मुंबई: मराठी सिनेविश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. एकेकाळची प्रसिद्ध आणि हरहुन्नरी अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७०-८० च्या दशकात प्रचंड गाजलेला चित्रपट म्हणजे 'पिंजरा' आणि याच पिंजरा मधील चंद्रकला. पिंजराला अजरामर करणारी अभिनेत्री म्हणजेच संध्या शांताराम आणि अभिनेते श्रीराम लागू. संध्या यांच्या जाण्याने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनीही ट्वीट करत संध्या यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यात ते म्हणतात,
भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !
संध्या शांताराम, यांचे खरे नाव विजया देशमुख होते. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९३८ ला कोची, केरळमध्ये झाला होता. सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असलेल्या विजयाने लवकरच सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. १९५९ मध्ये आलेल्या व्ही शांताराम यांच्या नवरंग सिनेमातून संध्या यांनी कमाल दाखवली होती. "अरे जा रे हट नटखट" हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे. अरे जा रे हट नटखट या गाण्यासाठी त्या विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकल्या. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नव्हते; गाण्यात तुम्हाला दिसणारी स्टेप संध्या यांनी स्वतः सादर केली होती. दिग्दर्शकाला हे गाणे खरोखरच खास बनवायचे होते, म्हणून त्यांनी खऱ्या हत्ती आणि घोड्यांची व्यवस्था केली. सेटवर खऱ्या प्राण्यांमध्ये संध्या निर्भयपणे नाचत होत्या. पुढे व्ही शांताराम संध्या यांच्या प्रेमात पडले. त्यांची काम करण्याची वृत्ती आणि कलेच्या प्रेमात ते पडले. आधीच विवाहित असतानाही त्यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता.