मुंबई : (Tamil Nadu) तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील नवळपट्टू अयनपुथूर येथे “फिफ्थ तमिळ संगम” या संघटनेशी संबंधित काही व्यक्तींनी प्रभु श्रीरामांचा पुतळा जाळून त्यावर चप्पला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संघटनेचा नेता पांडियन याने श्रीरामाला उत्तर भारतीय देव व गैर-तमिळ म्हणत अपमान केला. यासंबंधी एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून यामध्ये उपस्थित “जय रावण" अशा घोषणा देत आहेत.
या संबंधी हिंदू मुन्नानी संघटनेचे नेते आर. गुणशेखर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन दिले. ते म्हणाले की, "ही घटना १४० कोटी हिंदूंच्या श्रद्धेवरील हल्ला आहे. राम हा भारताचा सांस्कृतिक आत्मा आहे, रामाचा अपमान म्हणजे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे.”
तमिळनाडूतील भाजपा नेत्यांनी म्हटले की, “श्रीरामाचा अपमान हा हिंदू-द्वेषी विचारसरणीचा परिपाक आहे. ई.वी. रामास्वामी पेरियार यांनी सुरू केलेल्या हिंदूविरोधी प्रवृत्तीचे हेच पुढील पाऊल आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी यावर भूमिका स्पष्ट करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”
या घटनेमुळे राज्यभरात संताप उसळला असून, सोशल मीडियावर #RespectRam आणि #DMKInsultsHindus असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
हिंदू संघटनांनी इशारा दिला आहे की, दोषींवर त्वरीत कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल.
या प्रकारणाची दखल घेत तिरुचिरापल्ली सायबर क्राइम पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्यायसंहितेतील कलम १९२, १९६(१)अ, १९७, २९९, ३०२ व ३५३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयितांची ओळख पटवून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.