मुंबई महापालिकेवर मशाल पेटवण्याच्या लोभापायी ठाकरे पितापुत्र रोज वेगवेगळ्या लृप्त्या लढवताना दिसत आहेत. अलीकडेच उबाठा गटाच्यावतीने वरळीत एक निर्धार मेळावा आयोजित केला होता. याला जरी ‘निर्धार मेळावा’ असे नाव दिले असले, तरी इथेही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाच्या जुन्याच संहितेचे वाचन नव्याने केले. या मेळाव्यात मुख्य आकर्षण ठरले आदित्य ठाकरे. आदित्य यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वरळीतील निवडणूकयाद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस आणि ठाकरे कुटुंबांचे सख्य झाल्यापासून, राहुल गांधींच्या मार्गानेच राजकारण पुढे नेण्याचे आदित्य यांनी ठरवले दिसतेे. यावेळीही त्यांनी राहूल यांचीच री ओढली. राहुल यांच्यासारखेच प्रेझेंटेशन देत आदित्य यांनी भाषण केले. किमान काही आरोप तरी नवे असावे, तर तेही नाही. काही फरक असलाच, तर तो फक्त कपड्यांचाच!
खरे तर, उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले इथपर्यंत ठीक होते. परंतु, आता तर ते राहुल यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या नौटंकीचीही परंपरा पुढे चालवत आहेत. आदित्य यांनी निर्धार मेळाव्यात राहुल गांधींप्रमाणेच, हातात रिमोट घेत प्रेझेंटेशन दिले. त्यामुळे या निर्धार मेळाव्यातून अन्य कुणाच्या हाती काही लागो न लागो, परंतु यापुढे राहुल गांधींना मात्र त्यांचा वारसदार आदित्य ठाकरे यांच्या रुपाने मिळाल्याचे नक्कीच म्हणता येईल. असो, ‘ईव्हीएम’ आणि मतदारयादीतील घोळ या विरोधकांच्या रडगाण्याला आता जनताही कंटाळली आहे. उद्धव ठाकरे तर त्यांच्या भाषणात काय बोलणार? हे जनतेलाही तोंडपाठ झाले आहे. शिवाय, आपल्याला मुंबई महापालिकेत विजय मिळेल अशी काही आपली कामगिरी नसल्याची पूर्ण कल्पना ठाकरे कुटुंबीयांना आली आहेच. त्यामुळे येणार्या निवडणुकीत जनता आपल्याकडे पाठ फिरवेल हे लक्षात आल्यानेच, हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे दिसते. दुसरीकडे, राहुल गांधींच्या वारसाहक्काच्या शर्यतीत मनसेही उडी घेणार असल्याचे समजते. तसे झाल्यास, मनसेवर आलेली ही वेळ म्हणजे दुर्दैवच म्हणावे लागेल. थोडयात काय, तर ’ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला’ अशीच सध्या राज्याच्या राजकारणाची परिस्थिती दिसते.
अबू आझमींचा जावईशोध
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, दि. ३१ ऑटोबर ते दि. ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गाण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. तसे पाहिल्यास अतिशय सरळ, साधा, सोपा आणि धोरणात्मक असा हा निर्णय. या निर्णयामागे राष्ट्रप्रेमाची भावनाच कोणालाही दिसेल. मात्र, राष्ट्रप्रेमाच्या निर्णयातही काही खुसपट काढणार नाहीत, ते विरोधक कसले? त्यातही अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांची कीव करावी तेवढी थोडीच. बरे, खुसपट काढावे तरी काय? तर म्हणे, ‘वन्दे मातरम्’ गीत गाण्याचा निर्णय म्हणजे मुस्लीम धर्मीयांना त्रास देण्याचा प्रकार आहे. मुस्लीम धर्मात सर्वांत जास्त मातेचा सन्मान केला जातो, पण मातेची पूजा केली जाऊ शकत नाही का? केवळ अल्लाचीच पूजा केली जाऊ शकते परंतु, ‘वन्दे मातरम्’ बंधनकारक करणे योग्य नसून, मुस्लीम धर्माच्या आस्थेकडे लक्ष दिले पाहिजे असे अबू आझमी यांचे म्हणणे आहे.शासनाचा आदेश काय आहे, शासननिर्णयात काय लिहिले आहे याबद्दल अवाक्षरही वाचता, माध्यमांनी प्रश्न विचारला म्हणून उगाच काहीतरी बडबडून मोकळे व्हायचे, हीच अबू आझमी यांची जुनीच सवय.
खरे तर, राज्यातील शाळांमध्ये रोज ‘वन्दे मातरम्’ गीताची केवळ पहिली दोनच कडवी गायली जातात. परंतु, १५० वर्षेपूर्तीचे औचित्य साधून, दि. ३१ ऑटोबर ते दि. ७ नोव्हेंबरपर्यंत शाळांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन व्हावे असा या निर्णयामागचा हेतू आहे. परंतु, चोराच्या मनात चांदणे या म्हणीप्रमाणे कुठल्याही गोष्टीच्या वावड्या उठवणे, एवढेच अबू आझमी यांचे काम. तेच त्यांनी यावेळीही करत हा निर्णय मुस्लीम जनतेच्या विरोधात असल्याचे जाहीरही केले. एवढेच नाही तर मतांसाठी भाजप काहीही करू शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे. असे बिनबुडाचे आरोप करणारे आझमी मात्र सोयीस्कररित्या विसरतात की, ऑटोबर १९३७ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीने ‘वन्दे मातरम्’ या गीताची पहिली दोन कडवी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली होती. तेव्हा काँग्रेसचा हा निर्णय मुस्लीम विरोधात आहे असे म्हणायचे धाडस आझमी दाखवणार का? त्यामुळे हा जावई शोध लावला कसा हे आझमी यांनी स्पष्ट केलेच पाहिजे.