मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सांगली जिल्ह्याच्या पक्षीवैभवात एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे (Pacific Golden Plover from sangli). यंदा प्रथमच जिल्ह्यातून सोनेरी चिखल्या (Pacific Golden Plover) या दुर्मीळ हिवाळी स्थलांतरी पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (Pacific Golden Plover from sangli). या नोंदीमुळे कृष्णा नदीकाठचा परिसर स्थलांतरी पक्ष्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. (Pacific Golden Plover from sangli)
सांगलीतील आमणापूरच्या कोंडार परिसरात दरवर्षी हिवाळ्यात विविध स्थलांतरी पक्ष्यांचे आमगमन होते. कोंडार हा कृष्णा नदीकाठचा उथळ पाण्याचा भूभाग असून, तो परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी स्थानिक पक्षांमध्ये रंगीत करकोचे, खुल्या चोचीचे करकोचे, चमचे, ताम्रमुखी टिटवी, नदीसुरय, आयबीस, पारवे, होले, शेकाट्या, हळदी कुंकू बदक, पाणकावळे अशा अनेक पाणथळीच्या पक्ष्यांचा किलबिलाट सध्या या कोंडार परिसरात अनुभवण्यास मिळत आहे. आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदिप नाझरे यांनी यंदा सोनेरी चिखल्यासह, छोटा अर्ली, हिरवा तुतवार, कंठेरी चिखल्या, ठिपकेवाली तुतारी, ठिपकेदार तुतवार, पांढरा धोबी, पिवळा धोबी अशा अनेक परदेशी पाहुण्या पक्षांची नोंद घेतली आहे.
सांगली जिल्ह्यात प्रथमच नोंदवलेला सोनेरी चिखल्या (Pluvialis fulva) हा एक मध्यम आकाराचा, लांब पल्ल्याचा स्थलांतर करणारा पक्षी आहे. हा पक्षी त्याच्या पिसाऱ्यातील सोनेरी-पिवळसर ठिपक्यांमुळे ओळखला जातो. त्याचा मागील भाग गडद तपकिरी असून त्यावर सोन्यासारखे पिवळे ठिपके असतात. स्थलांतरादरम्यान आणि हिवाळ्यात हा पिसारा अधिक तपकिरी आणि सोनेरी दिसतो. हा पक्षी प्रामुख्याने आर्क्टिक टुंड्रामध्ये (उदा. सायबेरिया, अलास्का) प्रजनन करतो आणि हिवाळ्यात तो लांब पल्ल्याचा प्रवास करून दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या उष्ण प्रदेशांमध्ये स्थलांतर करतो. दलदलीच्या भागात, चिखलात आणि उथळ पाण्यात तो आपली चोच खुपसून छोटे कीटक, किडे, अळ्या आणि छोटी जलचरे शोधून खातो. या पक्ष्याची सांगली जिल्ह्यात झालेली नोंद अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे या कोंडार परिसराचे पक्षी- अधिवासाच्या संवर्धनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित होते.