शिव शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभावितुं|
न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितूमपि॥
अतःस्त्वमआराध्याम हरिहरविरीन्च्यादिभिरपी|
प्रणन्तुम स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ॥१॥
शब्दार्थ : शिव हा ज्यावेळी शक्तीने युक्त असतो, त्यावेळी तो देवांचा देव महादेव असतो. परंतु शक्तीशिवाय शिव हा इतका निष्क्रिय असतो की, तो स्पंदन करण्यास सुद्धा पात्र नसतो. जी शक्ती इतकी शक्तिशाली आहे, प्रभावी आहे की, तिची आराधना हरी अर्थात विष्णू, हर अर्थात शिव आणि विरिंची अर्थात ब्रह्मदेवही करतात. माझ्यासारखा यःकश्चित व्यक्ती जर तिला प्रणाम करण्यास, तिचे स्तोत्र रचण्यास किंवा तिचे गुणगान करण्यास प्रेरित होत असेल, तर त्याला केवळ माझी पूर्वजन्मातील पुण्याई, पूर्वसुकृताचा प्रभाव आणि तिची माझ्यावरील मातेसमान करुणामयी दृष्टी हेच कारण आहे.
भावार्थ : ‘वश्’ या धातूपासून ‘शिव’ हा शब्द निष्पन्न झालेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या इच्छाशक्तीचा तो आश्रय असल्यामुळे, त्याला ‘शिव’ असे म्हणतात. ‘वष्टि इति शिवः’ अशी शिव या शब्दाची व्युत्पत्ती आहे. ‘वश्’ धातूचा अर्थ ‘प्रकाशणे’ असा घेतल्यास, वशति म्हणजेच प्रकाशतो तो शिव. अर्थात, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असलेला परमात्मा असा त्याचा अर्थ होतो. तो स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे इतकेच नसून, तो आपल्या प्रकाशाने संपूर्ण विश्वालासुद्धा प्रकाशित करतो. म्हणूनच त्याला शिव असे म्हटले आहे.
‘वश्’ या धातूपासून शिव हा शब्द कसा निर्माण होतो, तर त्याला संस्कृतमध्ये ‘वर्णविपर्यय’ असे म्हणतात. याला ‘विपरीत वर्णरचना’ असे म्हणतात. ‘हिंस्’ म्हणजे मारणे, ठार मारणे या धातूपासून ‘सिंह’ हा शब्द बनला. दृश्-पश्य अर्थात पाहणे यापासून शब्द बनायचा असेल, तर तो ‘पश्यक’ असा शब्द असायला हवा. परंतु, व्यवहारात ‘पश्यक’ऐवजी ‘कश्यप’ हाच शब्द रूढ आहे. याच न्यायाने ‘वश्’ धातूपासून वर्णविपर्ययाने ‘शिव’ शब्द निष्पन्न होऊन, व्यवहारात रूढ झाला .
‘शि’ या धातूचा अर्थ निद्रा घेणे आणि वा या धातूचा अर्थ फेकणे, दूर टाकणे. या दोन धातूंपासून निष्पन्न झालेल्या शब्द ‘शिव’चा अर्थ, ज्याने अज्ञानरूपी निद्रेला दूर फेकून दिले आहे, जो सदासर्वकाळ जागृत असणारा परमात्मा आहे, असा होतो. हा परमात्माच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या रूपाने नटतो आणि अखिल विश्वात उत्पत्ती, स्थिती आणि संहार घडवतो. परमात्मा ज्यावेळी शक्तीने युक्त असतो, तेव्हाच तो हे कार्य करण्यास समर्थ होतो.
‘शिव’ या शब्दाचा विग्रह केला तर श + ई + व असा होतो. जर यातील ईकार काढून टाकला, तर ‘शव’ हा शब्द उरतो. हा ‘ई’कार श्रीललितात्रिपुरसुंदरीचा बीजमंत्र आहे. शिव याला निर्गुण ब्रह्म मानले जाते. ज्यावेळी निर्गुणब्रह्म एकटे असते, ते अनिवर्चनीय असते. निर्गुण, निराकार, पूर्ण ज्ञानघन. या निर्गुण ब्रह्मात विकल्प निर्माण होतो, ‘एकोहं बहुस्यामि’ या इच्छेमुळे त्यात चेतना निर्माण होते. ती चेतना म्हणजेच श्रीललितात्रिपुरसुंदरी अर्थात सगुणब्रह्म आहे. या सगुण-निर्गुण ब्रह्माच्या मिलनातून महास्फोट आणि त्यातून विश्वउत्पत्ती झाली, असे आपले सनातन मत मानते.
ही चेतना प्रत्येक भौतिक वस्तूला अणूच्या पातळीवर व्यापून असते. त्यांचे सतत विघटन होण्याची प्रक्रिया चालूच असते. या प्रक्रियेतून निर्माण होणार्या ऊर्जेलासुद्धा आपण ‘स्पंदन’ असेच नाव देतो. मानवी शरीरातसुद्धा हृदयाची धडधड ही स्पंदने म्हणूनच ओळखली जातात. मानव जिवंत असल्याची खुण म्हणजे, त्याच्या हृदयाची स्पंदने आहेत. स्पंदन ही चेतनेने व्याप्त असल्याची पहिली खुण आहे. स्पंदनहीन शिव हा शवस्वरूप आहे. तो जर स्पंदनास अपात्र असेल, तर विश्वाचा सर्व कारभार पाहण्याससुद्धा अक्षम होईल. अर्थात, शिवाच्या अस्तित्वास कारक असणारी चेतना म्हणजे शक्ती, हे श्रीललितात्रिपुरसुंदरीचे रूप आहे.
भक्तांची सगळी दुःखे हरण करतो, म्हणून श्रीविष्णुला ‘हरी’ म्हटले जाते. प्रलयकाळी सर्व सृष्टीचा संहार करण्याचे कार्य असल्याने, महादेवाला ‘हर’ म्हटले जाते. ‘विशेषेण रिंच्यति इति विरिंचीः’ विशेषेकरून भौतिक सृष्टी निर्माण करतो, म्हणून ब्रह्मदेवाला विरिंची असे म्हणतात. या सगळ्या देवांच्या कार्याला कार्यरत करणारी प्रेरणा अर्थात शक्ती, ही चैतन्यरूप श्रीललितात्रिपुरसुंदरी आहे. म्हणूनच सर्व देवगण तिची आराधना करतात. ते करत असलेले अंगीकृत कार्य ही जणू तिचीच उपासना आहे, या भावनेतून करतात.
या श्लोकात आदि शंकराचार्य म्हणतात की, हरी, हर आणि विरिंची हे केवळ तुझ्या कृपेने कार्यप्रवण होऊन, ईश्वरत्वाला प्राप्त झालेले आहेत. त्या तुझी स्तुती करण्यास, तुला प्रणाम करण्यास किंवा तुझ्या गुणाचे रूपाचे गुणगान करण्यास जर मी प्रेरित होत असेन, तर ते केवळ माझ्या पूर्वकर्मांचे मिळणारे फळ नसून, तुझी कृपादृष्टी आसल्यानेच मी तुझ्या उपासनेच्या मार्गावर येणास उद्युक्त झालो. तू मला तुझ्या उपासना मार्गावर आणलेस, ही तुझीच लीला आहे आणि त्यामुळे मी धन्य झालो आहे.
या श्लोकातील शिव, शक्ती इत्यादी सर्व शब्द हे अभिप्रायगर्भित असल्याने, साहित्यशास्त्राच्या दृष्टीने हा परिकरालंकार होतो. श्लोकाच्या पूर्वार्धातील विषय हा उत्तरार्धातील विषयाला कारणीभूत होत असल्याने, हा ‘काव्यलिंग’ अलंकार आहे. याशिवाय या श्लोकात ‘श्लेष’ आणि ‘समासोक्ती’ हे दोन अलंकार आहेत.
शक्तीचे तीन भेद आहेत इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. या तीन भेदांनी युक्त शक्तीचा उल्लेख त्रिधा असा करतात. या शक्तीशिवाय शिवसुद्धा अकार्यक्षम असतो. शिवः हा शब्द ‘हं’वाच्य आहे आणि शक्ती हा शब्द ‘स’वाच्य आहे. याचा अर्थ या श्लोकातून हंस मंत्र सिद्ध होतो, ज्याउलट शब्द ‘सोऽहं’ असा तयार होतो. ‘सोऽहं’मध्ये ‘स’ आणि ‘ह’ या दोन्ही अक्षरांना हटवले, तर ॐ शिल्लक राहाते. ॐ हे निर्गुण अक्षर ब्रह्मवाचक आहे आणि ‘सोऽहं’ हे ब्रह्मात्मैय पद आहे.
‘ह’ आणि ‘स’ दोन्ही ‘हादि’ विद्येचे पहिले दोन अक्षर आहेत. आचार्य या पहिल्या श्लोकातमध्ये, श्रीविद्येच्या दिशेने संकेत करत आहेत आणि म्हणून हा पहिला श्लोक मंगलचरणार्थ लिहिला गेला आहे. ‘ह’ आणि ‘स’ यांच्या योगाने, ‘सौः’ हा बीजमंत्रसुद्धा तयार होतो. याला ‘प्रेतबीज’ म्हटले जाते. या बीजात शिवशक्तीला प्रलयकालीन महासुप्ति अवस्थेत दाखवले गेले आहे. प्रेत अर्थात ‘प्र + इत’ याचा अर्थ आहे, प्रकर्ष स्वरूपात लोप पावलेला, लय पावलेला.
प्रत्येक श्वासातून ‘हंस’ अथवा ‘सोऽहं’ हा जप होतच असतो.
हंकारेण बहिर्याति सकारेण विशेत्पुनः|
हंसहंसेत्यमुमंत्रं जीवों जपति सर्वदा॥
याला ‘अजपा जप’ किंवा ‘अजपा गायत्री’ असे म्हटले जाते. हा जप जरी स्वतः होत असला, तरी यावर हेतुसहित ध्यान ठेवल्यानेच, जपाचे फळ प्राप्त होऊ शकते.
उच्छवास घेताना ‘सः’ आणि श्वास घेताना ‘हं’ या बीजाला शब्दरूप स्वतःच मिळत असते. जर या जोडीचा वियोग झाला अर्थात श्वासउछ्वासाची माला खंडित झाली, तर श्वासाची गती थांबून मृत्यू प्राप्त होऊ शकतो अथवा समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते.
अर्थात, शिवशक्ती रूपातील ही श्वासोश्वास रुपी माला अव्याहत कार्यरत असणे, हीसुद्धा त्या प्राणशक्तीची उपासनाच आहे. आपण अन्य कोणत्या मार्गाने नाही; परंतु आपल्या प्राणशक्तीची या अजपा जप मार्गाने तरी, डोळसपणे तिची नक्कीच आराधना करू शकतो.
आपण इथे ‘सौंदर्यलहरी’ या आदि शंकराचार्यकृत स्तोत्रावलीचा आस्वाद घेत आहोत. त्यात आपण थेट विश्वउत्पत्तीपर्यंत पोहोचलो. मग ब्रह्मांडी ते पिंडी न्यायाने विश्वाची निर्मिती कशी झाली, याचे चिंतन करत करत आपल्या शरीरातील शिवशक्ती ऐयापर्यंत पोहोचलो. तात्त्विक पातळीवरील विवेचनातच आपण श्वास आणि त्यातील शिवशक्ती रूप याचा विचार करू लागतो आणि थेट प्राणायाम आणि त्यातून निरोगी, सुदृढ शरीराचा सिद्धांतही गवसतो.
- सुजीत भोगले