मुंबई : "हिंदुत्व म्हणजे समन्वयाची संकल्पना आहे. रामराज्य आणि हिंदूराष्ट्र वेगळे नाहीत. प्रभु श्रीराम हे केवळ भारतभूमीपुरतेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे Sahakaryavah Dattatraya Hosabale यांनी केले. अयोध्येतील रामकथा पार्क येथे विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शस्त्रपूजन करून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करत सरकार्यवाह पुढे म्हणाले, विजयादशमी हा धर्मस्थापनेचा मंगल उत्सव आहे. अधर्मावर धर्माचा, अन्यायावर न्यायाचा आणि असत्यावर सत्याचा विजय व्हावा अशी आपण कामना करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाला एका ध्येयमार्गावर संघटित करण्याचा संकल्प करून कार्य करीत आहे. संघाने आपल्या अद्भुत आणि प्रेरणादायी शंभर वर्षांच्या प्रवासानंतर शताब्दी वर्षात प्रवेश केला. संघाचे स्वयंसेवक देशात व परदेशात राहूनही मानवतेच्या सेवेत सातत्याने कार्यरत आहेत.
राष्ट्रभक्ती, सेवा व अनुशासनाच्या मार्गावर चालत देशसेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले, दुर्बलांच्या जीवनाला सार्थक करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा, सन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. म्हणूनच संघ शताब्दी वर्षापासून पंचपरिवर्तनाच्या विषयाला घेऊन पुढे जाणार आहे. "देश आपल्याला सर्व काही देतो, आपणही काही द्यायला शिकले पाहिजे" — या विचाराने तरुणांनी उभे राहिले पाहिजे. देशात अध्यात्म, चारित्र्य व धर्माची क्रांती व्हावी. व्यक्ती निर्माणातून चारित्र्य व राष्ट्रनिर्माण करणे हाच संघाचा उद्देश आहे. कार्यक्रमादरम्यान भगवान श्री ऋषभदेव जन्मभूमी दिगंबर जैन तीर्थ अयोध्येचे पीठाधीश पूज्य संत रवींद्र कीर्ति स्वामी उपस्थित होते.