सुदानच्या दारफुलमधील अल फेशर परिसरातील सौदी मॅटर्निटी होमवर, ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. त्यात ४६० माता आणि नवजात शिशुंची निर्मम हत्या झाली. मारणारे आणि मरणारे दोघेही मुस्लीमच. पण ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ही दहशतवादी संघटना अरब वंशाच्या मुस्लिमांची, तर अल फेशरमध्ये हकनाक मारले गेलेले फुर समुदायाचे मुसलमान. ते अरबी नसून अफ्रिकी वंशाचे. ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’च्या दहशतवाद्यांच्या मते, ते उच्च वंशाचे मुसलमान आहेत, तर हे आफ्रिकन मुसलमान दुय्यम दर्जाचे. मुस्लीम ब्रदरहुड! सत्ता आणि वंशश्रेष्ठत्वाच्या संघर्षात सुदानमध्ये नरसंहार सुरूच आहे.
सुदानमध्ये ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ने अल फशर परिसराला सशस्त्र घेराव घातला. घेराव घातलेल्या ठिकाणच्या प्रत्येक घरातील लोकांना बाहेर ओढून, सामुदायिकरित्या त्यांची हत्या केली. महिलांवर, बालक-बालिकांवरही सामुदायिक बलात्कार केले. मग ते त्या प्रसुतिगृहात घुसले. ड्रोनने हल्ले, जाळपोळ आणि बंदुकीने गोळ्या झाडत, रुग्णालयातील तब्बल ४६० लोकांना त्यांनी मारले. त्यात रुग्णालयात आरोग्यसेवा देणारेही होते. रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या माता, नुकतीच जन्मलेली बालके होती. भयंकर!
‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ म्हणजे ‘आरएसएफ’ने हे का केले, तर अल फेशर परिसरात राहणारे फुर मुस्लीम हे आफ्रिकी वंशाचे होते म्हणून. तसेच त्या रुग्णालयावर ‘सुदान आर्म फोर्स’ या संघटनेचा ताबा होता. ‘सुदान आर्म फोर्स’ म्हणजे ‘एसएएफ.’ ‘आरएसएफ’ आणि ‘एसएएफ’ हे एकमेकांचे कट्टर शत्रू.
२०१९ साली राष्ट्रपती ओमर अल-बशीर यांनी, महिला आणि दारू संदर्भातील कडक नियम शिथिल केले होते. देशातल्या धर्मांध इस्लामिक शक्तींना, सुदानमध्ये कट्टर इस्लामिक राज्य आणायचे होते. या शक्तींनी ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’च्या माध्यमातून, जनतेमध्ये असंतोष निर्माण केला. अन्नधान्य आणि औषधांच्या किमती वाढल्या. जर बशीर यांना सत्तेतून हटवले, तर स्वस्त अन्नधान्य आणि औषधे मिळतील, या आशेने सुदानची जनता रस्त्यावर उतरली. त्यामध्ये ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ संघटनेचा हात होता. बहुसंख्य लोक रस्त्यावर उतरले म्हणून, सुदानच्या सैन्याने ‘एसएएफ’ द्रोह केला आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’च्या सोबत आले आणि त्यांनी बशीरची सत्ता उलथावून टाकली. ‘एसएएफ’ला वाटले की, देशावर आता त्यांची सत्ता येणार. ‘एसएएफ’ने ‘आरएसएफ’ला सांगितले की, त्यांनी ‘एसएसएफ’मध्ये विलीन व्हावे आणि देशाच्या सत्तेत वाटेकरी व्हावे.
पण ‘आरएसएफ’चे म्हणणे होते की, ते ‘सुदान आर्म फोर्स’मध्ये इतक्यात विलीन न होता, दहा वर्षांनंतर विलीन होतील. यातूनच मग दोघांची वर्चस्वाची लढाई सुरू झाली, आणि दोघेही एकमेकांचे हाडवैरी झाले. त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत सुदान कायमचा अस्थिर झाला.या सगळ्या पार्श्वभूमीवर सुदानमध्ये पाय रोवावे, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देश प्रयत्नरत होते. कारण सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्याच्या खाणींवर अधिपत्य मिळावे यासाठीच. ‘आरएसएफ’च्या ताब्यात असलेल्या प्रदेशात अधिक सोन्याच्या खाणी असल्याने, ‘आरएसएफ’ला रशिया आणि युएई म्हणजे संयुक्त अरब अमिराती, आफ्रिकन रिपब्लिक माली लिबीया यांसारखे देश शस्त्र आणि इतर बाबतीत मदत करू लागले,.तर ‘सुदान आर्म फोर्स’ला सौदी अरेबिया, अमेरिका युरोप आणि इजिप्त मदत करू लागला.
सुदान देशाला हिंसेचा शाप आहेच. २०११ साली या देशातून दक्षिण सुदान देश वेगळा झाला. कारण दक्षिण सुदानमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आणि सुदानमध्ये मुस्लीम जास्त. आता सुदानमध्ये मुस्लीमच आहेत, तरीही सुदाम हिंसेने जळतोय, मरतोय! आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याच्या जबाबदारीची दखल घेतली गेली आहे. पण तरीही सुदानमधली हिंसा थांबण्याचे नाव घेत नाही. हे सगळे पाहून वाटते की, इस्लामचे कट्टर राज्य यावे? तसेच स्वस्त अन्नधान्य औषधांसाठी २०१९ साली रस्त्यावर उतरलेल्या सुदानी नागरिकांना काय त्यातून काय मिळाले? त्यांनी स्वतःच्या हातानेच स्वतःचा विद्ध्वंस केला. वस्तू स्वस्त मिळवण्याच्या नादात त्यांनी, मरण स्वस्तात कमावलं. जगभरातल्या देशांसाठी सुदानची परिस्थिती म्हणजे एक शिकवणच आहे!