राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : सेवा, त्याग आणि राष्ट्र उभारणीचे शतक

    04-Oct-2025
Total Views |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभरी गाठली. गेल्या 100 वर्षांच्या प्रवासात संघाने प्रत्येक श्वास हा मातृभूमीच्या कार्यासाठीच अर्पण केला आणि आजही त्याच मार्गावरून संघ वाटचाल करत आहे. असे असले तरीही संघावर अनेकदा टीका होतेच! संघाचे काम नेमके काय आहे, याचा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडक उदाहरणांच्या माध्यमातून घेतलेला आढावा...

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी दि. 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, तेव्हा विशेष कोणी कल्पनाही केली नसेल की, येत्या काही वर्षांमध्ये संघ किती उल्लेखनीय प्रवास करेल! आज रा. स्व. संघ निःस्वार्थ सेवेचे एक जिवंत उदाहरण म्हणून उभा आहे. त्याने भारताच्या सामाजिक रचनेला आकार दिला असून, त्याच्या सार्वभौमत्वाचे रक्षणही केले आहे. देशातील असुरक्षित समुदायांना सक्षम केले आहेच आणि कालातीत संस्कृतीमूल्यांचेही पालनपोषण केले आहे. रा. स्व. संघ आपली शताब्दी साजरी करत असताना, त्याच्या प्रवासाला उजाळा देणे उचित ठरेल.

दिल्लीत अलीकडच्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी, राष्ट्राला संघटनेच्या समावेशक नीतिमत्तेची आठवण करून दिली. त्यांनी प्रतिपादन केले की, “धर्म ही वैयक्तिक निवडीची बाब आहे; यामध्ये कोणतेही आमिष किंवा बळजबरी नसावी. हा दृष्टिकोन संघाचे संस्थापन तत्त्वज्ञान प्रतिध्वनित करतो; संघर्षाऐवजी सुसंवाद, विभाजनाऐवजी सामूहिक शक्ती आणि केवळ भौतिक कल्याणातच नव्हे, तर चारित्र्यनिर्माणात रुजलेला समाज निर्माण करणे.”

दैनंदिन शाखा आणि स्वयंसेवक चालित उपक्रमांद्वारे संघाने भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल शिस्त, लवचिकता आणि अभिमान वाढवण्याचा प्रयत्न करून, समाज आणि राष्ट्रसेवा हीच आपली सर्वोच्च जबाबदारी मानणाऱ्या व्यक्तींना घडवले आहे. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात राष्ट्र उभारणीतील शतकभराच्या भूमिकेबद्दल संघाचे कौतुक केले, तेव्हा आश्चर्य वाटले नाही. जगातील सर्वांत मोठी सेवाभावी संघटना असे संबोधून त्यांनी, भारतीयांना आठवण करून दिली की, स्वतंत्र भारतातील सर्वांत प्रभावशाली सामाजिक-सांस्कृतिक चळवळींमध्ये रा. स्व. संघ आपले आगळेपण कसे राखून आहे!

फाळणीच्या दुःखात लपेटून स्वातंत्र्याची प्राप्ती झाली, त्यावेळी प्रचंड जीवितहानी झाली आणि लाखो लोकांना आपापली घरे सोडावी लागली. या दुःखद घटनेत संघ स्वयंसेवक एक शिस्तबद्ध आणि निःस्वार्थ शक्ती म्हणून उभे राहिले, त्यांनी या हत्याकांडातील असंख्य बळींना वाचवले, त्यांचे पुनर्वसन केले आणि त्यांचे संरक्षण केले. द्वितीय सरसंघचालक एम. एस. गोळवलकर गुरुजी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली संघाने समुदायांना एकत्र केले, निर्वासितांसाठी छावण्या उभारल्या, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवली, असुरक्षित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेले आणि शत्रूने वेढलेल्या घरांसाठी संरक्षण व्यवस्था केली. संघाचे योगदान इतके होते की, परिस्थितीने कातावून गेलेल्या काँग्रेस नेत्यांनीही पंजाबमधील आपल्या कुटुंबांचे आणि समुदायांचे रक्षण करण्यासाठी संघाची मदत मागितली, असे म्हटले जाते. द ट्रिब्यूनने आपल्या एका वृत्तात संघाला ‌‘पंजाबची तलवार बाहू‌’ म्हटले यात आश्चर्य नाही.फाळणीनंतरदेखील ही भावना कायम राहिली. 1984 सालच्या शीखविरोधी दंगलीदरम्यान, संघ पुन्हा एकदा तारणहार म्हणून पुढे आला. त्याने शीख समुदायाला आश्रय, संरक्षण आणि मदत दिली. इंदिरा गांधींच्या हत्येपूव आणि नंतर हिंदू-शीख ऐक्य राखण्यात संघाने सन्माननीय भूमिका बजावली, असे प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी जाहीरपणे मान्य केले.

या वारशाचा विचार करता, काही लोक संघावर बहुसंख्यवादी संघटना असल्याचा आरोप करतात, तो निराधार आणि चुकीचा आहे. स्वातंत्र्यादरम्यान त्यांनी भारतातील अल्पसंख्याकांचे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांचे संरक्षण करण्यास मदत केली. मार्च 1947 साली जेव्हा मुस्लीम लीगने भडकावलेले जमाव सुवर्ण मंदिराकडे निघाले, तेव्हा तलवारी आणि लाठ्या घेऊन सशस्त्र संघ स्वयंसेवकांनी त्यांचा सामना केला आणि त्यांना माघार घ्यावी लागली. तीन दिवसांनंतर जेव्हा पवित्र शीख मंदिराला आणखी एका समन्वित हल्ल्याचा धोका निर्माण झाला, तेव्हा संघ स्वयंसेवकांनी बचावासाठी मानवी कडे तयार केले आणि तासन्‌‍तास लढा दिला, हल्लेखोरांना यशस्वीरित्या मागे हटवले आणि गुरुद्वारा पुन्हा सुरक्षित केला.

देशाच्या एकात्मतेमधील संघाची भूमिका फारच कमी ज्ञात असेल. काश्मीरपासून गोव्यापर्यंत, दादरा आणि नगर हवेलीपर्यंत भारताची प्रादेशिक अखंडता जपण्यात, संघाने निर्णायक भूमिका बजावली आहे. जेव्हा पाकिस्तान समर्थित आदिवासी आक्रमकांनी जम्मू आणि काश्मीरवर हल्ला केला, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी महाराजा हरि सिंह यांना भारतात सामील होण्यासाठी गुरुजींची मदत मागितली. गुरुजींनी श्रीनगरपर्यंत प्रवास केला आणि त्यांना त्वरित विलीनीकरणाची धोरणात्मक गरज पटवून दिली. संघाच्या स्वयंसेवकांनी 1947-48 सालच्या युद्धात रसद, दळणवळण उपलब्ध करून सैन्याला मदत केली. तसेच, मीरपूर आणि मुझफ्फराबादसारख्या भागांतून पळून जाणाऱ्या निर्वासितांसाठी पुरवठा आणि मदत व्यवस्था केली.

1954 साली स्वयंसेवकांनी दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. के. आर. मलकानी यांच्या ‌‘द आरएसएस स्टोरी‌’ या पुस्तकानुसार, दि. 2 ऑगस्ट 1954 रोजी नाना काजरेकर आणि सुधीर फडके यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 स्वयंसेवकांनी रायफल, ब्रेन गन आणि स्टेन गनधारी 175 पोर्तुगीज सैनिकांना पळवून लावले आणि दादरा-नगर हवेली मुक्त केली. त्याचप्रमाणे, गोव्याच्या मुक्तीसाठी संघ भूमिगत स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला. अशाप्रकारे संघ नेहमीच भारत आणि त्याच्या आत्म्याला बळकटी देण्यासाठी लढला आहे. 1975 सालच्या आणीबाणीच्या काळात संघ प्रतिकाराचा कणा बनला आणि भारताच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी लाखो लोकांना एकत्र केले.

जानेवारी 1976 साली प्रकाशित झालेल्या ‌‘द इकोनॉमिस्ट‌’च्या मते, या चळवळीचे धक्कादायक सैन्य प्रामुख्याने जनसंघ आणि त्याच्या संलग्न संस्थांचे आहे, ज्यांची एकत्रित सदस्य संख्या एक कोटी असल्याचा दावा केला जातो. त्यापैकी सहा हजार पूर्णवेळ कार्यकर्त्यांसह 80 हजारजणांनी तुरुंगवास भोगला. ज्या वेळी लोक आणि संस्था फक्त झुकण्यास सांगितल्यावर देखील रांगण्यास तयार होत्या, त्या वेळी संघाने हुकूमशाहीविरुद्ध लढा दिला आणि भारतीय लोकशाही मजबूत करण्याचे काम केले.

संविधानिक मूल्यांप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेला पुढे नेत रा. स्व. संघाने, आदिवासी आणि उपेक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी स्वतःला समर्पित केले आहे. 1952 साली स्थापन झालेली ‌‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम‌’ ही देशातील सर्वांत मोठी आदिवासी कल्याणकारी संस्था आहे. आज ती देशातील 323 जिल्ह्यांमधील 52 हजार गावांमध्ये 20 हजारांहून अधिक प्रकल्प चालवते. यामध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे. आदिवासींना आपल्या मूळ ओळखींशी तडजोड न करता राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या आदिवासी अभिमानाला बळकटी देणे आणि त्यांना मोठ्या भारतीय ओळखीशी जोडणे हा रा. स्वं. संघाचा दृष्टिकोन आहे.
महात्मा गांधींशी असलेल्या संबंधांबद्दलही संघावर अनेकदा अन्याय्य टीका केली जाते. जरी हे खरे आहे की, महात्मा गांधी आणि संघ यांच्यात काही मुद्द्यांवर काही मतभेद होते, जसे काँग्रेसच्या आतमध्येही होते, तरीही त्यांच्या नात्याचे शत्रुत्व किंवा शत्रुत्वाच्या दृष्टीने चित्रण करणे दिशाभूल करणारे ठरेल. त्यांच्यातील मतभेद परस्पर आदराच्या आड कधीच आले नाहीत. 1934 साली जेव्हा गांधीजींनी वर्धा येथील संघ छावणीला भेट दिली, तेव्हाच हे स्पष्ट झाले. त्यांना संघटनेची शिस्त, अस्पृश्यतेचा पूर्ण अभाव आणि कठोर साधेपणा पाहून धक्का बसला. दि. 16 सप्टेंबर 1947 रोजी फाळणीच्या गोंधळात गांधीजींनी दिल्लीत संघाच्या सभेला संबोधित केले आणि त्यांच्या सेवा आणि बलिदानाच्या भावनेचे कौतुक केले. दि. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघानेही आदर म्हणून, सर्व शाखा 13 दिवसांसाठी स्थगित केल्या. संघाच्या इतिहासातील ही एकमेव वेळ होती.ही सहभागाची भावना जिथे आदर किंवा रचनात्मक कार्याला मतभेदांचा अडथळा होत नाही. रा. स्व. संघ आपल्या पारंपरिक पायाबाहेरील प्रदेश आणि समुदायांकडे ज्या पद्धतीने पाहतो, त्यावरूनदेखील हे दिसून येते. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यानंतर वसाहतवादी दुटप्पीपणा आणि धोरणात्मक त्रुटींमुळे ईशान्येकडील प्रदेश अलिप्तता आणि बंडखोरीने भरलेला होता. 1946 साली गुवाहाटी येथे पहिली शाखा स्थापन केल्यापासून, संघाने या प्रदेशाला राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावली आहे. शाळा, आरोग्यसेवा शिबिरे, आपत्ती निवारण आणि समुदाय-निर्माण उपक्रमांद्वारे त्यांनी विश्वास निर्माण केला आणि विविध समुदायांमधील दरी कमी केली आहे.

सेवेचे शतक पूर्ण करीत असताना रा. स्व. संघाने राष्ट्र उभारणीतील आपले योगदान स्थिर आणि सतत वाढते ठेवले आहे. या भावनेचा अलीकडील पुरावा ‌‘कोविड-19‌’च्या उद्रेकादरम्यान दिसून आला, जेव्हा मे 2021 साली जवळपास 300 स्वयंसेवकांनी कोलारमधील दीर्घकाळ बंद पडलेल्या बीजीएमएल रुग्णालयाचे, दोन आठवड्यांत पुनरुज्जीवन केले आणि शेकडो रुग्णांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासाही दिला. अशा उदाहरणांवरून दिसून येते की, 100 वर्षांनंतरही रा. स्व. संघ शतकापूव कल्पना केल्याप्रमाणे शांतपणे आपली भूमिका कशी बजावत आहे.

- राजनाथ सिंह