मुंबई : ( Triple Talaq ) मध्य प्रदेशातल्या भोपाल शहरातील अशोक कॉलनी परिसरात दानिश नावाच्या व्यक्तीने हातात बंदूक घेऊन पत्नीच्या नातलगांच्या घरी जाऊन तिला तोंडी तलाक दिल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी दानिशला अटक केली असून त्याची बंदूक जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, दानिश आणि त्याची पत्नी यांच्यात मागील काही महिन्यांपासून सतत वाद सुरु होते. दानिश त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आणि तलाक देण्यासाठी तिच्या नातलगांच्या घरी पोहोचला होता. हातात बंदूक पाहून घाबरलेली पत्नी खोलीत लपून बसली त्यामुळे संतापलेल्या दानिशने खोलीबाहेरूनच मोठ्याने तलाक, तलाक, तलाक असे उच्चारले आणि तेथून निघून गेला.
हेही वाचा : आत्मघाताच्या दिशेने बांगलादेश...
या घटनेनंतर पीडित पत्नीने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा दानिश सतत तिला धमक्या देत असे आणि घरगुती अत्याचार करीत असे. त्याने बंदुकीच्या धाकावर विवाहसंबंध संपवले, ज्यामुळे ती अत्यंत भयभीत झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दानिशला अटक केली आणि त्याच्याकडील परवानाधारक बंदूक जप्त केली.
पत्नीचे आई-वडील हयात नसल्यामुळे ती काही काळापासून आपल्या नातलगांच्या घरी राहत होती. तिने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा आक्रमक स्वभावाचा असून तो वारंवार तिला मानसिक आणि शारीरिक छळ करीत असे. सध्या भोपाल पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकारात धमकी, शस्त्राचा गैरवापर आणि महिलेला त्रास देणे या कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी दानिशला न्यायालयात हजर केले आहे.