प्रबोधनाचे पर्व आणि मांगल्याचा सोहळा

    30-Oct-2025
Total Views |

Kartiki Ekadashi
 
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा चार मासांचा अवधी देशातील भक्तिपर्वाचा आणि नात्यांचा उत्सव कालावधी. या चार महिन्यांतच जवळपास सर्व सण आणि उत्सव, व्रतवैकल्ये साजरी केली जातात. त्यामुळे या चातुर्मासाचे धार्मिक अधिष्ठान मौलिक ठरते. या सगळ्याची समाप्ती तुळशीविवाहाने होते. दि. २ नोव्हेंबर रोजी योणारी कार्तिकी एकादशी आणि तुळशीविवाहारंभाच्या निमित्ताने या सणांमागील परंपरांचा घेतलेला आढावा...
 
दिवाळीच्या लखलखाटाने, फराळाच्या उत्साहाने आणि भेटीगाठींच्या आनंदाने आपले अवकाश भरून गेलेले असते. हा लौकिक आनंदाचा परमोच्च बिंदूच असतो. पण, भारतीय संस्कृतीची खरी ताकद ही आहे की, ती आपल्याला केवळ उत्सवी उत्साहात रेंगाळू देत नाही, तर प्रत्येक उत्सवानंतर एका सखोल चिंतनाकडे, एका नव्या प्रारंभाकडे घेऊन जाते. दिवाळी संपते आणि खर्‍या अर्थाने प्रबोधनाचे आणि मांगल्याचे पर्व सुरू होते. हे पर्व म्हणजे कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी एकादशी) आणि तिची मंगलमय परिपूर्ती करणारा तुळशी विवाह सोहळा. हे दोन सण म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरील फक्त तारखा नसून, ते एका विश्रांतीतून जागृतीकडे, जागृतीतून कर्तव्याकडे आणि कर्तव्यातून मांगल्याकडे होणार्‍या संपूर्ण मानवी आणि नैसर्गिक चक्राचे प्रतीक आहेत.
 
या संपूर्ण पर्वाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला, चातुर्मासाचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा चार महिन्यांचा काळ, पौराणिकदृष्ट्या विश्वाचे पालनकर्ते भगवान विष्णूंच्या योगनिद्रेचा काळ आहे. पण याचा व्यावहारिक आणि सामाजिक अर्थ अधिक खोल आहे. हा काळ पावसाळ्याचा, सृजनाचा, पण त्याचबरोबर अनेक गोष्टींवर बंधने घालणाराही आहे. याकाळात शेतीची कामे सुरू असतात. त्यामुळे प्रवास, मोठी शुभकार्ये यांवर निसर्गतःच मर्यादा येतात. हा काळ केवळ देवाच्याच विश्रांतीचा नसतो, तर तो सृष्टीला आणि मानवी समाजालाही एकप्रकारे आत्मचिंतनाची, ऊर्जासंचयाची संधी देतो.
 
या प्रदीर्घ विश्रांतीनंतर, कार्तिक महिन्याच्या शुल पक्षात येणारी प्रबोधिनी एकादशी ही केवळ एक तिथी नाही, तर ती एक जागृती आहे. प्रबोधन म्हणजे केवळ झोपेतून जागे होणे नव्हे; तर ते चैतन्याचे, सत्त्वगुणाचे आणि कर्तव्याचे पुनरुत्थान आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी, आषाढीप्रमाणेच भव्य कार्तिकी वारी भरते. हा दिवस लाखो वारकर्‍यांसाठी एका परमोच्च आनंदाचा, भक्तीच्या सामूहिक प्रबोधनाचा क्षण असतो. या जागृतीमागेही वचनाचे एक अढळ मूल्य दडलेले आहे.
 
भगवान विष्णू चातुर्मासात निद्रा का घेतात? यामागील बळीराजाची कथा अत्यंत सूचक आहे. भक्त प्रल्हादाचा नातू राजा बळी, हा दानशूर पण महत्त्वाकांक्षी. वामन अवतारात विष्णूंनी त्याच्याकडे तीन पावले भूमी मागितली. दोन पावलांत विश्व व्यापल्यानंतर, बळीने तिसरे पाऊल ठेवण्यासाठी आपले मस्तक पुढे केले. त्याच्या या त्यागाने आणि समर्पणाने विष्णू इतके प्रसन्न झाले की, त्यांनी बळीला पाताळलोकाचे राज्य बहाल केले. पण बळीच्या भक्तीची ओढ इतकी तीव्र होती की, त्याने विष्णूंनाच वरदान मागितले, "देवा, तुम्ही माझा द्वारपाल म्हणून कायम माझ्यासोबत राहा.”
 
भक्ताच्या या प्रेमळ हट्टात भगवान बांधले गेले. अखेर, माता लक्ष्मीने बळीला भाऊ मानून, हे बंध सोडवले. पण जाताना विष्णूंनी बळीला वचन दिले की, ते वर्षातील चार महिने त्याच्यासोबत राहतील. कार्तिकी एकादशीला हा वचनाचा काळ संपवून, भगवान विष्णू स्वगृही येतात आणि सृष्टीच्या पालनाचे कार्य पुन्हा आरंभतात. या कथेतील मर्म हेच आहे की, भक्तीच्या आणि वचनाच्या बंधनात ईश्वरही अडकतो. प्रबोधन हे नेहमी कर्तव्याशी आणि वचनपूर्तीशी जोडलेले असते, हाच या कथेचा कालातीत संदेश.
 
भगवंताची ही जागृती साजरी केल्याशिवाय, विश्वातील शुभ कार्यांना सुरुवात कशी होणार? म्हणूनच, या प्रबोधनानंतर पहिला आणि सर्वांत मंगल सोहळा साजरा होतो, तो म्हणजे तुळशी विवाह. भगवान विष्णूंच्या शाळीग्राम या पाषाण रूपाचा विवाह, लक्ष्मीचेच रूप मानल्या जाणार्‍या तुळशीसोबत लावला जातो. हा निव्वळ एक प्रतीकात्मक विवाह नाही, तर तो निसर्ग आणि परमात्मा यांच्यातील अतूट नात्याचाही उत्सव आहे. हा ईश्वराला देव्हार्‍यातून थेट अंगणातील वृंदावनात आणणारा सोहळा आहे. घरोघरी, ऊस आणि चिंच-आवळा यांचा मंडप उभारून, मंगलाष्टके म्हणून हा सोहळा पार पडतो. हा दिवसच खर्‍या अर्थाने समाजातील लगीनघाई सुरू झाल्याची द्वाही फिरवतो आणि थांबलेल्या शुभ कार्यांना गती देतो.
 
पण तुळशीलाच हे सर्वोच्च स्थान का? यामागेही एक तितकीच प्रभावी, त्यागाची आणि शापातून उदयाला आलेल्या वरदानाची कथा आहे. वृंदा नावाची तेजस्वी स्त्री, विष्णूंची परमभक्त आणि महान पतिव्रता. या वृंदेचा विवाह जालंधर नावाच्या बलाढ्य राक्षसाशी होतो. वृंदाच्या पातिव्रत्याचे कवच इतके अभेद्य होते की, त्याच्या जीवावर जालंधर अजेय झाला. पण जेव्हा कोणतीही शक्ती मग ती चारित्र्याची असो वा सत्तेची, तिचा उपयोग स्वार्थापतुळे विद्ध्वंसासाठी होऊ लागतो, तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतात. वृंदाचे पातिव्रत्य हेच अधर्माचे संरक्षक कवच बनले होते.
 
तेव्हा, जगाच्या कल्याणासाठी, भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेऊन, वृंदेचे पातिव्रत्य भंग केले. सत्य कळताच, संतप्त वृंदेने विष्णूंना दगड (शिळा) होण्याचा शाप दिला आणि स्वतः सती गेली. विष्णूंनी तो शाप शाळीग्राम रूपात आनंदाने स्वीकारला. पण, वृंदेच्या त्यागातून आणि भक्तीतून जी राख उरली, त्यातून एका रोपट्याचा जन्म झाला, तीच तुळस. विष्णूंनी त्या रोपट्याला वरदान दिले की, ’वृंदा, तुझ्या भक्तीचा आणि त्यागाचा मी आदर करतो. आजपासून तू तुळस म्हणून माझ्यापेक्षाही श्रेष्ठ असशील. तुझ्याशिवाय माझी कोणतीही पूजा पूर्ण होणार नाही.’ या कथेचा अन्वयार्थ साधा नाही. हे एका स्त्रीच्या त्यागाचे उदात्तीकरण आहे. वृंदेच्या त्यागातून तुळस जन्माला आली, जी आजही जगाला प्राणवायू, आरोग्य आणि पावित्र्य देते. त्याग हा कधीही व्यर्थ जात नाही, त्याचे रूपांतर एका मंगलमयी, जीवनदायी तत्त्वात होते. हाच या कथेचा गाभा आहे.
 
सारांश, कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाह हा सण म्हणजे एक सखोल जीवनदर्शन आहे. प्रबोधिनी एकादशी ही बाह्य निद्रेसोबतच, आपल्या अंतर्मनातील सदसद्विवेकबुद्धीला आणि कर्तव्याला जागे करते. ती आपल्याला बळीराजाप्रमाणे वचनबद्ध राहण्याची आणि वृंदेप्रमाणे त्यागातून मांगल्याची नवनिर्मिती करण्याची प्रेरणा देते. अंतिमतः, तुळशीचा हा मंगलमय सोहळा, त्या जागृत झालेल्या चेतनेला निसर्गाच्या शाश्वत पवित्रतेशी जोडून, मानवी जीवनाची खरी शुभ सुरुवात कशी असावी, याचा एक कालातीत आदर्श आपल्यासमोर ठेवतो. हा खरंच वैयक्तिक प्रबोधनापासून सुरू झालेला आणि संपूर्ण सृष्टीच्या कल्याणात विलीन होणारा, एक अनुपम सोहळा आहे.
 
- आसावरी पाटणकर 
(लेखिका संगीताचार्य असून, कला, शिक्षण, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सनातन धर्माच्या प्रसार-प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या ‘उद्गार’ संस्थेच्या संस्थापकही आहेत.)