भारताच्या पाठीशी रशिया पुन्हा भक्कमपणे उभा! दाखवून दिली ताकद! "...तर परिणाम भोगायला तयार रहा!" थेट व्हाईट हाऊसला दिला इशारा

    03-Oct-2025
Total Views |

Putin Narendra Modi
 
 
 
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष (Vladimir putin) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अमेरिकेने भारतावर रशियाबरोबरचा ऊर्जा व्यापार कमी करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे दुष्परिणाम स्वतः वॉशिंग्टनलाच भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
 
काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील सोची येथे झालेल्या वल्दाई आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये १४० देशांतील तज्ज्ञांसमोर पुतिन बोलत होते. त्यांनी म्हटले की, जर रशियाच्या व्यापार भागीदारांवर जास्त दराचे शुल्क लावले गेले, तर जागतिक ऊर्जा किमती वाढतील आणि त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हला व्याजदर उच्च ठेवावे लागतील. याचा थेट फटका अमेरिकन अर्थव्यवस्थेलाच बसेल.पुतिन यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला भारत दौर्‍याचे संकेत दिले.
 
भारताकडून कच्च्या तेलाच्या मोठ्या आयातीमुळे निर्माण झालेल्या व्यापार तुटीचे संतुलन साधण्यासाठी रशियन सरकारला उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. “भारताशी आमचे कधीही तणावपूर्ण संबंध राहिले नाहीत. भारत कधीही परकीय दबावाखाली झुकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत,” असे पुतिन म्हणाले.भारताने रशियाकडून ऊर्जा खरेदी थांबवली तर त्याचे ९ ते १० अब्ज डॉलर्सपर्यंतचे नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला.
 
“भारतासारख्या देशातील जनता आपल्या राजकीय नेतृत्वाच्या निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवते आणि अपमान सहन करणार नाही,” असे ते म्हणाले. पुतिन यांनी मोदींना ‘मित्र’ संबोधत त्यांच्या परस्पर विश्वासपूर्ण नात्याचा उल्लेख केला. “मी मोदींना चांगले ओळखतो. ते स्वतः कधीच असे पाऊल उचलणार नाहीत. आर्थिक दृष्टिकोनातून हे पूर्णपणे निरर्थक ठरेल,” असे ते म्हणाले.
 
रशियाने भारताकडून अधिक कृषी उत्पादन व औषधे खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. “आम्ही भारतातून अधिक कृषी उत्पादन खरेदी करू शकतो. औषधनिर्मिती व फार्मास्युटिकल क्षेत्रात काही पावले उचलू शकतो,” असे पुतिन म्हणाले. अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेवरही त्यांनी टीका केली. “अमेरिका भारतासारख्या देशांवर दबाव आणते, पण स्वतः रशियावर अवलंबून आहे. आम्ही अमेरिकेला युरेनियमचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पुरवठादार आहोत,” असे पुतिन यांनी नमूद केले.