आत्मघाताच्या दिशेने बांगलादेश...

    30-Oct-2025
Total Views |

Bangladesh
 
कधीकाळी विकसनशील राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहिलेले, आशियामधील बांगलादेश हे राष्ट्र आज कट्टरतावादाच्या दिशेने प्रवास करताना दिसते. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून सत्ता बळकवल्यानंतर, मोहम्मद युनूस या काळजीवाहू पंतप्रधानांच्या सत्ताकाळात बांगलादेशतील विकास ठप्प झाला असून, समाजातील अनेक गट एकमेकांसमोर उभे ठाकले. बांगलादेशातील कट्टरता वाढीस लागली असताना, त्यावर काही काम करण्याचे सोडून युनूस यांच्या सरकारने ही कट्टरता कशी वाढेल, याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. साधारणतः नऊ वर्षांपूर्वी बांगलादेशात ज्याला पाऊल ठेवण्यास मनाई करण्यात आली होती, अशा कट्टरतावादी आणि स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणार्‍या झाकीर नाईकसाठी युनूस सरकारने लाल गालिचा अंथरला आहे. युनूस यांच्या सरकारने झाकीर नाईकला बांगलादेशात प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय बांगलादेशच्या खालावलेल्या दशेचा निर्णायक संकेत आहे.
 
२०१६ मध्ये भडकावू भाषणावरून बांगलादेशात झाकीर नाईकवर तत्कालीन हसीना सरकारने बंदी घातली होती. नाईकच्या भाषणाने प्रभावित होऊन अनेक तरुण दहशतवादाच्या मार्गावर जात असल्याचे बांगलादेश सरकारच्या लक्षात आल्याने, त्याच्या ‘पीस टीव्ही’ वाहिनीवरही बंदी घालण्यात आली होती. नंतरच्या काळात झाकीर नाईकवर ढाका इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपदेखील ठेवण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये अनेक बांगलादेशींचे रक्त नाहक सांडले. मात्र, सत्तासुंदरीच्या मोहाला बळी पडलेल्या युनूस यांना बांगलादेशींच्या रक्ताची किंमत ती काय? ज्यांनी सत्तासुंदरीला वश करण्यासाठी बांगलादेशाच्या स्वातंत्र्य योद्ध्यांचाही अपमान करण्यास मागेपुढे पाहिले नाही, त्यांच्या दृष्टीने सामान्य बांगलादेशी जनता म्हणजे तृणवतच. झाकीर नाईकसारख्या लाखो बांगलादेशींच्या अपराध्यासाठी लाल गालिचा अंथरण्याची हिंमत, याच मानसिकतेतून युनूस यांना झाली असावी.
 
बांगलादेशचा झाकीर नाईकवर बंदी घालण्याचा निर्णय फक्त एक सरकारी निर्णय नव्हता. या निर्णयाच्या माध्यमातून, विकासाला प्राधान्य देण्याचा सुप्त संदेशच हसीना यांनी बांगलादेशी जनतेला दिला होता. त्यामुळे पुढील काळात बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे आपल्याला आढळते. त्यानंतर काही वर्षांतच बांगलादेश जगामध्ये एका उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून गणलाही जाऊ लागला. वर्ष २०१८, २०१९ या काळात बांगलादेशचा ‘जीडीपी’ विकासदर अनुक्रमे ७.३ टक्के आणि ७.९ टक्केदेखील राहिला आहे. पण, युनूस यांनी सत्ता बळकवल्यानंतर बांगलादेशचा हा विकासरथ अधोगतीकडेच वेगाने दौड करू लागलेला दिसतो. आज बांगलादेशात हिंदू-मुस्लीम, अहमदिया विरुद्ध इतर मुस्लीम असे वाद मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जाळपोळ, आंदोलने आणि हिंसाचार हा बांगलादेशातील जनतेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. अशाच काळात नाईकसारख्या भडकावू भाषणे देणार्‍याला देशात आणणे बांगलादेशातील परिस्थिती अधिकच संघर्षमय करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यताच अधिक!
 
झाकीर नाईक हा केवळ इस्लामी धर्मोपदेशक नाही, तो धर्माच्या नावाखाली समाजात तणाव, असहिष्णुता आणि विभाजनाची बीजे पेरणारा चेहरा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात धर्माचा वापर ‘सॉफ्टपॉवर’ म्हणून होतो; पण नाईकला परवानगी देणे हा सामाजिक तणाव वाढवण्याचाच प्रयोग सिद्ध होणार आहे. बांगलादेशातील युवकवर्गाने मागील दशकात प्रगती, शिक्षण आणि उदारमतवाद यांचा स्वीकार केला होता. आता पुन्हा धार्मिक कट्टरतेच्या तमामध्ये बांगलादेशचा वर्ग ओढला जात आहे. पण, याची तमा युनूस यांना नाहीच.
 
धर्मस्वातंत्र्य आणि धर्माधारित प्रचार यामध्ये सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. नाईकसारख्यांना मुक्त मंच देणे म्हणजे हा फरक मिटवण्यासारखे आहे. आणि त्याची किंमत बांगलादेशला येत्या काळात मोजावी लागेल, हे निश्चित! युनूस यांच्या या निर्णयाने त्यांची प्रतिमा आणि त्यांच्या प्रशासनाचा विचारविवेक दोन्हींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कट्टरतेला प्रोत्साहन देणे हा कोणत्याही राष्ट्राचा आत्मघातच ठरतो आणि युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशचे प्रत्येक पाऊल त्याच दिशेने पडत आहे.
 
- कौस्तुभ वीरकर