मुंबई : (Mumbai Metro 3 line) 'मुंबई मेट्रो ३’ मार्गिकेवर धावणाऱ्या गाडीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड आल्याने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही गाडी सांताक्रुझ मेट्रो स्थानकावर आणून प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले आणि दुसऱ्या गाडीतून पुढे नेले. यादरम्यान मेट्रो ३ मार्गिकेवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली.
एमएमआरसीच्या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील 'आरे-आचार्य अत्रे चौक' (वरळी) मेट्रो मार्गिका सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. या मेट्रो मार्गिकेवरून आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या दिशेने जाणारी गाडी शुक्रवार,दि.३ रोजी दुपारी २.४४ वाजता अचानक सांताक्रुझ मेट्रो स्थानकावर थांबवून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या गाडीत तांत्रिक बिघाड झाला. यावेळी गाडीतून अचानक ठिणग्या उडू लागल्या, त्यानंतर धूर झाला आणि जळल्याचा वास येऊ लागला. या प्रकारामुळे प्रवासी काही काळ घाबरले. सर्व प्रवाशांना सांताक्रुझ मेट्रो स्थानकात गाडी थांबवून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गाडी तांत्रिक तपासणीसाठी बीकेसी लूपलाईनवर नेण्यात आली. तर प्रवाशांना दुसऱ्या गाडीने पुढे नेण्यात आले. यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
संबंधित गाडीची सेवा रद्द : एमएमआरसीएल
एमएमआरसीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, शुक्रवारी दुपारी २:४४ वाजता, आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या दिशेने जात असलेल्या ट्रेनमध्ये सांताक्रुझ स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून गाडीतील प्रवाशांना सांताक्रूझ स्थानकावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. ही गाडी सध्या सविस्तर तांत्रिक तपासणीसाठी बीकेसी लूपलाइनवर नेण्यात आली आहे. संबंधित गाडीची सेवा रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. प्रवाशांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रोटोकॉल तात्काळ पाळण्यात आले आहेत.