उपजतच संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्सची आवड आणि त्याला ओघाने मिळालेली संस्कृतच्या ज्ञानाची जोड या सर्वांचा उत्कृष्ट मिलाप साधलेल्या संस्कृत रचनाकार डॉ. श्रीहरि गोकर्णकर यांच्याविषयी...
'यथा ह्येकेन चक्रेण न रथस्य गतिर्भवेत्| एवं पुरुषकारेण विना दैवं न सिद्ध्यति॥’ भावार्थ असा की, दैव आणि प्रयत्न दोन्ही एकत्र आल्यावर कार्य निश्चितच सिद्धीस जाते. जणू हे वचन साक्षात् डॉ. श्रीहरि गोकर्णकर यांच्यासाठीच तयार झाल्यासारखे वाटते. हरिभक्तपारायण अशा वारकरी कुटुंबात श्रीहरि यांचा जन्म झाला. हरिपाठ, ओव्या, प्रवचने यांचे घरी संस्कार असले, तरी संस्कृत कधी कानांवरही पडले नव्हते.
शाळेत अनिवार्य असल्याकारणानेच त्यांचा संस्कृतशी संबंध आला. पण तेही फक्त धडे आणि व्याकरण पाठ करून, गाईड वाचून त्यांनी कशीबशी तीन वर्षे पार पाडली. त्यामुळे दहावीनंतर पुन्हा संस्कृतकडे वळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
अभियांत्रिकी करण्यासाठी श्रीहरि डिप्लोमा करत होते पण, मित्राच्या आग्रहाखातर ते त्याच्या क्लासमध्ये संस्कृत शिकवू लागले. वास्तविक ही त्यांची परीक्षाच होती, पण मित्रासाठी त्यांनी हे आव्हान स्वीकारले. पुन्हा गाईड वाचून सगळा अभ्यास केला. वाचता वाचता त्यांना यामध्ये रस वाटू लागला. श्रीहरि यांची संस्कृत शिकण्याची खरी सुरुवात ही शिकवण्यातूनच झाली! मग ते स्वान्तःसुखाय संस्कृत शिकवू लागले.
श्रीहरि यांना बालपणापासूनच स्टेज परफॉर्मिंग, अभिनय, निवेदन इत्यादींची आवड होती. त्यामुळे सभाधीटपणा आणि समोरच्याला खिळवून ठेवण्याची कला त्यांच्या अंगी होतीच. त्यामुळे, व्याकरणातील शब्दांना चाल लावणे, सोबत डफली वाजवणे असे वेगवेगळे प्रयोग करत ते लवकरच विद्यार्थ्यांमध्ये प्रिय झाले. त्यांचे ‘संस्कृतश्री’नामक युट्यूब चॅनेलही सुप्रसिद्ध आहे.
डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगसाठी इच्छित महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने ते नोकरी करू लागले; पण तेथील कामात त्यांचे कलाप्रिय मन रमत नव्हते. संस्कृत शिकवण्याचा दोन वर्षांचा अनुभव आणि संस्कृत क्षेत्रात करिअर करण्याची प्रबळ इच्छा, यांमुळे मोठ्या धीराने श्रीहरि यांनी त्यांच्या वडिलांपुढे आपली इच्छा व्यक्त केली आणि वडिलांनीही मुलाच्या इच्छेखातर त्यांना परवानगी दिली. त्यांनी बारावी केली नसल्याने ‘बीए’ला प्रवेश मिळणे कठीण झाले. म्हणून त्यांनी दूरस्थ पद्धतीने ‘अर्थशात्र’ अभ्यासत ‘बीए’ पदवी मिळवली आणि पुढे प्रवेशपरीक्षा देऊन, ‘भारतीय संस्कृतीपीठम्’मधून व्याकरणशास्त्रात ‘एमए संस्कृत’ पूर्ण केले. विषयाचे ज्ञान अधिक सखोल व्हावे यासाठी पुन्हा एकदा, मुंबई विद्यापीठातून व्याकरणशास्त्रात ‘एमए संस्कृत’चे शिक्षण घेतले. या काळात ते विविध शिकवणी वर्गांमध्ये, महाविद्यालयांमध्ये शिकवत होते आणि दिवसरात्र साहित्यवाचनही करत होते.
याच काळात त्यांनी ‘संस्कृतभारती’च्या निवासी शिबिरात सहभाग घेतला. तेथील बहुतेक सर्वच दिवस श्रीहरि फक्त श्रोत्याच्या भूमिकेत होते. पण ऐकून ऐकून त्यांना संभाषण आपोआप येऊ लागलं. त्यांची विचारप्रक्रियाच संस्कृतमध्ये होऊ लागली. पुढे त्यांनी ‘छंदशास्त्र’ विषय घेऊन ‘एमफिल’ही केले आणि पूव शिकलेल्या अर्थशास्त्रासह संस्कृतची सांगड घालून, ‘बीएड’ पदवी देखील संपादन केली. त्यानंतर ते क्लास, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व ठिकाणी अभ्यागत शिक्षक म्हणून शिकवू लागले. ‘रामरक्षेतील छंद’ अशा विषयांवर त्यांची व्याख्याने आजही होतात. ‘काव्यशास्त्राच्या अंगाने काही वृत्तांचे सांगोपांग अध्ययन’ करत, त्यांनी ‘पीएचडी’ मिळवली आहे. विशेष म्हणजे, ठराविक वृत्तांचा वापर कुठे करावा, याचे पूर्वमान्य ठोकताळे विसंगत असल्याचे त्यांनी सिद्ध केले. छंदांच्या पहिल्या उल्लेखाची कालनिश्चिती केली. परंतु, छंदशास्त्र हा विषय फक्त पुस्तकी न ठेवता, त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यातूनच ते संस्कृतमध्ये लिखाणही करू लागले. संस्कृत वचने आणि सुभाषितांची सुयोग्य गुंफण करत, त्यांनी असंख्य स्वरचित गाणी आणि ‘माऊली माऊली’, ‘आई भवानी तुझ्या कृपेने’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘श्रीवल्ली’, ‘सैराट’, ‘चंद्रा’ अशा विविध गाण्यांचे संस्कृत भावानुवादही केले आहेत.
पैकी ‘श्रीवल्ली’ गाणे ऐकून त्यांना एका संस्कृतप्रेमीने संपर्क केला आणि पुढे मैत्री होत, एक संगीतनाटिका करण्याची संकल्पना मांडली. पुढे कथानकावर संस्कार करून, सुयोग्य अभिनेते हेरून ते सादरही करण्यात आले. डॉ. श्रीहरि यांच्या रचनांना चाली देण्याचे काम त्यांचे मित्र करत असत, त्यामुळे खऱ्या अर्थाने एकमेकांना पूरक ठरले. त्यांचा ‘गंधर्वसख्यम्’नामक वाद्यवृंद आहे. ‘श्राव्या-द संस्कृत सिंफनी’ या स्वरचित गाण्यांच्या कार्यक्रमालाही प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे.
डॉ. श्रीहरि यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. डॉ. श्रीहरि हे संशोधनक्षेत्रातदेखील कार्यरत आहेत. त्यांनी नाट्यशास्त्राचे प्रात्यक्षिक दृष्टिकोनातून, अनुभवजन्य भाषांतर करत पदच्छेद-अन्वयासहित पहिला, दुसरा भाग प्रकाशित करण्यातही साहाय्यकाची भूमिका बजावली आहे. सध्या ते एका चित्रपटाच्या कथानकासाठी संशोधनात्मक लेखन करत आहेत. अध्यापन, संशोधन आणि परफॉर्मिंग आर्ट्स अशा सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या अष्टपैलू डॉ. श्रीहरि गोकर्णकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप खूप शुभेच्छा!