वांना सांगेन की बस्तरच्या परंपरा जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळवण्यास पात्र आहेत,” असे ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0