उत्तम संस्कारांद्वारे जसे उत्क्रांत जीव उत्पन्न होतात, तद्वत् अनुत्क्रांत संस्कारांद्वारे अनुत्क्रांत जीवदशा उत्पन्न होईल. म्हणजे उत्क्रांती चालू आहे, तद्वत् अनुत्क्रांतीसुद्धा चालू असायलाच पाहिजे. वैदिक परंपरेने उत्क्रांतीसह अनुत्क्रांतीसुद्धा मानली आहे. उत्क्रांतीद्वारे जसे क्रमागतरित्या अमीबापासून बेडूक, माकड, मानव उत्पन्न होतो, तद्वत् उच्च जीवदशेच्या अनुत्क्रांत वागण्यामुळे, क्रमागतरित्या मानवापासून माकड, बेडूक, अमीबापर्यंत अपक्रांत योनीची वाटचाल होत असावी; अन्यथा आपल्याला आज अमीबासारखा अति प्राचीन जीव दिसलाच नसता.
प्रचंड काळाच्या ओघात त्यावेळचे सर्व अमीबा मानव वंशापर्यंत स्वतःची उत्क्रांत दशा टप्प्याटप्प्याने गाठत असता, आज अस्तित्वात असलेल्या अमीबांना काळाच्या प्रचंड विस्तीर्ण ओघात एकदासुद्धा उत्क्रांतीची संधी मिळू नये काय? तसे घडणे तर असंभवच वाटते. म्हणजे अनुत्क्रांत संस्कारांमुळे मानव वा तद्सदृश योनी अनुत्क्रांत जीवदशेला उतरत असल्या पाहिजे, हे ओघाने आलेच. म्हणून मानव योनींची संख्या जशी उत्क्रांत जीवांचे पदार्पण मानव योनीत सतत होण्याने वाढत आहे, तद्वत् मानवापासून सर्व अनुत्क्रांत जीवदशेच्या अनुत्क्रांत वागण्यामुळे असंख्य जीव अनुत्क्रांत मार्गाने परत कनिष्ठ योनीत जन्म घेऊन अमीबा योनीत प्रवेश करीत असले पाहिजे, हे उघड आहे. म्हणूनच इतया विशाल उत्क्रांत काळानंतरसुद्धा, आजही अनुत्क्रांत दशेतील अगणित अमीबा दिसतात.
उत्क्रांतीसह अनुत्क्रांतीसुद्धा हातात हात घालून चालू असते. म्हणूनच वैदिक परंपरेत असे मानले आहे की, वाईट कर्मे केल्यास मानवालासुद्धा उलट मार्गाने माकड, बेडूक, मासा व अमीबा व्हावे लागेल. म्हणूनच वैदिक परंपरेत उत्तम संस्कार आणि सत्कर्म यावर विशेष भर दिला आहे. ही कल्पना केवळ वैदिक परंपरेतच मानली आहे. वैदिक परंपरेत आचाराचे एक स्वतंत्र शास्त्रच आहे. प्रत्येकाच्या पिंडधर्मानुसार प्रत्येकाचा साधनाआचार विभिन्न असायला हवा. उत्क्रांती करण्याकरिता स्वतःच्या पिंडधर्मानुसार आचरण वा साधना केल्यास, प्रत्येक जीव अधिक उन्नत उत्क्रांत दशेला जाऊन नराचा नारायण होऊ शकतो, हे तत्त्वज्ञान केवळ वैदिक परंपरेनेच जगाला दिले. विभिन्न पिंडधर्मानुसार विभिन्न धर्मसाधना राहू शकतात; एकच धर्मसाधना सर्वांना लाभदायक असेल असे नाही. वैदिक परंपरा सोडल्यास, इतर परंपरांनी हे विशाल धर्मतत्त्व मानले नाही. त्यांच्या परंपरेत सर्वांना एकच आचारधर्म सांगितला आहे. त्यामुळे अन्य पंथांतील साधकांमध्ये हवी तशी उन्नती होताना दिसत नाही.
‘पिंडे पिंडे मतिर्भिन्ना’ हे शास्त्रीय रहस्य इतर पंथीयांच्या लक्षात येत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची संकुचित वृत्ती. इतर धर्मपंथांचेपाहून आपल्याही वैदिक परंपरेतील काही साधक वैदिक परंपरेत इतरांप्रमाणे एकच साधनाप्रकार वा प्रार्थनाप्रकार असावा, असे मानतात. पण हे त्यांचे मानणे प्रकृतिधर्माला सोडून आहे. वैयक्तिक धर्माची बूज राखायला हवी, त्यामुळे जीवांची उन्नती उत्क्रांती सहज शय होईल. धर्म म्हटला की, आमच्यासमोर केवळ हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी धर्म सांंप्रदायच उभे राहतात; पण धर्म म्हणजे सांप्रदाय नव्हे, तर धर्म म्हणजे प्रत्येक जीवांची वैयक्तिक धारणा होय. धर्म म्हणजे आपल्या पिंडधारणेनुसार वागणे. धर्माचे खर्या अर्थाने व्यापक व शास्त्रीय स्वरुप केवळ वैदिक परंपरेनेच जाणले, म्हणूनच वैदिक आचार परंपरेत विपुलता आढळून येते. इतर परंपरा अशास्त्रीय आहेत. आजचे युग विज्ञानयुग आहे, म्हणून या विज्ञानयुगातील समंजस व्यक्तींनी धर्म आचाराचे विज्ञान जाणून स्वतःचे जीवन उन्नत व उत्क्रांत बनविण्याकरता, वैदिक परंपरेची कास धरल्याविना गत्यंतर नाही. म्हणून भगवान मनु म्हणतात,
एतदृश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः|
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः॥
पृथ्वीवरील पृथ्वींतील सर्व मानवांना आपले जीवनचरित्र उन्नत उत्क्रांत बनविण्याकरिता, या देशात प्रसूत झालेल्या उच्च शास्त्रीय संस्कारधर्माची आणि शिक्षणप्रणालीची कास धरल्याविना गत्यंतर नाही.
जीव आणि जन्म : मृत्यू शरीराला आहे, जीवात्म्याला नाही. त्यामुळे मागील उत्क्रांत वा अनुत्क्रांत संस्कारांनी तसली दशा प्राप्त होण्याची प्रक्रिया जीवात्म्यालाच लागू पडते. जडशरीर मृत्यूनंतर भस्मीभूत होते, त्यामुळे मागील संस्कारांची बूज ठेवून तद्नुसार पुढील जीवन उत्क्रांत वा अनुत्क्रांत करण्यास, तेच जडशरीर शिल्लक कोठे राहते? ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’ चार्वाक म्हणतोच. इहजन्मांतील सर्व संस्कार वहन करणारे जीव नामक अस्तित्व मानल्याखेरीज, ते सर्व संस्कार मरणोत्तर वहन करून अन्य योनीग्रहण करणे असंभव आहे. मरणोत्तर जीवदशेला ‘प्रेत’ असे म्हणतात हे आपण पाहिलेच आहे. नियत गतीला प्राप्त होणारे ते प्रेत. या प्रेतावस्थेत जीवात्मा एका क्षणापासून तो युगापर्यंत राहू शकतो आणि कर्मभोग संचारल्यावर तो पुनः जन्म घेऊ शकतो. म्हणून भगवद्गीता जन्माचे महत् शास्त्र सांगते.
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः|
मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति॥७,अ.१५॥
देहात राहणारा जीवात्मा माझाच सनातन म्हणजे नित्य नूतन अंश आहे आणि तो इहलोकातील मायेत जन्म घेताना, मन आणि पंचज्ञानेंद्रियांसह मातेच्या गर्भात कर्षिला जातो. जन्माचे हे शास्त्रीय रहस्य आहे. म्हणजे आपण जन्म घेत नसून, आपण सृष्टीनियमांना धरून नकळत मातृगर्भात कर्षिले जातो आणि नकळत आपला जन्म होतो. अशा प्रकारे जन्म मृत्यूचे रहाटगाडगे सतत चालू असते.
मृत्यूचे भय : पुनर्जन्म मानण्याचे आणखी एक शास्त्रीय कारण आहे. मुंगीपासून मानवापर्यंत प्रत्येक जीवाला मृत्यूचे भय असते. मृत्यूचे भय का वाटावे? केवळ जड शरीराद्वारेच मृत्यूचे भय राहणे असंभव आहे. भयाची भावना जन्मदात्या आईबापाच्या गुणसूत्रांद्वारे अपत्यात अवतरित व्हावी असे म्हणावे, तर मातापिता मरण्यापूर्वीच अपत्याचा जन्म होतो. म्हणजे मातापित्याद्वारे मृत्यूचे भय संततीत अवतरणे अशय आहे. मृत्यूचे भय मागील जन्मातूनच वहन व्हायला हवे. पण ती भयाची भावना जडशरीराद्वारे अवतरित व्हावी म्हणावे, तर मृत्यूनंतर जडदेह नष्ट होतो, मग मागील जन्मांतील मृत्यूच्या भयाची भावना इहजन्मात कशी अवतरित झाली? म्हणजे, मागील जन्मातील मृत्यूभयाचे संस्कार वहन करण्याकरिता, जडदेहात राहून सर्व संस्कार ग्रहण करणारे एखादे स्वतंत्र अस्तित्व मरणोत्तर अवस्थेतही असते, असे मानल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून जडशरीरात राहून गत जन्माचे सर्व संस्कार पुढील जन्मात वहन करणारा जीवात्माच पुनर्जन्म घेत असला पाहिजे, हे उघड आहे. जन्म जीवाचा आहे, जडशरीराचा नाही. तद्वत्च उत्क्रांति जीवाचीच आहे, केवळ जडशरीराची नाही या सत्याप्रत आपण येतो.
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)