नवरात्र उत्सवात शोभायात्रांवर हल्ले अनेक ठिकाणी दुर्गा मूर्ती खंडित

    04-Oct-2025
Total Views |

मुंबई : नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये देशातील विविध भागांत काही धर्मांधांनी अराजकता पसरवल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका व गरबा कार्यक्रमांना लक्ष्य करत कट्टरपंथ्यांनी गोंधळ घातला.

काही ठिकाणी दुर्गा मातेच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. तर काही ठिकाणी मूर्तीची तोडफोडही करण्यात आली. अनेक गरबा मंडपामध्ये हिंदू नावांनी प्रवेश केलेल्या काही जिहादी तरुणांनी हिंदू मुलींशी छेडछाड केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

नवरात्र हे भक्ती व आनंदाचे पर्व असून, अशा प्रकारच्या कट्टरतावादी कारवायांमुळे सामजिक सौहार्द धोक्यात येत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. हिंदू संघटनांनी या घटनांचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीस प्रशासनाने या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा बंदोबस्त केला होता. तरीदेखील अशा घटना घडल्याने हिंदू समाजाने असा प्रश्न उपस्थित केला आहे की, हिंदूंच्या धार्मिक सणांच्या काळातच अशा प्रकारच्या घटना का घडवल्या जातात.

अनेक ठिकाणी गोंधळ आणि अराजकता

गांधीनगर - गुजरातच्या गांधीनगरमध्ये "आय लव्ह मोहम्मद" स्टेटसच्या वादानंतर गरबा मंडप आणि दुकानांवर हल्ला झाला. कट्टरपंथ्यांनी दगडफेक व जाळपोळ केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून ७० जणांना अटक केली.

मानखुर्द - मुंबईच्या मानखुर्द येथे दुर्गा मातेची प्रतिमा खंडित करण्यात आली. ढोलवादनावरून वाद झाल्यानंतर कट्टरपंथीयांनी धारदार हत्यारांनी हिंदूंवर हल्ला केला. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली.

विरार - महाराष्ट्रातील विरार येथील वि. वा. महाविद्यालयात विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप संदेशांमध्ये गरबा मंडपांमध्ये घुसून हिंदू मुलींना टार्गेट करण्याची योजना उघड झाली. शाहिद आणि फैज नावाच्या विद्यार्थ्यांनी संदेशांत “एकही हिंदू मुलगी सुटायला नको” असे लिहिले होते. याच कॉलेजमध्ये दांडीयाच्या कार्यक्रमादरम्यान मुलींचे व्हिडिओ डिस्कॉर्ड अॅप वर टाकून अश्लील कमेंट्सही करण्यात आल्या.

मीरा रोड – मुंबईच्या मीरा रोड येथे सोसायटीतील गरबा कार्यक्रमात मोहसिन खान नावाच्या व्यक्तीने १६ व्या मजल्यावरून अंडी फेकली. पोलिसांनी त्याच्यावर FIR दाखल केली.

बांसवाडा - राजस्थानच्या बांसवाडा येथे १६ वर्षीय मुलगा "आरव त्रिवेदी" या खोट्या नावाने गरबा मंडपात शिरला. त्याने १७ वर्षांच्या हिंदू मुलीशी छेडछाड केली व दबाव टाकला. हिंदू संघटनांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

रांची (झारखंड) – रांचीतील एका दुर्गा मंडपात ईसा मसीह व मरियम यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. हिंदू संघटनांच्या विरोधानंतर त्या काढून टाकण्यात आल्या व हिंदू देवतांची छायाचित्रे लावली गेली.