मुंबई (अक्षय मांडवकर): 'वाँडरिंग ग्लायडर' नावाचे लाखो चतुर सध्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टवर येऊन थांबले आहेत (dragonfly migration). भारताच्या पुर्वोत्तर भागातून किनारपट्टी भागात दाखल झालेले हे इवलेसे चतुर अरबी समुद्रामार्गे आफ्रिकेच्या दिशेने आगेकूच करणार आहेत (dragonfly migration). मात्र, त्यांचा या स्थलांतरामध्ये सध्या अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आडवा आला आहे (dragonfly migration). कमी दाबाच्या पट्ट्याची ही स्थिती काही दिवस जैसे थे राहणार असल्याने चतुरांचे 'ग्रेट इन्सेक्ट मायग्रेशन' रेंगाळणार आहे. (dragonfly migration)
सध्या लाखो चतुर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात दाखल असून या चतुरांचे थवे किनारी भागांमध्ये आकाशात भिरभिरताना दिसत आहेत. 'वाँडरिंग ग्लायडर' नावाच्या या चतुरांना भटके चतुर म्हटले जाते. हे कीटक दरवर्षी चीनच्या दक्षिणेकडील भागापासून आपला प्रवास सुरू करतात आणि मध्य भारत असे मजल दरमजल करत भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत येतात. चतुरांच्या या स्थलांतराचा काळाला संशोधक ‘ग्रेट मायग्रेशन’ संबोधतात. या स्थलांतराच्या काळात चतुर एका ठिकाणी साधारणतः आठवडाभर वास्तव्य करतात. मात्र, आता किनारी भागांमध्ये या वास्तव्याचा कालावधी वाढणार आहे. कारण, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे स्थलांतर रेंगाळले आहे. दरवर्षी हे चतुर सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये येणाऱ्या ईशान्य मान्सून वाऱ्यावर स्वार होत अरबी समुद्रामार्गे आफ्रिकेचा पूर्व किनारा गाठतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे म्हणजेच डिप्रेशनमुळे चतुरांच्या स्थलांतरावर परिणाम झाला आहे.
अरबी समुद्रात सध्या सक्रिय असलेल्या डिप्रेशनचा उंचावरील भाग हा कमी दाब आणि जास्त दाबाच्या पट्ट्यांच्या दरम्यानच्या क्षेत्रामध्ये अडकला आहे. या क्षेत्राला 'काॅल रिजन' म्हणतात. या तटस्थ क्षेत्रामध्ये वाऱ्यांचा प्रवाह क्षीण असतो. त्यामुळे हे क्षेत्र जमिनीकडे न सरकता मध्य पूर्व अरबी समुद्रावरच रेंगाळले आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'वाँडरिंग ग्लायडर' चतुरांचे स्थलांतर देखील रखडण्याची शक्यता आहे. या चतुरांची लांबी दोन इंच असून त्यांच्या पंखाचा विस्तार चार इंचापर्यंत आहे. यामधील नराचा रंग हा पिवळा आणि त्यावर कुंकू लावल्यासारखा लालसर रंगाचा आहे, तर मादीच्या पिवळ्या रंगाच्या शरीरावर काळ्या रंगाचा पट्टा आहे. वयोमानानुसार हे रंग बदलतात.
'वाँडरिंग ग्लायडर' चतुरांचे पूर्वोत्तर भारत ते पूर्व आफ्रिका आणि पुन्हा पुढच्या पावसाळ्यात नवीन पिढीचा परतीचा प्रवास हे चक्र गेली अनेक वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. मात्र, यंदा गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या पावसाचा चतुरांच्या स्थलांतरावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. सध्या किनारपट्टी भागात आलेले या चतुरांचे थवे ताटकळले असून ते संभ्रमावस्थेत असल्याचे निरीक्षण आम्ही केले आहे. -
डाॅ. दत्तप्रसाद सावंत, चतुर अभ्यासक