मशरत अली एकटा नाही!

    30-Oct-2025   
Total Views |

Rahul Gandhi
 
गरिबाच्या घरी जाऊन जेवणे, जिलेबीवाल्याकडे जाऊन जिलेबी बनवणे, ट्रकवाल्यासोबत ट्रकमध्ये बसणे, केशकर्तनालयात जाऊन नाभिकाशी बोलणे, हे सगळे राहुल गांधी निवडणुकीदरम्यान करतात. पण, त्यानंतर काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तेलंगणचा मशरत अली. राहुल गांधींनी त्यांच्या आवडत्या कौमच्या मियाभाईशी असे वागावे? पण, ही शिकवण आहे समस्त भारतीयांसाठी! भोळेपणाचा आव आणत सामान्य गरिबांशी कसे राजकारण खेळले जाते, हे सांगणारी ही घटना.
 
रिक्षाचालकांसाठी वेगळे कल्याणकारी बोर्ड काढणार; त्यामुळे प्रत्येक रिक्षाचालकांचे कल्याण होईल. अरे इतकेच नाही, तर प्रत्येक रिक्षाचालकाला महिन्याचे एक हजारसुद्धा वाटू. तेलंगणमध्ये मशरत अली या रिक्षाचालकांच्या रिक्षात सवारी करत असताना राहुल गांधी यांनी म्हटले. मशरत अलीपण खुश झाला. अल्लातालाने आपल्या मदतीसाठी त्या नेत्याला पाठवले की काय, असे त्याच्या मनात आलेही असेल. आता काय रिक्षाचालकांच्या कल्याणाचे बोर्ड बनेल. नेत्याने खुद्द आपल्या रिक्षात सवारी केली होती. त्यामुळे रिक्षाचालक कल्याण बोर्डमध्ये आपणच असू. तसेही नेता हा आपल्या कौमचा जास्त विचार करतो. त्याने ‘भगवा आतंक’, ‘हिंदू मंदिर में लडकी को छेडने जाते हैं’ असे म्हटलेलं आहे. त्यामुळे तो आपल्या कौमला आणि नक्की आपल्यालाच प्राधान्य देणार, असेही मशरतला वाटले असावे. या खुशीमध्ये तो राहुल गांधींची काँग्रेस पार्टी सत्तेत आलीच पाहिजे, यासाठी राबराब राबला असेल.
 
शेवटी नेत्याची काँग्रेस पार्टी तेलंगणमध्ये निवडूनही आली. आता कल्याणकारी बोर्ड बनेलच, अशी मशरतला खात्री झाली. त्याच्याकडे अर्थार्जनासाठी दोन रिक्षा होत्या. पण, कल्याण बोर्ड बनल्यावर आणि त्यावर आपण साहेब झाल्यावर ‘कौन चलाएगा उन्हे?’ असे मशरतला वाटले असावे. एक वर्ष झाले, दोन वर्षे झाली. पण, तेलंगणमध्ये रिक्षाचालक कल्याणकारी बोर्ड काही बनले नाही. त्यातच मशरतची परिस्थिती अशी झाली की, आता स्वतःच्या मालकीच्या रिक्षा जाऊन त्याला पोट भरण्यासाठी भाड्याची रिक्षा चालवण्याची वेळ आली. राहुल गांधी त्यावेळेपासून पुन्हा मशरतकडे फिरकलेही नाहीत. मशरतच्या मनातली आशाही आता मेली आहे. मशरत अलीचे स्वप्न तुटले. आता तो भाड्याची रिक्षा चालवून अर्थार्जन करत आहे. पण, राहुल गांधींकडून, काँग्रेसकडून भ्रमनिरास झालेला मशरत अली एकटा आहे का?
 
‘लव्ह जिहाद’ ते ‘लिव्ह इन’
 
शाहीद शेखबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार, असे अग्रिमेंट तिने तिच्या आईबाबांना मोबाईलवर संदेश स्वरूपात पाठवले. २१ वर्षांची मुलगी. शिकत असताना ती शाहीद शेखच्या संपर्कात आली होती. आता तिला शाहीदबरोबर ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे. थोडक्यात, शाहीदकडून लैंगिक आणि मानसिक शोषण सगळे काही करून घ्यायचे आहे; मात्र त्याला नाव द्यायचे, ‘लिव्ह इन रिलेशनशिप!’ ‘विश्व हिंदू परिषदे’कडे याबाबतची तक्रार गेली असता, त्यांनी मुलीला परत आणले; मात्र पुन्हा ती पळून गेली. हे सगळे काय आहे?
 
आपण म्हणतो, ते मुलीशी ‘लव्ह जिहाद’ करतात, त्यांचे धर्मांतरण करतात, तर हे असे काही नाही. तुमच्या मुलीच आमच्यासोबत स्वखुशीने सारे काही करण्यास तयार आहेत, हे दाखवण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठीचा हा नवा प्रयोग आहे. हे सगळे सिद्ध करण्यासाठी त्या मुलीचा वापर केला असणार. ‘लव्ह जिहाद’चे असेही भयंकर स्वरूप आहे. राक्षसाने कालानुरूप त्याची कार्यपद्धती बदलावी, तसे हे ‘लव्ह जिहादी’ त्यांची विकृत कार्यपद्धती बदलत असतात. २१ वर्षांची मुलगी मोबाईल आणि समाजमाध्यमांमध्ये जरूर ती हुशार असेल, पण समाजजीवनाचा तिला काय अनुभव असेल? तिच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतला आहे, हे नक्की. या परिक्षेपात त्या शाहीदचे, त्याच्या घरातल्यांचे आणि कौमवाल्याचे म्हणणे काय असेल?
 
आजपर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या जितक्या घटना पाहिल्या, त्यामध्ये ‘लव्ह जिहाद’च्या गुन्हेगाराला त्याच्या कुटुंबीयाचे समर्थन असलेले दिसले. काही घटनांमध्ये तर मुलाने हिंदू मुलीला फसवून मोठा गौरवच केला, असे त्याच्या अम्मीअब्बूचे वागणे होते. षड्यंत्र रचून मुलीचे आणि तिच्या कुटुंबाचे जीवन नरक बनवणे, हे कोणते प्रेम आहे? दुसरीकडे आपण निधर्मी आहोत, आपण आधुनिक आहोत, असे मानण्यात धन्यता वाटणार्‍या हिंदूंचीही कमी नाही. आपल्या संस्कृतीची, धर्माची आणि जीवनाच्या मर्यादेची जाणीव ते अजिबात त्यांच्या अपत्यांना करून देत नाहीत. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात कुठलेच अंतर ते पालक स्वतःही ठेवत नाहीत. मग मुलांबाबत काय असेल? परिणाम? ‘लिव्ह इन रिलेशनशिप?’ ‘लव्ह जिहाद?’ याविरोधात जात-प्रांत भाषाभेद बाजूला सारून हिंदूंनी एकत्र यायलाच हवे.
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.