१९२५ साली व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाचे आणि हिंदू संघटनाचे दूरदृष्टीपूर्ण उद्दिष्ट ठेवून, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ रोवली. आज १०० वर्षांनंतरही संघाची वाटचाल त्याच दिशेने सुरु असून, समरस आणि समर्थ भारतनिर्मितीसाठी तमाम स्वयंसेवक कटिबद्ध आहेत. या अविरत संघटनपर्वाचे चिंतन...
सन १९२५... देश इंग्रजांच्या जोखडात अडकलेला आणि नागपूरच्या भूमीवर एक व्यक्ती डॉ. केशव बळीराम हेडगेवार फक्त १७ कार्यकर्त्यांसह असा संकल्प करतात की, "मी भारताच्या स्वातंत्र्यासह हिंदू समाजाचे संघटन करीन.” हीच संघाच्या प्रारंभीची प्रतिज्ञा होती. ‘मी भारताला स्वतंत्र, समृद्ध आणि वैभवशाली राष्ट्र बनवण्यासाठी तन, मन आणि धन अर्पण करीन.’ त्या काळात हा विचार ना एखादा राजकीय नारा होता, ना कुठल्या आंदोलनाचा भाग, तर हे एक सांस्कृतिक पुनरुत्थानाचे बीज होते, जे डॉ. हेडगेवारांनी रोवले.
आज १०० वर्षांनंतर तेच बीज सेवा, संघटन, संस्कार आणि समाजपरिवर्तन या रूपाने एका विशाल वटवृक्षात परिवर्तित झाले आहे. डॉ. हेडगेवार यांनी केवळ समाजसंघटनाची गरज सांगितली नाही, तर ते संघटन कसे शय आहे, हेही प्रत्यक्ष दाखवून दिले. त्यांनी केवळ भाषण दिले नाही, तर एक सुयोजित संघटनात्मक पद्धत विकसित केली, ती म्हणजे ‘शाखा!’ ही शाखा केवळ शारीरिक व्यायामाची जागा नव्हती, तर ती राष्ट्रीय पुनरुत्थानाची प्रयोगशाळा होती, जिथे व्यक्तिमत्त्वात अनुशासन, देशभक्ती आणि सेवाभाव यांचा संस्कार घडवला गेला.
तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणायचे, "जिथे हिंदू, तिथे शाखा आणि जिथे शाखा, तिथे विजय.” ते म्हणायचे, "शाखा ही महिलांच्या सुरक्षेची आणि राष्ट्ररक्षणाच्या भावनेची सजीव अभिव्यक्ती आहे.” एका तासाची ही शाखा कालांतराने व्यक्तिनिर्माणातून समाजनिर्माणाची प्रयोगशाळा बनली. आज संघ आपल्या शताब्दी वर्षात असताना, डॉ. हेडगेवार यांचे स्वप्न विचारांपुरते मर्यादित न राहता, ते प्रत्यक्ष कृतीत उतरलेले दिसते.
संघाने आपल्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्पष्ट सांगितले आहे की, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी व्हायचे आहे, म्हणजे संघाचा विचार प्रत्येक गाव, प्रत्येक वस्ती, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे. या ध्येयासाठी आखलेली योजना तितकीच व्यवहार्य आहे. हरियाणात डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक घरोघरी (५० हजारांपेक्षा अधिक) संपर्क साधणे आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रत्येक मंडल (आठ-दहा गावांचा समूह) तसेच प्रत्येक वस्ती (आठ-दहा हजार लोकसंख्या)मध्ये हिंदू परिषद आयोजित करणे, ही केवळ आयोजनात्मक मोहीम नाही, तर समाजाला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आहे.
या योजनेचे परिणामही दिसू लागले आहेत. हरियाणातील विजयादशमी उत्सवानिमित्त
२५७ शहरी घटकांपैकी १ हजार, ४४३ पैकी १ हजार, ३९८ वस्त्यांमध्ये (९७ टक्के),
ग्रामीण भागात ८८२ पैकी ८६२ मंडलांमध्ये (९८ टक्के),
आणि ६ हजार, ७०१ पैकी ४ हजार, १६ गावांमध्ये (६० टक्के)
एकूण ८४ हजार, ५१९ स्वयंसेवक, २ हजार, ९२५ घोषवादक, ५७ हजार, ६५ स्वयंसेवक कुटुंबे (यात ९ हजार, ८८६ महिला)
आणि १ हजार, ६२ विशेष उपस्थित व्यक्तींनी मिळून १ हजार, १११ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.
हरियाणासारख्या प्रगत राज्यात, जिथे शेतकरी, सैनिक, खेळाडू आणि तरुण-तरुणी ऊर्जेचे प्रतीक आहेत, तिथे संघाचा हा विचार समाजात नवी चेतना जागवत आहे. विजयादशमीसारख्या पवित्र पर्वावर जेव्हा शाखा, संवाद, आणि परिषदांचे आयोजन होते, तेव्हा तो केवळ उत्सव नसतो, तर तो संघाच्या शताब्दी दिशेने आत्ममंथन आणि आत्मनिवेदनाचा क्षण असतो. भविष्याच्या योजनांचे पायाभूत कार्य असते. विजयादशमी हे सदैव ‘धर्माचा अधर्मावर विजय’ याचे प्रतीक राहिले आहे आणि आज ती विजयगाथा आहे संघटनाची, उदासीनतेवर जागृतीची आणि विघटनावर एकता-एकात्मता-समरसतेची!
डॉ. हेडगेवार यांचे दृष्टिकोन केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. ते म्हणायचे की, "देश बळकट होण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकात संघटनभावना जागृत असली पाहिजे.” त्यांनी कधीही पद किंवा सत्तेची आकांक्षा ठेवली नाही. त्यांचा एकच ध्यास होता, संगठित समाजातून सशक्त राष्ट्र उभे करणे.
पथ का अंतिम लक्ष्य नहीं हैं सिंहासन चढ़ते जाना|
सब समाज को लिए साथ में आगे हैं बढते जाना॥
हा विचार आजही तितकाच जिवंत आणि प्रासंगिक आहे, जितका १०० वर्षांपूर्वी होता. समाज तेव्हाच सशक्त होईल, जेव्हा त्यात एकता, समरसता, अनुशासन आणि आत्मविश्वास असेल. ‘शाखा’ या व्यवस्थेने हे गुण समाजाच्या आत खोलवर रुजवले आहेत. ती व्यवस्था व्यक्तीला ‘मी’पासून ‘आपण’कडे नेते. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या गावाच्या, वस्तीच्या, मोहल्ल्याच्या भल्यासाठी थोडा वेळ देईल, तेव्हाच खर्या अर्थाने राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया सशक्त होईल.
डॉ. हेडगेवार यांचे स्वप्न केवळ एक संघटना उभारण्याचे नव्हते, तर राष्ट्रीय चरित्रनिर्मितीची प्रक्रिया घडविण्याचे होते. आजचा युवक सेवा, संघटन आणि समर्पण या सूत्राला जीवनाचा आधार बनवत आहे आणि त्यामुळे हे स्पष्ट होते की, आगामी शतके भारताची असतील. असा भारत, जो आधुनिकतेसोबत आपल्या सांस्कृतिक मुळांशी घट्ट जोडलेला राहील. डॉ. हेडगेवार यांचे शब्द आज इतिहास नाही, तर वर्तमानातले जिवंत सत्य बनले आहे, संघटित समाज हाच सशक्त भारताचा पाया आहे.
- राजेश कुमार
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हरियाणा प्रांताचे प्रचार प्रमुख आहेत.)