मुंबई : (MHADA) म्हाडा मुंबई मंडळामार्फत विनियम ३३ (५) अंतर्गत अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाच्या वितरणाकरिता संस्था, विकासक यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या ठरावात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगीकरिता आकारण्यात येणारे विविध शुल्क / अधिमुल्य हप्त्याने भरावयाच्या सुविधेबाबत अस्तित्वातील धोरणाच्या धर्तीवर मुंबई मंडळामार्फत विनियम ३३ (५) अंतर्गत अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाच्या वितरणाकरिता अधिमुल्य आकारणी करणेबाबत कार्यवाही करण्यास म्हाडा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
म्हाडा अभिन्यासातील संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील विनियम ३३ (५) अंतर्गत करण्यात येतो. पुनर्विकासा करिता संस्थेस एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्रफळापैकी अस्तित्वातील बांधकाम क्षेत्रफळ वजा जाता उर्वरित अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाकरिता विनियम ३३ (५) मधील तरतुदीनुसार अधिमुल्याची आकारणी करण्यात येते.
यापुढे सुधारीत धोरणानुसार ४००० चौ. मी. पेक्षा कमी भूखंड क्षेत्रफळाच्या प्रकल्पांकरिता अधिमुल्य रक्कम पाच हप्त्यांमध्ये आकारण्यात येणार आहे. पहिल्या हप्त्याचा भरणा (१० टक्के अधिमूल्य रक्कम) देकार पत्राच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत करणे संस्थेस बंधनकारक राहील. दुसरा २२.५% अधिमूल्य देय हप्ता बाराव्या महिन्याअखेरीस , तिसरा २२.५% अधिमुल्य देय हप्ता चोविसाव्या महिन्याअखेरीस, चौथा २२.५% अधिमुल्य देय हप्ता ३६ व्या महिन्याअखेरीस व पाचवा २२.५% हप्ता ४८ व्या महिन्याअखेरीस भरणा व्याजासह करणे संस्थेस बंधनकारक राहील.
४००० चौ. मी. व त्याहून अधिक भूखंड क्षेत्रफळाच्या प्रकल्पांकरिता देय अधिमुल्याचे हप्ते सहा टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहेत. पहिल्या हप्त्याचा भरणा (१० टक्के अधिमूल्य रक्कम) देकार पत्राच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत करणे संस्थेस बंधनकारक राहील. दुसरा १८% अधिमूल्य देय हप्ता बाराव्या महिन्याअखेरीस, तिसरा १८% अधिमुल्य देय हप्ता चोविसाव्या महिन्याअखेरीस, चौथा १८% अधिमुल्य देय हप्ता ३६ व्या महिन्याअखेरीस, पाचवा १८% हप्ता ४८ व्या महिन्याअखेरीस व सहावा १८% हप्ता ६० व्या महिन्याअखेरीस भरणा व्याजासह करणे संस्थेस बंधनकारक राहील.
संस्था/ विकसक यांनी अधिमुल्य रकमेचा भरणा देकारपत्रच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत केल्यास या रकमेवर व्याज लागू होणार नाही. उर्वरित हप्त्यांकरीता हप्त्याची मूळ रक्कम + SBI च्या एका वर्षा करीताच्या प्रचलित MCLR व्याज दर + २% नुसार उर्वरित अधिमुल्य रकमेवर सरळ व्याज किंवा प्रत्यक्ष हप्त्याचा भरणा करते वेळी लागू असलेला शीघ्रगणक दर यानुसार येणारे अधिमुल्य यापैकी जी रक्कम अधिक असेल त्या रक्कमेचा भरणा करणे बंधनकारक राहील. तसेच हे हप्ते विहीत मुदतीत न भरल्यास / विलंब झाल्यास, थकीत अधिमुल्य रकमेवर आकारण्यात येणारे दंडणीय व्याज पुढील कालावधीकरीता १८% सरळ व्याजदरासह संस्थेने / विकासकाने भरणा करणे बंधनकारक राहील. देकारपत्रामध्ये नमुद केलेल्या एकूण कालावधीमध्ये संपूर्ण अधिमुल्य रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये संपूर्ण अधिमुल्य रकमेचा भरणा न केल्यास, उर्वरित अधिमुल्यावर पुढील कालावधीकरिता १८% सरळ व्याजासह अधिमुल्याचा भरणा करणे बंधनकारक राहील.