मुंबई : ( Assam ) असामच्या बारक व्हॅली भागात काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीदरम्यान बांग्लादेशचे राष्ट्रगीत ‘अमर सोनार बंगला’ गायल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते बिधुभूषण दास यांनी करिमगंज जिल्ह्यातील सरिभूमी परिसरात आयोजित काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीत हे गीत सादर केले. या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर ग्रेटर बांग्लादेशचा अजेंडा राबवण्याचा आरोप केला.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटलं की, बांग्लादेशचे राष्ट्रगीत गायन हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर मतबँक वाढवण्यासाठीचा राजकीय प्रयोग होता. काँग्रेस देशविरोधी भावना जागृत करणाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देते. त्यांनी प्रशासनाकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ही घटना सांस्कृतिक आणि भाषिक दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या बारक व्हॅली भागात घडल्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. या भागात बंगाली भाषिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि याआधीही भाषा आणि ओळख या विषयांवरून वाद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एकदा असामी विरुद्ध बंगाली असा वाद पेटला आहे.
आसाम सरकारने या घटनेची नोंद घेत चौकशी सुरू केली असून, स्थानिक प्रशासनाकडून कार्यक्रमाचे व्हिडिओ पुराव्यासाठी मागवण्यात आले आहेत.