लोकपरंपरेच्या रंगछटा उलगडताना...

04 Oct 2025 12:52:22

मुंबईच्या जहांगीर कलादालन येथे 'Heritage Hues' अर्थात वारशाच्या रंगछटा या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत सर्व चित्ररसिकांना या प्रदर्शनाचा आस्वाद घेता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये मोहन जाधव यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्रं केवळ एका लोकपरंपरेचा गाभा साकारत नाही, तर या लोकपरंपरेच्या विचारामागचा तळ गाठत, वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा उलगडतात. या रंगछटांमागचा विचार नेमका काय आहे, याचा वेध घेणारा हा विशेष लेख...

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “मराठी भाषा ही इथल्या लोकभाषांमुळे, बोलीभाषांमुळे समृद्ध झाली.” मराठी भाषेचे अभिजातपण जितके महत्त्वपूर्ण आहे, तितक्याच या लोकभाषेचे जतन-संवर्धनसुद्धा आवश्यक आहे. मराठीसारख्या संस्कृतिसंचिताने संपन्न अशा भाषेचा विचार करायाचा झाल्यास, आपल्याला लक्षात येईल की, खरोखरच वेगवेगळ्या प्रवाहांमुळे आपली ही भाषा आशयसंपन्न आणि समृद्ध झाली आहे. एखाद्या नदीचा जसा खळखळता प्रवाह असतो, अगदी तसाच प्रवाह, भाषेच्या परिप्रेक्ष्यात आपल्याला दिसून येतो. वेगवेगळ्या बोलींच्या रानावनातून वाहत, तिने आजचे अभिजात रुप धारण केले आहे. एका पातळीवर आपल्या समाजमनाचा विचार करायाचा झाल्यास, तोसुद्धा अशा वेगवेगळ्या प्रवाहातून प्रगती करत असतो. प्रत्येक समाजमनाचे जे संस्कृतीसंचित असतं, तेसुद्धा या वेगवेगळ्या प्रवाहातून उतरोत्तर वृद्धिंगत होत राहतं. कला आणि सण-उत्सव हे दोन घटक या संस्कृतीचे महत्त्वाचे वाहक असतात, असं मानलं जातं. संस्कृतीचे हेच वाहक मोहन जाधव यांनी आपल्या कुंचल्यातून अत्यंत खुबीने टिपले आहेत.

नंदी म्हणजे भगवान शंकराचे वाहन. भारतीय संस्कृतीच्या प्रवासामध्ये आपल्याला कटाक्षाने ज्या प्रतीकांची आठवण होते, त्यातील एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नंदी! कृषिसंस्कृतीच्या ऊर्जितावस्थेमध्ये माणसाने ज्या प्राण्यांसोबत समन्वय साधत एका जीवनशैलीचा विकास केला, ते प्राणी म्हणजे ही गाय-बैल. यांच्या उदरामध्ये भगवंताचा वास आहे, असा विचार मांडणारी आपली संस्कृती, व्यक्तीचा आणि प्रकृतीचा किती समग्र विचार मानवजातीला देते, हे समजून घेणे आवश्यक आहे. परंपरेच्या याच प्रवाहामध्ये आपण या निर्मितीचा सन्मान करणं शिकलो आणि यातून एक सांस्कृतिक सोहळा जन्माला आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत साजरा होणारा बैलपोळा म्हणजे असाच एक उत्सव!

निसर्ग, पशु-पक्षी ही आपल्या संस्कृतीमध्ये केवळ साधनं नाही, तर ते आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत. मोहन जाधव ज्यावेळेस आपल्या कुंचल्यातून कागदावर या नंदीचं चित्र साकारतात, त्यावेळेला आपल्याला त्या नंदीच्या वेगवेगळ्या छटांचं दर्शन घडतं. ही चित्रं भावविभोर रंगांनी बहरलेली आहेतच, परंतु त्याचबरोबर या चित्रांचा केंद्रबिंदू म्हणून आपण ज्या नंदीला बघतो, तो केवळ नंदीच नसून एक परंपरेचा प्रवाह आहे, याची आपल्याला जाणीव होते. पोळ्यासाठी सजलेला हा नंदी एका वेगळ्याच थाटात, अनोख्या आवेशात आपल्यासमोर उभा ठाकला आहे, त्याच्या पाठीवरची त्याची रंगीबेरंगी घोंगडी, वेगवेगळ्या दागिन्यांनी सजलेलं त्याचं शरीर आणि या साऱ्यांहून अलिप्त असणारे त्याचे डोळे, जे थेट आपल्याशी संवाद साधतात, हा भाव चित्रातून कमालीचा जीवंत झाला आहे, असे आपल्याला दिसून येते.

नंदीबैलाच्या चित्रमालिकेसोबतच संगीतसाधनेची उज्ज्वल परंपरा, जे आपल्या जगण्यातून जीवंत ठेवतात, अशांच्या जीवनाचासुद्धा मोहन जाधव यांनी समग्र वेध घेतला आहे. देवाची गाणी गात, टाळ-चिपळ्या वाजवत दारी आलेला वासुदेव परंपरेची शिदोरी आपल्यासमोर उलगडत असतो, हेच उलगडणं आपल्याला मोहन जाधव यांच्या चित्रातून समोर येताना दिसतं. ‌‘गोंधळ‌’ साकारणारा गोंधळी या चित्रामध्ये पार्श्वभागात देवीचं उमटलेलं प्रतिबिंब, सोबत दीपमाळ, उगवणारा सूर्य आणि भगव्या रंगाने विणलेला आकाशाचा शेला, मंत्रमुग्ध करणारा आहे. महाराष्ट्राच्या मातीची ही अभिजात परंपरा, मागची अनेक शतकं वाहत आज आपल्यापर्यंत पोहोचली आहे. दृश्यात्मक पातळीवर ही लोकपरंपरा मोहन जाधव यांनी समर्थपणे केवळ साकारलीच नाही, तर तिच्याकडे बघण्याची नवीन दृष्टी आपल्याला दिली आहे.

तीन दशकांहून अधिक काळ चित्रविश्वामध्ये स्वतःच्या अभिव्यक्तीची वेगळी छाप निर्माण करणारे मोहन जाधव यांच्यावर ‌‘पद्मश्री‌’ वासुदेव कामत यांच्यासारख्या दिग्गजांचा प्रभाव आहे. त्यांच्या रचनेतील खुलेपणा, चित्रांमधला प्रकाशाचा खेळ यांमुळे त्यांच्या चित्रातील वेगळेपण हे दर्शकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे. त्यांच्या चित्रातील नियोजन, हे जितके सहज वाटते, तितकेच ते आखीव-रेखीव विचारांतून उमटलेले असते, याची आपल्याला निरीक्षणानंतर प्रचिती येते. कला ही माणसाची अभिव्यक्ती असते. त्याची अभिव्यक्ती, त्याच्या जीवनाचे, अनुभवाचे, आकलनाचा समग्र विचार त्याच्या कलेमध्ये उमटतो. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून लोककला, लोकजीवन, लोकदर्शन या साऱ्यांचा एक ठसठशीत विचार त्यांनी आपल्या चित्रातून मांडला आहे.

चित्रांच्या माध्यमातून उलगडले लोककलेचे विश्व

आपल्याकडची ही जी परंपरा आहे (पोळा), ती सध्या दुर्लक्षित होत चालली आहे. लोप पावत चालली आहे, असं मी म्हणणार नाही. आधुनिकीकरणाच्या रेट्यामध्ये लोककलेचा यातून येणारा विचार दुर्लक्षित होत आहे. या लोककलेमध्ये आपल्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडतं. त्यामुळे ते जगासमोर आणण्यासाठी मी कलाकार म्हणून काय करू शकतो, तर चित्रांच्या माध्यमातून मी हे विश्व लोकांना दाखवू शकतो. हे संचित ज्यावेळेस आपल्या नजरेस येईल, त्यावेळेला ते आपण लक्षात घेणं, त्या उत्सवाचा विचार समजून घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.
- मोहन जाधव, चित्रकार


Powered By Sangraha 9.0