‘टेलरस्मार्ट’ : भारतीय शिवणाची जागतिक झेप!

31 Oct 2025 10:18:20
Tailorsmart
 
देशात कपड्यांची खरेदी हा वर्षभर चालणारा व्यवहार आहे. भारताच्या प्रचंड मोठ्या बाजारपेठेमुळे या क्षेत्रातील व्यवसायाची उलाढालही मोठीच! मात्र, या क्षेत्रात कशाला अधिक महत्त्व असेल, तर नावीन्य टिकवत ग्राहकांच्या साधलेल्या समाधानाला. यालाच महत्त्व देत ग्राहकांना आवडेल, परवडेल असे मापात कपडे शिवून देण्याचा उपक्रम सुरु झाला, तो म्हणजे ‘टेलरस्मार्ट’. या स्टार्टअपची वैशिष्ट्ये आणि स्वरुपाचा घेतलेला आढावा...
 
ग्राहकांना त्यांचे शरीर व व्यक्तिमत्त्व यानुरूप साजेसे कपडे शिवून देण्याच्या व्यावसायिक उद्दिष्टाने, ‘टेलरस्मार्ट’ या शिलाई स्मार्टअपची स्थापना करण्यात झाली. गेल्या दशकभराच्या कालावधीत या नावीन्यपूर्ण स्मार्टअपने, चांगलेच नाव आणि यश कमावले आहे. ‘टेलरस्मार्ट’ची सुरुवात २०१४ मध्ये प्रविण झाडे व जॉय डिसिल्वा या दोन उद्योजकांनी केली. अल्पावधीतच त्यांच्या व्यवसायातील नव्या प्र्योगाला अपेक्षित प्रतिसादही मिळू लागला. नंतर व्यक्तिगत कारणांमुळे, जॉय डिसिल्वा यांनी ‘टेलरस्मार्ट’ सोडण्याचा निर्णय घेतला.
 
त्यामुळे या स्मार्टअपला, एका नव्या उद्योजक सहकार्‍याची गरज प्रकर्षाने भासू लागली. त्यावेळी ‘टेलरस्मार्ट’ला समर्थ साथ मिळाली ती प्रीतम ओन्स्कर या तेवढ्याच हौशी व उत्साही उद्योजक सहकार्‍याची. मुख्य म्हणजे, प्रीतम ओन्स्कर हे ‘टेलरस्मार्ट’चे जुने ग्राहक! ’टेलरस्मार्ट’च्या दर्जेदार सेवा व शिवण वैशिष्ट्याची भूरळ पडलेल्या प्रीतम यांनी, ‘टेलरस्मार्ट’मध्ये सहर्ष भागीदारी स्वीकारली. यानंतर ‘टेलरस्मार्ट’चा अधिकच दमदार असा प्रवास सुरू झाला, हे विशेष.
  
 एका नव्या व वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टअपसाठी काम करणार्‍या प्रीतम ओन्स्कर यांच्या मते, ‘टेलरस्मार्ट’चे काम एका साध्या व महत्त्वाच्या व्यावसायिक तत्त्वावर चालते. हे मूलभूत व्यवसाय तत्त्व म्हणजे, प्रत्येक ग्राहकाला त्याच्या शरीरयष्टी व मापानुरूप कपडे शिवून देणे. मात्र, हे करतानाच त्या ग्राहकाच्या वैयक्तिक गरजा व प्रचलित प्रगत पद्धतींचा मेळ घालून, प्रत्येक ग्राहकासाठी विशेष स्वरूपाचे व नेमया प्रकारचे कपडे शिवणे याचा अंतर्भाव हे ’टेलरस्मार्ट’चे विशेष होत. ही छोटी व महत्त्वाची बाब आमच्या व्यवसायात मोठी परिणामकारक ठरल्याचा उल्लेख, प्रीतम ओन्स्कर आवर्जून करतात.
 
‘टेलरस्मार्ट’चे संचालक प्रीतम ओन्स्कर यांच्या मते, मूलतः तयार शिवलेले म्हणजेच रेडीमेड कपडे खरेदी करून त्यांचा प्राधान्याने वापर करणे, ही बाब युरोपसह पाश्चात्य देशांमध्ये सर्वमान्य आहे. त्यांच्या मते, भारतामध्ये मात्र तयार कपड्यांच्या संदर्भातील वापर आणि आवड सर्वस्वी वेगळी आहे. यातूनच भारताला जागतिक स्तरावर कपडे शिवण्याच्या व्यवसायात, पुढाकार घेण्यासाठी नेहमीच मोठी संधी असेल, हे लक्षात ठेवायला हवे.
 
यासंदर्भातील उपलब्ध आकडेवारी व तपशिलानुसार, भारतात सध्या असंघटित व अनौपचारिक स्वरूपात काम करणार्‍या व कौशल्यप्राप्त अशा शिलाई कामगिरांची संख्या सुमारे तीन कोटींवर आहे. सध्या देशांतर्गत कपड्यांची शिलाई व संबंधित शिवणकाम याद्वारे होणार्‍या व्यवसायातून, दरवर्षी सुमारे २६ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. हा व्यवसाय वाढण्यासाठी मोठा वाव आहे, असे जाणकारांचे मत आहे.
 
जागतिक स्तरावर कपडे शिलाई व्यवसायासंदर्भात आज, भारताला प्रथमपसंती दिली जाते. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आजही भारतात कपडे शिवण्यासाठी लागणारा खर्च जागतिक पातळीवरील खर्चापेक्षा न्यूनतम असतो. परंपरागत व पिढीजात कारागिरी व कौशल्यपूर्ण शिलाईकामामुळे, भारताने तयार कपडे उद्योगात आपले अग्र स्थान कायम राखले आहे. सरकारचे लघुउद्योगांसह अशाप्रकारच्या विविध उद्योगांना सहकार्य करण्याचे धोरणही या यशासाठी पूरक असेच ठरते. भारतात कपडे शिलाई उद्योगांसाठी लागणारे, आवश्यक असे तंत्रज्ञान सहज उपलब्ध आहे.
 
सध्याच्या सार्वत्रिक स्पर्धेच्या युगात ‘टेलरस्मार्ट’चे प्रमुख वेगळेपण व वैशिट्ये सांगताना संचालक प्रीतम ओन्स्कर नमूद करतात की, ग्राहकांचे कपडे नेमके व त्यांना हव्या त्या पद्धतीने शिवताना, आमच्या कारागिरांचा अनुभव व कौशल्यांसह शिवण्यासाठी आम्ही ग्राहकांच्या मापाबरोबरच, त्यांची आवड आणि अपेक्षाही लक्षात घेतो. याशिवाय ग्राहकांची आवड व बजेट यांची नेमकी सांगड घालून, त्यांच्या आवडीनुसारच कपड्यांची शिलाई करून देतो. यामुळे ग्राहकांच्या रंगसंगतीपासून सर्वार्थाने त्यांच्या पसंतीचे कपडे, तुलनेने मापक खर्चात त्यांना मिळू शकतात. प्रीतम यांच्या मते, हीची सर्वांत मोठी त्यांची जमेची व्यावसायिक बाजू ठरते.
 
‘टेलरस्मार्ट’च्या व्यवसाय प्रक्रियेतील पुढचा व ग्राहकांना भावणारा टप्पा म्हणजे त्यांचे शिवून तयार झालेले कपडे, ठरल्या दिवशीच वेळेवर ग्राहकांच्या घरी आवर्जून पोहोचते केले जातात. यासाठी नेहमीच विशेष काळजी घेतली जाते. आज कपडे बाजारातील ’ब्रॅण्डेड’ तयार कपड्यांच्या किमतीच्या तुलनेत, आमच्याकडे शिवून दिले जाणारे कपडे किमतीच्या बाबतीत सुमारे ४० टक्के स्वस्त किमतीत उपलब्ध होतात, असा प्रीतम ओन्स्कर यांचा दावा आहे.
 
या वेगळ्या व्यवसायाची पूर्वपीठिका म्हणजे, पुण्यातील मगरपट्टा येथे २०१७ मध्ये वेगळी कल्पना व ग्राहकांना काहीतरी वेगळे व मापक खर्चात देण्याच्या उद्देशाने याची सुरू झाली. तेव्हा सुरु केलेल्या केलेल्या ‘टेलरस्मार्ट’कडे केवळ २० टेलरिंग कारागीर जोडलेले होते. मात्र, संचालकांनी जिद्दीने उद्योज वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत, पाठपुरावा व प्रोत्साहन या सार्‍यांच्या यशस्वी समन्वयामुळेच, सध्या ‘टेलरस्मार्ट’शी सध्या ८०० टेलर्स जोडले गेले आहेत. सुरुवातीला केवळ पुरुष ग्राहकांच्या कपडे शिवण्यापासून सुरुवात झालेल्या या व्यवसायात, आता महिलांचेही कपडे शिवून मिळतात. यातूनही ‘टेलरस्मार्ट’चा व्यवसाय वाढण्यास मोठीच मदत झाली आहे.
 
यातूनच खास ‘टेलरस्मार्ट’साठी काम करणार्‍या टेलर्सचे, त्यांच्या व्यवसाय कौशल्यानुरूप वर्गीकरणही करण्यात आले आहे. उदाहरणार्थ ‘टेलरस्मार्ट’साठी काम करणार्‍या टेलर्सपैकी, सुमारे १०० जण केवळ पुरुषांचे कपडे शिवण्यामाधील विशेष तज्ज्ञ झाले आहेत. अशाच प्रकारे अन्य १०० जण महिलांच्या कपड्यांची शिलाई करतात. या विशेष कारागिरीमुळे, संबंधित ग्राहक समाधानी होतो व त्यातून व्यवसायवाढही होत आहे.
 
आपल्या व्यवसायाच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगताना प्रीतम ओन्स्कर आवार्जून नमूद करतात की, त्यांच्या व्यवसाय रचनेत नव्याने सामील होऊ इच्छिणार्‍या टेलर्सची, कौशल्यविषयक विशेष चाचणीही प्रसंगी घेतली जाते. यासाठी परस्परपूरक वा प्रसंगी सामूहिक कौशल्यांची जोड दिली जाते. यामागे मुख्य उद्देश कुशल कारागिरांच्या कौशल्यातून, ग्राहकांचे संपूर्ण समाधान व त्याद्वारे व्यवसायवाढ साधणे हाच आहे. आता भविष्यात आणखी दर्जेदार कपड्यांचा पुरवठा ग्राहकांना आवडेल, परवडेल अशा स्वरूपात व वाढत्या प्रमाणात करण्याचा प्रीतम ओन्स्कर यांचा मानस आहे.
 
- दत्तात्रय आंबुलकर 
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
Powered By Sangraha 9.0