मन वाचणारा माणूस...

31 Oct 2025 10:34:55
Dr. Rishikesh Behere
 
 
ताणतणाव आयुष्याचा एक भाग झाला असताना, मानवी मनाची सृजनता टिकवणार्‍या आणि मनोशांती संस्थेच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात आनंद आणणार्‍या डॉ. ऋषिकेश बेहेरे यांच्याविषयी...
 
मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे अनेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भागच. अनेकांच्या गंभीर समस्यांवर सहजतेने मार्ग काढण्याचे काम, मानसोपचारतज्ज्ञ लीलया करतात. पुण्यात डॉ. ऋषिकेश बेहेरे स्वतः तयार केलेल्या विविध थेरपीज्च्या माध्यमातून, अनेकांना समस्यांमधून बाहेर काढत आहेत. वडील केमिकल इंजिनिअर आणि आई शिक्षिका, अशा दाम्पत्याच्या घरात ऋषिकेश यांचा जन्म झाला. त्यांच्या घरातच शिक्षणाचे आणि समाजसेवेचे वातावरण होते. त्यामुळे आपसूकच घरात विविध सामाजिक विषयांवर चर्चा होत असे. बंगळुरु येथील नॅशनल पब्लिक स्कूलमधून त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. लहानपणापासून वाचनाचा छंद जड्ल्याने, शालेय जीवनात त्याचा फायदाच झाला. घरातील चर्चांमधून सामाजिक विषयांचे ज्ञानही ऋषिकेश यांनी होई. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल वाढत होते. हळूहळू विज्ञान विषयाची गोडी लागली. घरातच अभियंता असल्याने काहीही अडले, तरी लगेच उत्तर मिळत असे. त्यामुळेच विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे त्यांनी निश्चित केले.
 
बारावीनंतर म्हैसूरच्या प्रतिष्ठित जेएसएस वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मेरिट सीट मिळवली. महाविद्यालयीन काळात लवकरच ऋषिकेश यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व लक्षात आले. डॉ. बेहेरे यांच्या व्यावसायिक वाटचालीतील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे, मानसोपचार क्षेत्राशी त्यांचा संपर्क. सर विल्यम ओस्लर यांचे शब्द, फक्त सर्वांत कुशल डॉटरच मानसोपचारतज्ज्ञ बनू शकतात, हे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारेे ठरले. ‘एमबीबीएस’ पूर्ण केल्यानंतर, ऋषिकेश यांनी बंगळुरु येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सेस (निमहंस)मध्ये प्रवेश मिळवला. तिथे त्यांनी मानसोपचार विषयामध्ये ‘एमडी’ ही पदवी मिळवली. हा टप्पा परिवर्तनकारी आणि त्यांच्या लिनिकल दृष्टिकोनाला आकार देणरा ठरला. यामुळेच मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात संशोधनासाठीही त्यांना ऊर्जा लाभली.
 
‘एमडी’ केल्यानंतर, डॉ. बेहेरे मणिपाल येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. या काळात शिक्षक आणि संशोधक म्हणून त्यांनी कौशल्य सुधारण्यावर मेहनत घेतली. गुंतागुंतीच्या मानसिक आरोग्य परिस्थिती समजून घेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर संशोधन पुरस्कार आणि भारतीय मानसोपचार संस्थेचा ’तिलक वेंकोबा राव ओरेशन’ या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या स्किझोफ्रेनिया संशोधनाला आंतरराष्ट्रीय काँग्रेसकडूनही मान्यता मिळाली.
 
संशोधन आणि लिनिकल प्रॅटिसमधील दरी भरून काढण्यासाठी उत्सुक असलेले डॉ. बेहेरे यांनी, पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये डीबीटी वेलकम ट्रस्ट (युके)द्वारे निधी प्राप्त प्रतिष्ठित संशोधन फेलोशिप मिळवली. इथे डॉ. बेहेरे यांच्या मानसिक आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनाला एक वेगळाच आकार मिळाला. स्किझोफ्रेनिया असलेल्या आपल्या पाल्यांची आणि अंथरुणाला खिळलेल्या पत्नीची काळजी घेणार्‍या, वडिलांसमोरील कठीण आव्हाने त्यांनी पाहिली. या अनुभवाने भारतात व्यापक मानसिक आरोग्य समर्थन प्रणालींची तीव्र गरज त्यांना जाणवली.
 
ऑस्ट्रेलियात नोकरीची संधी मिळाल्यानंतरही, डॉ. बेहेरे यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि या महत्त्वाच्या समस्येच्या निर्मूलनासाठी पूर्णपणे स्वतःला समर्पितही केले. डॉ. बेहेरे यांनी जवळचे मित्र आणि सहकारी मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. नरेन राव आणि डॉ. गिरीश बाबू यांच्या सहकार्याने, मनोशांती केंद्रांची स्थापन केली. मनोशांती एका समग्र दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. यामध्ये नैतिक, सहानुभूतीपूर्ण आणि सक्षम मानसिक आरोग्यसेवेसह, सर्वांत प्रगत वैज्ञानिक उपचारांचाही समावेश आहे. सध्या, मनोशांतीची केंद्रे पुणे, बंगळुरु, हुबळी-धारवाड आणि म्हैसूरमध्ये सुरु आहेत. डॉ. बेहेरे यांच्या नेतृत्वाखाली, मनोशांती असंख्य व्यक्ती आणि कुटुंबांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास आली आहे. भावनिक कल्याणाचे पालनपोषण आणि प्रोत्साहन देणारे वातावरण मनोशांतीद्वारे तयार करण्यात येत आहे.
 
देशात आत्महत्या हा खूप गंभीर प्रश्न आहे. लोक नक्की इतके टोकाचे पाऊल का उचलतात? याचा अभ्यास त्यांनी केला. यावेळी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आपण या समस्येबाबत काही केले पाहिजे, हा निश्चयही डॉ. बेहेरे यांनी केला. यासाठी त्यांनी शाळा, व्यावसायिक आस्थापनांमध्ये जाऊन व्याख्याने द्यायला सुरुवात केली. "कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या उत्तर असू शकत नाही, यासाठी संवाद हेच उत्तम माध्यम आहे,” असे ते सर्वांना सांगतात. डॉ. बेहेरे ज्येष्ठ नागरिकांनादेखील मार्गदर्शन करतात. वयाच्या ठराविक टप्प्यानंतर, ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या निर्माण होतात. यासाठी ते घरातील नातेवाईक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मार्गदर्शन सत्र घेतात. ‘मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. ’संयम’ हा त्यांचा सर्वांत आवडीचा विषय आहे. विचार आणि कृती याचा वेग हे अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. आज ते हुबळी, धारवाड, पुणे, म्हैसूर या ठिकाणी काम करत आहेत. लोकांच्या मानसिक गुंतागुंतीवर सहज मार्ग काढणार्‍या डॉ. ऋषिकेश यांना, पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
- अतुल तांदळीकर
Powered By Sangraha 9.0